Afghanistan Girls: अफगाणिस्तानातील मुलींच्या शिक्षणाबाबत तालिबानची भूमिका जगाला माहीत आहे. अफगाणिस्तानातील शाळांमध्ये बुधवारी मुलींविना नवीन शैक्षणिक सत्र सुरु झाले आहे. तालिबानने इयत्ता सहावीपासून मुलींच्या शिक्षणावर बंदी घातली आहे. महिलांच्या शिक्षणावर बंदी घालणारा अफगाणिस्तान हा जगातील एकमेव देश आहे. तालिबानच्या या भूमिकेवर संयुक्त राष्ट्रासह जगातील अनेक देशांनी चिंता व्यक्त केली आहे. तालिबानने 1990 च्या दशकात अफगाणिस्तानवर त्यांच्या राजवटीत मुलींच्या शिक्षणावर बंदी घातली होती.
युनायटेड नेशन्स चिल्ड्रेन एजन्सीच्या म्हणण्यानुसार, 1 दशलक्षाहून अधिक मुली या बंदीमुळे प्रभावित झाल्या आहेत. एजन्सीचा असाही अंदाज आहे की, तालिबान सत्तेत येण्यापूर्वीच सुविधांच्या अभावामुळे आणि इतर कारणांमुळे 5 दशलक्ष मुलींनी शाळा सोडली होती. तालिबानच्या शिक्षण मंत्रालयाने नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात एका समारंभाने केली, ज्यामध्ये महिला पत्रकारांना उपस्थित राहण्याची परवानगी नव्हती. पत्रकारांना पाठवलेल्या निमंत्रणात असे लिहिले आहे की, "बहिणींसाठी योग्य जागा नसल्यामुळे, आम्ही महिला पत्रकारांची माफी मागतो." तालिबानचे शिक्षणमंत्री हबीबुल्ला आगा यांनी समारंभात सांगितले की "धार्मिक आणि आधुनिक विज्ञान मंत्रालय शिक्षणाचा दर्जा वाढवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे.''
तालिबान मदरसे किंवा धार्मिक शाळांवर भर देत आहे. यामुळे अफगाणिस्तानमध्ये गणित किंवा विज्ञानापेक्षा मूलभूत साक्षरतेसह इस्लामिक शिक्षणाला महत्त्व दिले जात आहे. मंत्र्याने विद्यार्थ्यांना इस्लामिक आणि अफगाण तत्त्वांच्या विरोधात असलेले कपडे घालणे टाळण्याचे आवाहन केले. तालिबानचे उपपंतप्रधान अब्दुल सलाम हनाफी म्हणाले की, ते "देशातील सर्व दुर्गम भागात" शिक्षणाचा विस्तार करण्याचा प्रयत्न करत आहेत. तालिबानने यापूर्वी म्हटले होते की, मुलींचे शिक्षण चालू ठेवणे हे इस्लामिक कायद्याच्या किंवा शरियाच्याविरुद्ध आहे आणि त्यांना शाळेत परतण्यासाठी काही अटी आवश्यक आहेत. मात्र, या अटी काय असतील याची अद्याप स्पष्टता नाही.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.