Abbas Araghchi Iran US Tension Deal: अमेरिका आणि इराणदरम्यान सुरु असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर तेहरानने आपली भूमिका स्पष्ट केली असून, कोणतीही तडजोड न करता सन्मानजनक तोडगा काढण्यावर भर दिला. इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी एका सरकारी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, सध्याच्या ‘युद्धही नाही आणि शांतताही नाही’ अशा पेचातून इराणला बाहेर पडायचे आहे. मात्र, वॉशिंग्टनसोबत होणाऱ्या कोणत्याही करारात इराणच्या राष्ट्रीय हितांचे पूर्ण रक्षण होणे आणि भविष्यात पुन्हा युद्ध भडकणार नाही याची ठोस हमी मिळणे आवश्यक आहे. केवळ तात्पुरत्या मार्ग म्हणून अशा कराराकडे पाहिले जाऊ नये, असेही त्यांनी ठणकावून सांगितले.
कराराच्या शाश्वतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना अराघची म्हणाले की, आज करार करायचा आणि दोन महिन्यांत त्याचे उल्लंघन होऊन पुन्हा संघर्ष सुरु झाला, तर अशा सहमतीला काय अर्थ उरेल? जून महिन्यात झालेल्या शस्त्रसंधीनंतर अवघ्या पंधरा दिवसांतच लढाई पुन्हा सुरु झाल्याचा दाखला त्यांनी दिला. तसेच, अमेरिकेला (America) आपल्या विजयाचा आव आणता येईल अशा कोणत्याही सवलती इराण मान्य करणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
अणू कार्यक्रमाबाबत बोलताना अराघची यांनी नमूद केले की, 60 टक्क्यांपर्यंत समृद्ध केलेल्या युरेनियमच्या साठ्याबाबत इराण चर्चेला तयार आहे, परंतु हा साठा देशाबाहेर पाठवण्याचा प्रस्ताव स्वीकारला जाणार नाही. अणू प्रश्नावर न्याय्य तोडगा निघू शकतो, मात्र इतर मागण्यांपासून तो वेगळा पाहता येणार नाही; तो सर्वसमावेशक कराराचाच भाग असायला हवा.
मध्यस्थ देशांकडून युरेनियम साठ्याबाबत विविध प्रस्ताव आले असले, तरी त्यावर कोणताही अंतिम निर्णय घेण्यापूर्वी इराणच्या सर्वोच्च राष्ट्रीय सुरक्षा परिषदेची चर्चा समिती त्याची छाननी करेल आणि त्यानंतरच परिषद अंतिम मंजुरी देईल. इराणच्या अधिकृत अणू धोरणात कोणताही बदल झालेला नसल्याचेही त्यांनी आवर्जून सांगितले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.