Asim Munir Daughter Wedding: पाकिस्तान लष्करप्रमुख जनरल असीम मुनीरच्या घरी गेल्या आठवड्यात शाही सोहळा पार पडला. असीम मुनीरची मुलगी 'माहनूर' हिचे लग्न अत्यंत खाजगी आणि गुप्त पद्धतीने पार पडले. लष्करी आणि सुरक्षा कारणास्तव या सोहळ्याची माहिती जगाला उशिरा मिळाली. विशेष म्हणजे, मुनीरने आपल्या मुलीचे लग्न स्वतःच्या सख्ख्या मोठ्या भावाच्या मुलाशी म्हणजेच आपल्या पुतण्याशी लावून दिले. अनेक वरिष्ठ पाकिस्तानी पत्रकारांनी या वृत्ताला दुजोरा दिला असून सोशल मीडियावर आता या शाही लग्नाची चर्चा रंगली आहे.
जनरल असीम मुनीरच्या मुलीचे लग्न (Marriage) रावळपिंडी येथे पार पडले. पाकिस्तानातील सध्याची सुरक्षा परिस्थिती आणि लष्करप्रमुखाचे पद पाहता, हा सोहळा अत्यंत गोपनीय ठेवण्यात आला होता. लग्नासाठी आलेल्या व्हीव्हीआयपी पाहुण्यांनाही या लग्नाची कोणतीही माहिती किंवा फोटो सोशल मीडियावर शेअर न करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत पार पडलेल्या या सोहळ्यात केवळ निवडक 400 पाहुण्यांनाच निमंत्रित करण्यात आले होते.
जनरल असीम मुनीरचा जावई अब्दुर रहमान हा त्यांचा सख्खा पुतण्या आहे. अब्दुर रहमानची पार्श्वभूमी देखील लष्करी आणि प्रशासकीय आहे. तो पूर्वी पाकिस्तानी सैन्यात 'कॅप्टन' पदावर कार्यरत होता. मात्र, त्याची नागरी सेवा परीक्षेत निवड झाल्यानंतर त्याने लष्करातील नोकरी सोडली आणि सध्या तो प्रशासकीय सेवेत कार्यरत आहे. मुनीरने आपल्या कुटुंबातील सदस्यालाच जावई म्हणून निवडून कौटुंबिक बंध अधिक घट्ट करण्याला प्राधान्य दिले.
हा सोहळा जरी खाजगी असला, तरी पाकिस्तानच्या राजकारणातील आणि लष्करातील अनेक दिग्गज चेहऱ्यांनी या लग्नाला हजेरी लावली. मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष आसिफ अली झरदारी, पंतप्रधान शहबाज शरीफ आणि पंजाबच्या मुख्यमंत्री मरियम नवाज शरीफ यांनी या सोहळ्याला उपस्थित राहून नवदाम्पत्याला आशीर्वाद दिले. याशिवाय, अनेक निवृत्त लष्करी जनरल आणि उच्चपदस्थ लष्करी अधिकारी देखील या शाही लग्नाचे साक्षीदार बनले.
रावळपिंडीतील लष्करी भागात हा विवाह पार पडल्याने सुरक्षेची मोठी खबरदारी घेण्यात आली होती. पाकिस्तानी माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, लग्नाच्या ठिकाणी मोबाईल फोन आणि कॅमेऱ्यांच्या वापरावरही निर्बंध लादण्यात आले होते. असीम मुनीर याच्या कार्यकाळात पाकिस्तानमध्ये (Pakistan) अनेक राजकीय उलथापालथी सुरु असल्यामुळे त्यांच्या कुटुंबाची सुरक्षा ही नेहमीच कळीचा मुद्दा राहिली आहे. त्यामुळेच या लग्नाची बातमी अनेक दिवस दाबून ठेवण्यात आली होती.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.