Balochistan Terrorist Attack: पाकिस्तानातील बलुचिस्तान प्रांतात पुन्हा एकदा मोठा दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात 9 पाकिस्तानी सैनिकांचा मृत्यू झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी मंगळवारी (12 ऑगस्ट) दिली. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. वाशुक जिल्ह्यातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, डझनभर दहशतवाद्यांनी एकाच वेळी एका पोलीस स्टेशन आणि सीमा बल कॅम्पवर हल्ला केला. नाव न छापण्याच्या अटीवर एका अधिकाऱ्याने सांगितले, की "जेव्हा सैनिकांची हालचाल सुरु होती, त्याचवेळी दहशतवाद्यांनी अचानक हल्ला केला. या हल्ल्यात 9 सैनिकांचा मृत्यू झाला."
बलुचिस्तान (Balochistan) प्रांत गेल्या अनेक काळापासून हिंसाचाराने ग्रस्त आहे. नुकत्याच झालेल्या काही घटनांवरुन याची कल्पना येते.
जाफर एक्सप्रेसवर हल्ला: काही दिवसांपूर्वी बलुचिस्तानमधील मस्तुंग जिल्ह्यात जाफर एक्सप्रेसला लक्ष्य करण्यात आले. स्फोटामुळे ट्रेनचे सहा डबे रुळावरुन घसरले. यात चार प्रवासी जखमी झाले. ही घटना घडली, तेव्हा ही ट्रेन पेशावरच्या दिशेने जात होती.
बसवर गोळीबार: तसेच, काही दिवसांपूर्वी अज्ञात बंदूकधाऱ्यांनी एका प्रवासी बसवर गोळीबार केला होता, ज्यात तीन लोकांचा मृत्यू आणि सात जण जखमी झाले होते. कराचीहून क्वेटाला जाणाऱ्या या बसवर कलात परिसरात हा हल्ला झाला होता.
जब्बार मार्केटमध्ये बॉम्बस्फोट: नुकताच बलुचिस्तानच्या किला अब्दुल्ला जिल्ह्यात जब्बार मार्केटजवळ एक बॉम्बस्फोट झाला. यात चार लोकांचा मृत्यू झाला, तर 20 हून अधिक लोक जखमी झाले होते. या स्फोटामुळे अनेक इमारती आणि दुकानांचे मोठे नुकसान झाले होते.
बलुचिस्तान प्रांत गेल्या दोन दशकांपासून अशांततेचा सामना करत आहे. येथील स्थानिक बलुच गट आणि त्यांना पाठिंबा देणाऱ्या पक्षांचा आरोप आहे की, पाकिस्तान (Pakistan) सरकार या प्रांतातील नैसर्गिक साधनसंपत्तीचा गैरवापर करत आहे. या असंतोषामुळे अनेक स्थानिक बंडखोर गट सातत्याने पाकिस्तानी सुरक्षा दलांना लक्ष्य करत आहेत. नुकत्याच झालेल्या हल्ल्यांमागे याच बंडखोर गटांचा हात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. सततच्या या हल्ल्यांमुळे बलुचिस्तानमधील सुरक्षा व्यवस्था एक मोठे आव्हान बनले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.