ढाका: शेजारील देश असलेल्या बांगलादेशात हिंसाचाराचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाहीये. कट्टरतावाद्यांच्या वाढत्या प्रभावामुळे तिथे अल्पसंख्याक हिंदू समाज पुन्हा एकदा दहशतीच्या छायेखाली आला आहे. मैमनसिंह जिल्ह्यात एका हिंदू तरुणाची जमावाने ज्या क्रूरतेने हत्या केली, त्याने संपूर्ण जग हादरून गेले आहे.
दीपू चंद्र दास असे हत्या झालेल्या दुर्दैवी तरुणाचे नाव आहे. तो एका कापड कारखान्यात कामगार म्हणून कार्यरत होता आणि भालुका उपनगरातील एका भाड्याच्या घरात राहत होता. गुरुवारी रात्री स्थानिक कट्टरपंथीयांच्या एका गटाने दीपूवर पैगंबर मोहम्मद यांच्याबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी केल्याचा खोटा आरोप केला. या अफवेने जमाव इतका हिंसक झाला की, त्यांनी दीपूवर प्राणघातक हल्ला चढवला. या जमावाने त्याला लाथाबुक्क्यांनी आणि काठ्यांनी इतके मारले की त्याचा जागीच मृत्यू झाला.
या घटनेतील सर्वात भयानक बाब म्हणजे, दीपूचा मृत्यू झाल्यानंतरही जमावाचे समाधान झाले नाही. या धर्मांधांनी त्याचा मृतदेह एका झाडाला बांधला आणि सर्वांसमोर त्याला आग लावून दिली. भररस्त्यात सुरू असलेल्या या तांडवामुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. मात्र, अद्याप याप्रकरणी कोणतीही ठोस कायदेशीर कारवाई किंवा कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.
हसीना विरोधी नेते शरीफ उस्मान हादी यांच्या मृत्यूनंतर बांगलादेशात अराजकता माजली आहे. याच अराजकतेचा फायदा घेत समाजकंटक आता अल्पसंख्याकांना लक्ष्य करत आहेत. वृत्तपत्रांची कार्यालये, अवामी लीगच्या नेत्यांची घरे आणि ऐतिहासिक वास्तूंची तोडफोड सुरू आहे. इतकेच नव्हे तर ढाका आणि चटगावमध्ये भारतविरोधी घोषणाबाजी करत भारतीय दूतावासांवरही दगडफेक करण्यात आली आहे. मुख्य सल्लागार मोहम्मद युनूस यांनी शांततेचे आवाहन केले असले तरी, परिस्थिती अत्यंत चिंताजनक आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.