British MP Bob Blackman On Jammu Kashmir: जम्मू-काश्मीरच्या मुद्द्यावर आंतरराष्ट्रीय स्तरावरुन भारताला पुन्हा एकदा मोठे समर्थन मिळाले. ब्रिटनचे ज्येष्ठ खासदार बॉब ब्लॅकमॅन यांनी पाकिस्तानच्या ताब्यातील काश्मीर (PoK) आणि जम्मू-काश्मीरबाबत मोठे विधान करत भारताच्या भूमिकेचे जोरदार समर्थन केले. "पाकिस्तानने बळकावलेला काश्मीरचा भाग (PoK) पुन्हा एकदा भारताशी जोडला गेला पाहिजे आणि संपूर्ण जम्मू-काश्मीर हे भारताचे अविभाज्य अंग असायला हवे," असे ब्लॅकमॅन यांनी स्पष्टपणे म्हटले. जयपूर येथील 'कॉन्स्टिट्यूशनल क्लब'मध्ये आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने 2019 मध्ये जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. मात्र, बॉब ब्लॅकमॅन यांनी सांगितले की, त्यांची ही मागणी केवळ 2019 च्या निर्णयाशी संबंधित नाही. "कलम 370 रद्द करण्याची माझी मागणी 30 वर्षांहून अधिक जुनी आहे. 1990 च्या दशकाच्या सुरुवातीला जेव्हा काश्मीर खोऱ्यातून काश्मीरी पंडितांचे पलायन झाले, तेव्हाच माझी ही भूमिका निश्चित झाली होती," असे त्यांनी नमूद केले. 1992 मध्ये जेव्हा काश्मीरी पंडितांना केवळ त्यांच्या धर्मामुळे त्यांच्याच पूर्वजांच्या घरातून बाहेर काढले गेले, तेव्हाच मी या अन्यायाविरुद्ध आवाज उठवला होता, असेही त्यांनी सांगितले.
ब्लॅकमॅन यांनी या भागात सुरु असलेल्या दहशतवादाची कडाडून निंदा केली. पाकिस्तानने जम्मू-काश्मीरच्या काही भागांवर केलेल्या बेकायदेशीर कब्जावर त्यांनी सडकून टीका केली. ते म्हणाले, "मी केवळ दहशतवादाचाच निषेध केला नाही, तर पाकिस्तानच्या ताब्यातील जम्मू-काश्मीरच्या भूभागावरील अवैध कब्जाचाही निषेध केला. माझे सुरुवातीपासूनचे हेच मत आहे की, संपूर्ण जम्मू-काश्मीर रियासत पुन्हा एकदा भारताच्या शासनाखाली एकत्रित केली जावी."
यापूर्वीही ब्लॅकमॅन यांनी पाकिस्तानच्या (Pakistan) धोरणांवर सडकून टीका केली आहे. पाकिस्तानला 'नाकाम देश' म्हणत त्यांनी तिथल्या लोकशाहीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. "पाकिस्तानमध्ये लोकशाही संस्था शासन चालवतात की तिथले लष्करी जनरल, हेच स्पष्ट नाही," असे त्यांनी जून महिन्यात एका कार्यक्रमादरम्यान म्हटले होते. पाकिस्तानकडून भारतात दहशतवादाला खतपाणी घातले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला असून आंतरराष्ट्रीय समुदायाने भारताच्या बाजूने ठामपणे उभे राहणे काळाची गरज असल्याचे त्यांनी प्रतिपाद्य केले.
पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा संदर्भ देत ब्लॅकमॅन यांनी दुःख व्यक्त केले. त्यांनी ब्रिटन सरकारला आवाहन केले की, भारताला सुरक्षा सहकार्याची गरज असताना ब्रिटनने भारताच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले पाहिजे. भारत (India) पाश्चात्य देशांशी जवळचे सुरक्षा संबंध प्रस्थापित करु पाहत असताना दहशतवादाविरुद्धच्या लढाईत भारताला एकटे पाडून चालणार नाही, अशी भूमिका त्यांनी मांडली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.