Rahul Gandhi Flying Kiss  Controversy
Rahul Gandhi Flying Kiss Controversy  Dainik Gomantak
देश

Year Ender 2023: राहुल गांधींच्या फ्लाइंग किसपासून ते भारत-कॅनडा तणाव... या वर्षातील 7 सर्वात मोठे वाद

Manish Jadhav

Year Ender 2023: वर्ष 2023 काही दिवसात संपणार आहे. आता नववर्षाच्या आगमनाला अवघे 11 दिवस उरले आहेत. या वर्षात अनेक मोठे वाद आणि घोटाळे झाले. खलिस्तान समर्थक हरदीपसिंग निज्जर याची हत्या, दोन चिनी मंत्र्यांचे अचानक बेपत्ता होणे, राहुल गांधींचा फ्लाइंग किस वाद आणि वॅगनरच्या प्रमुखाची हत्या या प्रमुख गोष्टी आहेत. चला तर मग या सर्व घडामोडींवर एक नजर टाकूया...

राहुल गांधींच्या फ्लाइंग किसचा वाद

केरळच्या वायनाड लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी त्यांचे संसद सदस्यत्व बहाल केल्यानंतर 9 ऑगस्ट रोजी लोकसभेत पहिले भाषण केले. यादरम्यान ते फ्लाइंग किसमुळे वादात सापडले. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी त्यांच्यावर हल्लाबोल केला. इराणी म्हणाल्या होत्या की, 'राहुल गांधी ज्या पद्धतीने वागतात त्यावरुन त्यांच्या कुटुंबाचा आणि पक्षाचा महिलांबद्दलचा दृष्टिकोन काय आहे हे समजते.' केंद्र सरकारच्या विरोधात आणलेल्या अविश्वास प्रस्तावावरील चर्चेच्या दुसऱ्या दिवशी ही घटना घडली होती. त्यावेळी, स्मृती इराणी भाषण करत होत्या. राहुल संसदेबाहेर जात असताना त्यांच्या हातातून काही फाईल्स पडल्या. फाईल्स उचलण्यासाठी खाली वाकल्यावर भाजप खासदार हसले, त्यावर त्यांनी त्यांना फ्लाइंग किस दिला आणि सभागृहातून बाहेर पडले.

भारत VS इंडिया वाद

सप्टेंबर महिन्यात, जी-20 शिखर परिषदेच्या पार्श्‍वभूमीवर आयोजित डिनरसाठी पाठवलेल्या निमंत्रण पत्रात राष्ट्रपतींनी स्वत:ला 'इंडिया' ऐवजी 'भारता'चे राष्ट्रपती म्हणून संबोधले होते, तेव्हा हा वाद समोर आला होता. केंद्र सरकार देशाचे नाव बदलणार असल्याच्या चर्चेला उधाण आले होते. याचे कारण असे की, पूर्वी इंग्रजीत पाठवल्या जाणाऱ्या निमंत्रण पत्रांवर देशाचे नाव 'इंडिया' आणि हिंदीत पाठवलेल्या पत्रांवर देशाचे नाव 'भारत' असे लिहिले होते.

हरदीपसिंग निज्जर खून प्रकरण

जूनमध्ये, खलिस्तान समर्थक हरदीपसिंग निज्जरची कॅनडातील ब्रिटिश कोलंबियामधील सरे येथील गुरुद्वाराबाहेर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी संसदेत केलेल्या भाषणात या हत्याकांडामागे भारताचा हात असल्याचा संशय व्यक्त केला, त्यानंतर दोन्ही देशांमधील संबंध ताणले गेले. भारताने ट्रुडो यांचे आरोप निराधार आणि राजकीय हेतूने प्रेरित असल्याचे म्हटले होते. त्यांनी या घटनेत कोणताही सहभाग असल्याचे स्पष्टपणे नाकारले. त्यानंतर कॅनडा हा दहशतवाद्यांचे सुरक्षित आश्रयस्थान असल्याचे कारण देत भारताने कॅनडाच्या नागरिकांना व्हिसा देणे बंद केले. यासोबतच त्यांनी कॅनडाला आपल्या राजनयिकांची संख्या कमी करण्यास सांगितले, त्यानंतर ट्रुडो यांनी भारतातून 41 राजनयिक अधिकारी परत बोलावले.

कॅश फॉर क्वेरीच्या वादामुळे महुआ मोईत्रा अडचणीत

TMC खासदार महुआ मोइत्रा यांची 8 डिसेंबर रोजी लोकसभेतून हकालपट्टी करण्यात आली होती. कॅश फॉर क्वेरीच्या वादामुळे त्या चर्चेत होत्या. एथिक्स कमिटीच्या अहवालात महुआ दोषी आढळल्या. महुआ यांच्यावर वकील जय अनंत देहादराई आणि भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी व्यापारी दर्शन हिरानंदानी यांच्याकडून प्रश्न विचारण्याच्या बदल्यात भेटवस्तू घेतल्याचा आरोप केला होता.

रश्मिका मंदाना डीप फेक व्हिडिओ

दरम्यान, AI चा वापर मोठ्याप्रमाणात वाढता आहे. चांगल्या कामांबरोबरच चुकीच्या कामांसाठीही त्याचा वापर होत आहे. नोव्हेंबरमध्ये साऊथची प्रसिद्ध अभिनेत्री रश्मिका मंदानाच्या व्हायरल झालेल्या डीप फेक व्हिडिओने यावर चर्चा सुरु झाली. या व्हिडिओमध्ये रश्मिकाचा डीप फेक फोटो व्हिडिओ व्हायरल झाला होता. यावर केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी चिंता व्यक्त केली होती. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने सांगितले की, माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 च्या कलम 66D अंतर्गत, ज्या प्रकरणांमध्ये कम्प्यूटरचा वापर करुन फसवणूक केली गेली अशा प्रकरणांमध्ये शिक्षेची तरतूद आहे.

वॅगनर प्रमुख येवगेनी प्रीगोझिनची हत्या

रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या विरोधात बंड करणाऱ्या वॅगनर ग्रुपचे संस्थापक आणि कमांडर येवगेनी प्रिगोझिन यांचा विमान अपघातात मृत्यू झाला. विमान, सेंट पीटर्सबर्गला जात असताना, 23 ऑगस्ट रोजी राजधानी मॉस्कोच्या उत्तरेला अपघात झाला आणि 10 लोक ठार झाले. मात्र, विमान कशामुळे कोसळले याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. प्रीगोझिन यांनी त्यांच्या मृत्यूच्या दोन महिने आधी रशियन सैन्याविरुद्ध बंड केले होते. राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी प्रिगोझिन यांना देशद्रोही ठरवले आणि दोषींना शिक्षा देण्याचे आश्वासन दिले. पुतिन यांच्याबद्दल हे प्रसिद्ध आहे की, ते आपल्या शत्रूंना माफ करत नाहीत.

चीनचे दोन मंत्री बेपत्ता

चीनच्या दोन मंत्र्यांच्या अचानक बेपत्ता होण्याचे गूढ अद्याप उकललेले नाही. पहिल्यांदा परराष्ट्र मंत्री किन गँग बेपत्ता झाले. यानंतर संरक्षण मंत्री ली शांगफूही गायब झाले. किन गँग बेपत्ता झाल्यानंतर कोणतेही स्पष्टीकरण न देता त्यांच्या पदावरुन हटवण्यात आले. त्यांच्या जागी वान यी यांना परराष्ट्र मंत्री करण्यात आले. त्यानंतर शी जिनपिंग यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले. त्यांना 25 जून रोजी शेवटचे पाहिले गेले होते. त्यांचा मृत्यू झाल्याचा दावा एका अहवालात करण्यात आला. किननंतर संरक्षण मंत्री ली शांगफू हेही अचानक गायब झाले. 29 ऑगस्ट रोजी ते शेवटचा दिसले होते. अखेर ऑक्टोबरमध्ये त्यांना त्यांच्या पदावरुन बडतर्फ करण्यात आले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Todays Live Update: चिखलीत इनडोअर स्टेडियमची भिंत कोसळली

Jammu & Kashmir Terrorist Attack: कठुआमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; भारतीय लष्कराचे 4 जवान ठार, 6 जखमी

Nilesh Cabral: निलेश काब्राल यांचा थेट CM पदावरच डोळा?; मंत्रिमंडळ फेररचनेच्या पार्श्वभूमीवर मोठे विधान

Goa Rain Update: राज्यात पावसाचा हाहाकार! कुशावती नदीची पातळी वाढली; पारोडा रस्ता दुसऱ्या दिवशीही पाण्याखाली

Mumbai Goa Highway: निवारा शेडविना प्रवाशांचे हाल; पेडणे तालुक्याची समस्या

SCROLL FOR NEXT