पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम बंगालच्या मेदिनीपूर जिल्ह्यातील हल्दिया येथे झालेल्या जाहीर सभेत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर टीका करताना, गेल्या 10 वर्षात ममता सरकारने बंगालमधील लोकांना केवळ निर्ममतेची वागणूक दिल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. ममता बॅनर्जी यांनी 34 वर्षांची डाव्यांची भ्रष्टाचारी व जुलमी सत्ता उलथून बंगाल मिळवल्यानंतर संपूर्ण देशाचे लक्ष त्यांच्याकडे होते. मात्र त्यानंतर त्या पूर्णपणे अपयशी ठरल्या असल्याचे नरेंद्र मोदी यांनी सभेत सांगितले.
पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांनी परिवर्तनाचा नारा देत भ्रष्टाचारी व जुलमी डाव्यांची सत्ता काढून फेकत राज्य काबीज केले होते. मात्र त्यानंतर मागील 10 वर्षात ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने राज्याला फक्त आणि फक्त निर्ममतेचीच वागणूक दिली असल्याची टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. याशिवाय मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या सरकारवर निशाणा साधताना त्यांचे सरकार भ्रष्टाचारात बुडाले असल्याचे नरेंद्र मोदी म्हणाले. चक्रीवादळादरम्यान केंद्र सरकारने मदत म्हणून पाठविलेल्या पैशांचा तृणमूल कॉंग्रेसचे नेते आणि कार्यकर्त्यांनी गैरवापर केल्याचा आरोप देखील नरेंद्र मोदी यांनी यावेळेस केला.
याशिवाय, भारत माता की जय अशी घोषणा दिल्यानंतर ममता बॅनर्जी यांना राग येतो आणि जेंव्हा कोणी देशाविरुद्ध बोलतात त्यावेळेस ममता बॅनर्जी या शांत बसतात, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी सभेत बोलताना म्हणाले. तसेच पश्चिम बंगाल मध्ये भारतीय जनता पक्षाचे सरकार आल्यास सर्वात प्रथम पंतप्रधान किसान सम्मान योजना लागू करण्यात येणार असल्याचे आश्वासन नरेंद्र मोदी यांनी यावेळेस दिले. इतकेच नाही तर, शेतकऱ्यांची उर्वरित थकबाकी देखील देण्यात येणार असल्याचे त्यांनी पुढे सांगितले. त्यानंतर, पश्चिम बंगालच्या जनतेने यंदा बुवा-भतीजा यांच्या सरकारला राम-राम म्हणण्याचा निर्णय पक्का केला असून, लवकरच सध्याचे सरकार जाणार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळेस म्हणाले.
तसेच, ममता बॅनर्जी यांच्या सरकारवर हल्लाबोल करताना, तृणमूल आणि त्यांचे सिंडिकेट हे काही दिवसांचेच पाहुणे असल्याचा टोला नरेंद्र मोदी यांनी यावेळेस लगावला. आणि त्यांच्यापासून कोणाला घाबरण्याची गरज नसल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. सभेत पुढे बोलताना नरेंद्र मोदी यांनी ममता बॅनर्जींचा तृणमूल पक्ष, काँग्रेस आणि डावे हे पडद्यामागून फिक्सिंग करत असल्याचा गंभीर आरोप देखील त्यांनी केला. दिल्लीत या तिन्ही पक्षाचे नेते बंद दाराआड भेटून रणनीती आखत असल्याचे ते म्हणाले. व केरळ मध्ये काँग्रेस आणि डावे दर पाच वर्षांनी आलटून-पालटून जनतेला लुटत असल्याचा आरोप नरेंद्र मोदी यांनी केला.
त्यानंतर, राज्यातील शेतकऱ्यांविषयी बोलताना ममता बॅनर्जी यांच्या सरकारने अन्यायाची वागणूक दिली असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. राज्यात चहा कामगारांच्या रोजगारावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला जात आहे. आणि यावर मुख्यमंत्री काहीच करत नसल्याचे ते म्हणाले. तसेच शेतकऱ्यांच्या हातात थेट पैसे जावेत म्हणून ममता बॅनर्जी यांचे सरकार काहीच करत नसल्याचे नरेंद्र मोदी यांनी सांगून, आतापर्यंत फक्त 25 लाख रुपयांपैकी सहा हजार रुपये शेतकऱ्यांना पाठविण्यात आल्याचे ते म्हणाले. याव्यतिरिक्त, जय श्रीराम असा जयघोष केल्यास ममता बॅनर्जी यांना राग येतो आणि माँ, माटी व मानुष म्हणून घेणाऱ्या सरकारची संवेदनशीलता जनता बघत असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सभेत बोलताना म्हणाले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.