Pakistan Political Crisis: पाकिस्तान सध्या आर्थिक संकटाबरोबर राजकीय संकटाचा सामना करत आहे. यातच, पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या अटकेनंतर देशात मोठी राजकीय अनागोंदी माजली आहे.
खान यांचे समर्थक रस्त्यावर उतरुन देशभरात हिंसक निदर्शने करत आहेत. दरम्यान, अनेक विश्लेषक खान यांच्या अटकेमागे चिनी कनेक्शन शोधत आहेत.
खरे तर, चीनचे परराष्ट्र मंत्री किन गांग नुकतेच पाकिस्तान दौऱ्यावर आले होते. यावेळी, त्यांनी केलेल्या वक्तव्याने वाद निर्माण झाला होता.
चीनच्या (China) परराष्ट्रमंत्र्यांचे हे वक्तव्य म्हणजे पाकिस्तानच्या अंतर्गत बाबींमध्ये एक प्रकारचा हस्तक्षेप असल्याचे पाकिस्तानी विश्लेषकांचे म्हणणे आहे. त्यांच्या मते कोणत्याही देशाच्या अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करणे हे चीनचे धोरण राहिले आहे.
दरम्यान, परराष्ट्र मंत्री किन गांग म्हणाले होते की, 'स्थिरता हा विकासाचा आधार आहे, एक शेजारी आणि मित्र या नात्याने आम्हाला प्रामाणिकपणे आशा आहे की, पाकिस्तानमधील (Pakistan) सर्व राजकीय पक्ष एक अजेंडा ठरवतील आणि देशात स्थिरता राखतील.
तसेच, देशांतर्गत आणि परदेशी आव्हानांना अधिक प्रभावीपणे तोंड देतील.' चीनचे परराष्ट्रमंत्री पाकिस्तान दौऱ्यावरुन गेल्यानंतर इम्रान खान यांच्यावर कारवाई सुरु झाली हेही येथे महत्त्वाचे आहे.
शाहबाज शरीफ सरकार चीनशी संबंध सुधारण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. पाक लष्करप्रमुख असीम मुनीर अलीकडेच चीनच्या दौऱ्यावर गेले होते.
त्याचवेळी, चीनच्या संरक्षणमंत्र्यांनीही पाकिस्तानला भेट देऊन CPEC प्रकल्पाला होत असलेल्या दिरंगाईबद्दल नाराजी व्यक्त केली होती. चीनला हा प्रकल्प लवकरात लवकर पुढे न्यायचा आहे, पण इम्रान खान यांचे संघर्षाचे राजकारण आडवे येत आहे.
अलीकडेच, अमेरिकेच्या गुप्तचर दस्तऐवजांवरुन असे उघड झाले आहे की, पाकिस्तानच्या परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री हिना रब्बानी खार यांनी अमेरिकेशी चांगले संबंध राखण्यासाठी चीनसोबतच्या धोरणात्मक भागीदारीचा त्याग करण्याविरुद्ध देशाला इशारा दिला होता.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.