Ambedkar Nagar Road Accident: उत्तर प्रदेशातील आंबेडकरनगर जिल्ह्यातून एक काळजाचा थरकाप उडवणारी घटना समोर आली. जलालपुर-अकबरपुर मार्गावर अशरफपुर भुआ गावाजवळ रविवारी मध्यरात्री झालेल्या एका भीषण रस्ते अपघातात 8 जणांचा मृत्यू झाला. मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये बहुतांश अशा लोकांचा समावेश होता, जे रस्त्यावर पडलेल्या जखमी दुचाकीस्वारांच्या मदतीसाठी तिथे जमा झाले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री 12 वाजेच्या सुमारास दोन दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक झाली. या भीषण धडकेनंतर दुचाकीस्वार रस्त्यावर पडून वेदनेने तडफडू लागले. हा अपघात पाहताच जवळचे ग्रामस्थ आणि काही वाटसरु मदतीसाठी धावून आले. हे लोक जखमींना सावरत असतानाच एका भरधाव स्विफ्ट डिझायर कारने (Car) तिथे जमा झालेल्या गर्दीला अक्षरशः चिरडले आणि त्यानंतर ही कार जवळच्या एका खोल खड्ड्यात जाऊन उलटली.
या भयानक घटनेनंतर परिसरात एकच टाहो फोडला. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत सर्व जखमींना नगपूर येथील सामुदायिक आरोग्य केंद्रात दाखल केले. तिथे डॉक्टरांनी 6 जणांना मृत घोषित केले. अन्य दोन गंभीर जखमींना उपचारासाठी सदरपूर येथील राजकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलवण्यात आले, मात्र जखमा इतक्या खोल होत्या की उपचारादरम्यान त्यांचाही मृत्यू झाला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतांमध्ये कार चालकाचाही समावेश आहे. आतापर्यंत 6 मृतांची ओळख पटली असून यामध्ये उत्तम (रा. सेमरा), आदित्य (25, रा. जैना), छोटू उर्फ दिव्यांश (14, रा. जैना), राजू गुप्ता (32, रा. सिकंदरपूर), लालचंद (24, रा. पट्टी मोईन) आणि कॅफे (32, रा. सैदापूर) यांचा समावेश आहे. अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. जयवीर सिंह यांनी सांगितले की, सर्व मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले असून त्यांच्या नातेवाईकांना सूचित करण्यात आले. अन्य दोन मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरु आहे. मदत करायला गेलेल्या निरपराध लोकांच्या अशा मृत्यूमुळे संपूर्ण जिल्ह्यात शोकाकुल वातावरण निर्माण झाले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.