दक्षिण चीन समुद्रात रविवारी दुपारी अवघ्या ३० मिनिटांच्या अंतरात दोन अमेरिकन नौदलाची विमाने कोसळल्याची माहिती समोर आली आहे. यूएसएस निमित्झ या विमानवाहू जहाजावरून उड्डाण केलेले एक लढाऊ विमान आणि एक हेलिकॉप्टर अनुक्रमे समुद्रात कोसळले, अशी माहिती अमेरिकन नौदलाच्या पॅसिफिक फ्लीटने दिली आहे.
या दोन वेगळ्या पण जवळजवळ एकाचवेळी झालेल्या अपघातांमध्ये सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. सर्व पाच क्रू सदस्यांना वेळेत बचावण्यात नौदलाच्या बचाव पथकांना यश आले.
एमएच-६०आर सी हॉक हेलिकॉप्टरमधील तिघांना अपघातानंतर काही मिनिटांतच सुरक्षित बाहेर काढण्यात आले, तर एफ/ए-१८एफ सुपर हॉर्नेट लढाऊ विमानातील दोन्ही वैमानिकांनी आपत्कालीन परिस्थितीत स्वतःला बाहेर काढले.
नौदल अधिकाऱ्यांनी सांगितले की, सर्व कर्मचारी सुरक्षित असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. दोन्ही अपघातांचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही, मात्र प्राथमिक तपासणी सुरू करण्यात आली आहे.
यूएसएस निमित्झ हे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेत दीर्घकाळ तैनात राहिल्यानंतर सध्या अमेरिकेच्या वॉशिंग्टन राज्यातील किटसॅप नौदल तळावर परत येत आहे. येमेनमधील हुथी बंडखोरांकडून व्यावसायिक जहाजांवर होणाऱ्या हल्ल्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी ही तैनाती करण्यात आली होती. ही तैनाती निमित्झ जहाजाची अखेरची मोहीम असल्याचे नौदलाने स्पष्ट केले आहे, कारण लवकरच हे जहाज सेवेतून निवृत्त होणार आहे.
दरम्यान, अमेरिकन नौदलातील अपघातांची मालिका गेल्या काही महिन्यांपासून वाढताना दिसत आहे. याआधी यूएसएस हॅरी एस. ट्रुमन या विमानवाहू जहाजालाही अशाच प्रकारच्या दुर्घटनांचा सामना करावा लागला होता. डिसेंबर महिन्यात, यूएसएस गेटिसबर्ग या क्रूझरने चुकीने ट्रुमनचे एफ/ए-१८ जेट पाडले होते.
त्यानंतर एप्रिलमध्ये आणखी एक एफ/ए-१८ जेट रेड सी मध्ये कोसळले, आणि मे महिन्यात लँडिंग दरम्यान अशाच प्रकारचा अपघात झाला होता. ज्यामध्ये वैमानिकांना आपत्कालीन बाहेर पडावे लागले. सुदैवाने या सर्व घटनांमध्येही कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.