ODI World Cup 2011 Story: आयसीसी महिला वनडे वर्ल्ड कप 2025 च्या ट्रॉफीचे नुकतेच अनावरण करण्यात आले. 30 सप्टेंबरपासून सुरु होणाऱ्या या स्पर्धेत जगातील सर्वोत्तम महिला क्रिकेट संघ सहभागी होणार आहेत. या खास सोहळ्याला आयसीसीचे अध्यक्ष जय शाह, माजी क्रिकेटपटू युवराज सिंह, भारतीय महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर आणि माजी कर्णधार मिताली राज यांच्यासह अनेक दिग्गज उपस्थित होते.
या कार्यक्रमादरम्यान युवराज सिंहने 2011 च्या विश्वचषकातील एक अविस्मरणीय किस्सा सांगितला. त्यावेळेस भारतीय संघाला मिळालेल्या खास सल्ल्याबद्दल त्याने खुलासा केला.
युवराजने सांगितले की, "2011 च्या विश्वचषकात नागपूरमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या ग्रुप राऊंड सामन्यात आम्ही हरलो होतो. त्यानंतर महेंद्रसिंग धोनी आणि संपूर्ण संघावर प्रचंड दबाव होता. त्यावेळी संघावर मोठ्या प्रमाणात टीकाही झाली होती."
युवराजने पुढे सांगितले की, "त्यावेळी आम्ही खूप निराश झालो होतो. कारण कोणत्याही यजमान देशाने त्यांच्याच मायदेशात वर्ल्ड कप जिंकला नव्हता आणि भारताला वर्ल्ड कप जिंकून 28 वर्षे झाली होती. इंग्लंडविरुद्धचा सामना बरोबरीत राहिल्यानंतर आम्ही दक्षिण आफ्रिकेकडून हरलो. त्यानंतर सचिन तेंडुलकर आणि तत्कालीन प्रशिक्षक गॅरी कर्स्टन यांनी आम्हाला सल्ला दिला होता की, 'कोणत्याही खेळाडूने टीव्ही पाहू नये, वर्तमानपत्र वाचू नये आणि मैदानात जाताना हेडफोन लावावा.' त्यांनी आम्हाला 'बाहेरील आवाज' कमी करुन स्पर्धेत जिंकण्यासाठी जे आवश्यक आहे, त्यावर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला दिला."
त्याचवेळी, 2011 मध्ये युवराज सिंह (Yuvraj Singh) कर्करोगाशी झुंज देत होता, तरीही त्याने वर्ल्ड कपमध्ये जबरदस्त कामगिरी केली. त्याने स्पर्धेत 262 धावा करण्यासोबतच 15 विकेट्सही घेतल्या होत्या. त्याच्या या अविस्मरणीय कामगिरीमुळे त्याला 'प्लेअर ऑफ द टूर्नामेंट' (Man of the series) हा किताब मिळाला होता.
2011 वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात भारताने (India) श्रीलंकेला वानखेडे स्टेडियमवर 6 विकेट्सने हरवून 28 वर्षांनंतर वर्ल्ड कपची ट्रॉफी जिंकली होती. आता आयसीसी महिला वनडे वर्ल्ड कपची तयारी सुरु झाली आहे. 30 सप्टेंबरपासून सुरु होणारी ही स्पर्धा 2 नोव्हेंबर रोजी संपणार आहे. भारत आणि श्रीलंका या स्पर्धेचे यजमानपद भूषवत असल्यामुळे भारतीय महिला संघालाही 2011 च्या इतिहासाची पुनरावृत्ती करण्याची संधी मिळाली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.