Rahul Gandhi Remarks: काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आपल्या वक्तव्यांमुळे अनेकदा वादात सापडतात. ते अनेकदा सरकारवर घणाघाती टीका करताना असे काही बोलून जातात ज्यामुळे वाद होतो. गेल्या दोन दशकांत त्यांनी अशी अनेक वक्तव्य केली, ज्यामुळे ते वादाच्या केंद्रस्थानी राहिले. परंतु आता "इंडियन स्टेटशी लढणे" या त्यांच्या ताज्या वक्तव्याने पुन्हा एकदा राळ उडवून दिली आहे.
दिल्लीतील नवीन काँग्रेस मुख्यालयाच्या उद्घाटनानंतर पक्ष कार्यकर्त्यांना संबोधित करताना राहुल गांधी यांनी भाजप आणि आरएसएसवर जोरदार हल्लाबोल केला. भाजप आणि आरएसएसने देशातील सर्व संस्थांवर कब्जा केल्याचा आरोप राहुल यांनी यावेळी केला.
राहुल म्हणाले की, "आपण भाजप, आरएसएस आणि इंडियन स्टेटविरुद्ध लढत आहोत. आपण निष्पक्ष लढाई लढत आहोत असे समजू नका, यामध्ये कोणतीही निष्पक्षता नाही. जर तुम्हाला असे वाटत असेल की, आपण भाजप किंवा आरएसएस नावाच्या राजकीय संघटनेशी लढत आहोत तर तुम्हाला काय चालले आहे ते समजणार नाही. भाजप आणि आरएसएसने आपल्या देशातील प्रत्येक संस्थावर कब्जा केला आहे.''
दुसरीकडे मात्र, संवैधानिक पदावर असणाऱ्या व्यक्तीने अशाप्रकारचे वक्तव्य करणे योग्य आहे का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. तथापि, राहुल गांधींकडून (Rahul Gandhi) देशाच्या एकात्मतेवर सवाल उपस्थित करण्याची ही पहिलीच वेळ नाहीये. त्यांनी जाहीरपणे म्हटले आहे की, "भारत हे एक राष्ट्र नाही" तर तो "राज्यांचा संघ" आहे.
राष्ट्रवादी विचारसरणीनुसार, अशी वक्तव्ये राष्ट्रवादाच्या मूलभूत तत्त्वांना कमकुवत करतात. राहुल यांच्या अशा वक्तव्यामुळे त्यांच्या हेतूवर सवाल उपस्थित होतो. त्यांच्या अलीकडील वक्तव्यांमुळे असा समज पक्का होतो की, ते भारताला एकसंध राष्ट्र-राज्य म्हणून पाहत नाहीत.
काँग्रेसच्या (Congress) विरोधकांचे म्हणणे आहे की, इंडियन स्टेटविरुद्ध एल्गार करुन राहुल गांधींनी अप्रत्यक्षपणे देशाच्या एकतेच्या प्रतीकांना जसे की, ध्वज, राष्ट्रगीत आणि संविधानाला लक्ष्य केले आहे. अशा प्रकारची वक्तव्ये देशाच्या सार्वभौमत्व आणि अखंडतेला आव्हान देतात.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.