Ayodhya Ram Mandir Latest Updates: सध्या देशात राम मंदिराच्या उद्घाटनाची चर्चा जोरात सुरु आहे. यातच, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांचे पुत्र उदयनिधी यांनी आता अयोध्येत बांधण्यात आलेल्या राम मंदिरावर प्रश्न उपस्थित केला आहे. मशीद पाडून मंदिर बांधणे द्रमुकला मान्य नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. यापूर्वी, त्यांनी सनातन धर्माची तुलना कोरोना आणि डेंग्यू यांसारख्या आजारांशी केली होती. विशेष म्हणजे, द्रमुकचा इंडिया आघाडीत समावेश आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, तामिळनाडू सरकारमधील मंत्री उदयनिधी यांनी चेन्नईमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले की, 'द्रमुक कोणत्याही धर्माच्या विरोधात नाही, पण मशीद पाडून मंदिर बांधणे मान्य नाही.' यावेळी त्यांनी राज्याचा विरोधी पक्ष AIADMK या कार्यक्रमाला उपस्थित न राहण्यावरुनही प्रतिक्रिया दिली. उदयनिधी म्हणाले की, 'ही त्यांची वैयक्तिक बाब आहे.' ते पुढे म्हणाले की, 'त्यांनी आधीच कारसेवकांना अयोध्येला पाठवले आहे.'
मीडिया रिपोर्ट्सनुसार, उदयनिधी यांना तामिळनाडूचे उपमुख्यमंत्री बनवण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र, याबाबत पक्षाने अधिकृतपणे काहीही सांगितले नाही. खुद्द उदयनिधी यांनी ही अफवा असल्याचे म्हटले. ते राज्याचे माजी मुख्यमंत्री करुणानिधी यांचे नातू आहेत.
गेल्या वर्षी एका कार्यक्रमादरम्यान उदयनिधी यांनीही सनातन धर्माविरोधात वक्तव्य केले होते. ते म्हणाले होते की, 'काही गोष्टींना विरोध करता येत नाही. त्या दूर केल्या पाहिजेत. आपण डेंग्यू, मलेरिया किंवा कोरोनाव्हायरसचा प्रतिकार करु शकत नाही. ते मुळापासून उखडून टाकावे लागतात. त्याचप्रमाणे सनातनलाही उखडून टाकावे लागेल.' यानंतर मात्र त्यांच्या या वक्तव्याचा मोठा विरोध झाला होता.
सोमवारी (22 जानेवारी रोजी) उत्तर प्रदेशातील अयोध्येत राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार आहे. काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससह देशातील अनेक मोठ्या पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांनी कार्यक्रमात सहभागी होण्यास नकार दिला आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.