मनिला: ‘‘हिंद-प्रशांत क्षेत्रातील सागरी सुरक्षा, विश्वासार्ह पुरवठा साखळी, नवीन तंत्रज्ञान आणि आपत्ती व्यवस्थापन अशा विविध क्षेत्रांत विश्वासार्ह उपाययोजना राबविण्यासाठी क्वाड (क्वाड्रिलॅटरल सिक्युरिटी डायलॉग) ही संघटना विधायक आणि विश्वासार्ह भागीदार आहे,’’ असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी केले. ‘क्वाड’च्या शिखर परिषदेत ते बोलत होते.
भारत, अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि जपान या चार देशांचा समावेश असलेला ‘क्वाड’ समूह प्रामुख्याने हिंद-प्रशांत क्षेत्रातील शांतता, सुरक्षा आणि स्थैर्य यांसाठी कार्यरत आहे. मनिला येथे झालेली ही परिषद ‘आसियान’ शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर पार पडली. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बनीज आणि जपानच्या पंतप्रधान सानाए ताकाइची परिषदेला उपस्थित होते.
मोदी म्हणाले, ‘‘गेल्या वर्षी जानेवारीपासून ‘क्वाड’ देशांच्या परराष्ट्रमंत्र्यांच्या पाच बैठका झाल्या आहेत. यातून या भागीदारीबाबतची आमची राजकीय इच्छाशक्ती आणि सामूहिक बांधिलकी स्पष्ट होते. भारतासाठी क्वाड ही विधायक आणि विश्वासार्ह भागीदारी आहे. सागरी सुरक्षेपासून विश्वासार्ह पुरवठा साखळीपर्यंत, नवीन तंत्रज्ञानापासून आपत्ती व्यवस्थापनापर्यंत हिंद-प्रशांत क्षेत्रासाठी विश्वासार्ह उपाययोजना उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न आहे.’’
‘‘आजची बैठक सहकार्याच्या पुढील टप्प्यासाठी ठोस उद्दिष्टे निश्चित करण्यास उपयुक्त ठरेल, असा मला विश्वास आहे,’’ असेही पंतप्रधानांनी नमूद केले. भारत, अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलिया या चार देशांच्या ‘क्वाड’ समूहाच्या नेत्यांच्या बैठकीत चार महत्त्वपूर्ण उपक्रमांची घोषणा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली.
मोदी कणखर नेते : ट्रम्प
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मंगळवारी ‘क्वाड’ देशांच्या नेत्यांच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक केले. मोदी हे कणखर व्यक्तिमत्त्वाचे नेते असून जगभरात त्यांचा आदर केला जातो, असे ट्रम्प म्हणाले. ‘‘ते माझे मित्र आहेत आणि एक महान नेते आहेत,’’ असेही त्यांनी आवर्जून नमूद केले. भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंधांवर भाष्य करताना ट्रम्प म्हणाले, ‘‘आमचे संबंध अत्यंत उत्तम आहेत. आम्ही एकमेकांशी समन्वय राखून जवळून काम करीत आहोत.’’ ‘क्वाड’ समूह हा जगातील काही अत्यंत यशस्वी भागीदारांपैकी एक असल्याचेही ट्रम्प यांनी म्हटले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.