Pakistan Elections: पाकिस्तान सध्या राजकीय संकटाबरोबर आर्थिक संकटाचा सामना करत आहे. यातच, पाकिस्तानमध्ये निवडणुका जाहीर झाल्या आहेत. फेब्रुवारीत होणाऱ्या निवडणुकांबाबत विविध पक्षांनी जनतेला रिझवण्यासाठी आपल्या हालचाली वाढवल्या आहेत. नवाझ शरीफ हे त्यांच्या पक्षाकडून पंतप्रधानपदाचे उमेदवार आहेत. पाकिस्तान पीपल्स पार्टी पीपीपीच्या वतीने बिलावल भुट्टो पंतप्रधानपदासाठी निवडणूक लढवत आहेत. निवडणुकीच्या उत्साहात बिलावल भुट्टो यांनी मोठी घोषणा केली आहे. बिलावल यांनी इम्रान खान यांच्या पक्ष कार्यकर्त्यांना ऑफर दिली आहे की, सत्तेत आल्यास सर्वांना तुरुंगातून मुक्त करु.
मिळालेल्या माहितीनुसार, पीपीपीचे बिलावल भुट्टो झरदारी यांनी म्हटले की, पुढील महिन्यात देशात होणाऱ्या निवडणुकीत ते सत्तेवर आले तर तुरुंगात असलेल्या इम्रान खान यांच्या तेहरीक-ए-इन्साफ पक्षाच्या 10 हजाराहून अधिक कार्यकर्त्यांची सुटका करतील. शहबाज शरीफ यांच्या 16 महिन्यांच्या सरकारमध्ये परराष्ट्र मंत्री असलेले बिलावल म्हणाले की, 'मला जनतेच्या पाठिंब्याने द्वेष आणि फूटीचे राजकारण संपवायचे आहे.'
दुसरीकडे, रविवारी लाहोरमध्ये एका मोठ्या रॅलीला संबोधित करताना, बिलावल यांनी पीटीआय कार्यकर्त्यांना 8 फेब्रुवारीच्या निवडणुकीत पाठिंबा देण्याचे आवाहन केले आणि त्या बदल्यात ते सूडाचे राजकारण संपवतील आणि तुरुंगात असलेल्या सर्व राजकीय कार्यकर्त्यांची सुटका करतील. बिलावल म्हणाले की, " नवाझ शरीफ बदला घेण्याचं राजकारण करत आहेत. मी सत्तेत आल्यास पीटीआयच्या सर्व राजकीय कार्यकर्त्यांना सोडेन.''
खरं तर, पीटीआयचे म्हणणे आहे की गेल्या वर्षी मे महिन्यात लष्करी कार्यालयांवर झालेल्या हल्ल्यात सहभागी झाल्याच्या आरोपाखाली पक्षाचे 10,000 हून अधिक कार्यकर्ते अजूनही तुरुंगात आहेत. यापैकी बहुतांश पंजाब आणि खैबर पख्तुनख्वा प्रांतातील आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने पीटीआय पक्षाचे चिन्ह क्रिकेट 'बॉल' गोठवण्यात आले. त्यामुळे त्यांचे सर्व उमेदवार आता स्वतंत्रपणे निवडणूक लढवत आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.