उत्तर प्रदेशात रस्ते अपघातांची मालिका सुरूच असून, कुशीनगर जिल्ह्यात घडलेल्या भीषण दुर्घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. भरधाव ट्रेलर आणि ओमनी कार यांच्यात झालेल्या जोरदार धडकेत सहा जणांचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य दोघे गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये एकाच कुटुंबातील पाच जणांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. रात्री उशिरा राष्ट्रीय महामार्गावर हा अपघात घडला. या घटनेमुळे संबंधित कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कुशीनगर जिल्ह्यातील हाटा कोतवाली क्षेत्रांतर्गत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक २८ वर थरुआडीहजवळ हा अपघात झाला. कारमधून प्रवास करणारे कुटुंबीय नातेवाइकांकडे आयोजित करण्यात आलेल्या एका मंगलकार्याला उपस्थित राहून घरी परतत होते.
दरम्यान, प्रवासादरम्यान त्यांच्या ओमनी कारची एका ट्रेलरसोबत जोरदार धडक झाली. धडक इतकी भीषण होती की कारचा अक्षरशः चक्काचूर झाला. कारमधील सहा जणांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अपघातानंतर परिसरात एकच गोंधळ उडाला.
या दुर्घटनेतील सर्वाधिक धक्कादायक बाब म्हणजे मृतांमध्ये एकाच कुटुंबातील पाच सदस्यांचा समावेश आहे. हे कुटुंब कुशीनगरमधील कप्तानगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या भलुही गावातील रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे.
अपघातात जखमी झालेल्या दोघांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारांसाठी गोरखपूर मेडिकल कॉलेजमध्ये हलवण्यात आले आहे. सध्या दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे.
दरम्यान, उत्तर प्रदेशातील बाराबंकी जिल्ह्यातही रविवारी संध्याकाळी भीषण अपघात झाला. रामसनेहीघाट पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका भरधाव एसयूव्हीने दोन दुचाकींना जोरदार धडक दिली. या दुर्घटनेत तीन तरुणांचा मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला.
मृतांमध्ये अनूप (१८), विमलेश (१९) आणि अनिल यादव (१७) यांचा समावेश आहे. तर गया प्रसाद (१७) हा गंभीर जखमी झाला. हे चारही तरुण भंडाऱ्यात प्रसाद ग्रहण करण्यासाठी जात होते. बैसनपुरवा गावाजवळ महामार्ग ओलांडत असताना त्यांच्या दुचाकींना एसयूव्हीने धडक दिली.
धडक इतकी जोरदार होती की एका दुचाकीला जवळपास २०० मीटरपर्यंत फरफटत नेण्यात आले. या घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी महामार्गावर रास्ता रोको केला. तसेच एसयूव्ही चालकाला पकडून मारहाण केली. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी चालकाला जमावाच्या तावडीतून सोडवले. जवळपास तासाभरानंतर वाहतूक पुन्हा सुरू करण्यात आली.
उत्तर प्रदेशातील मथुरा येथे यमुना एक्स्प्रेस वेवरही काही दिवसांपूर्वी मोठा अपघात घडला होता. २९ ऑक्टोबर रोजी पहाटे सुमारे ३ वाजून १५ मिनिटांनी माइलस्टोन १०१ जवळ दोन प्रवासी बस आणि काचेने भरलेल्या एका कॅंटरची जोरदार धडक झाली.
मिळालेल्या माहितीनुसार, नोएडाहून आग्र्याकडे जाणाऱ्या विश्वनाथ ट्रॅव्हल्सच्या बसने ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात कॅंटरला धडक दिली. त्याचवेळी मागून येणारी ट्रॅव्हल पॉइंटची दुसरी बसही कॅंटरवर आदळली. या अपघातात कॅंटर उलटला, तर सहापेक्षा अधिक प्रवासी जखमी झाले.
घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या. जखमी प्रवाशांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उत्तर प्रदेशातील या सलग अपघातांच्या घटनांमुळे महामार्गावरील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.