Morbi Bridge Collapse: गुजरातमधील मोबरी पुल दुर्घटनेतील मृतांचा आकडा १३५ वर गेला असून यामध्ये ४० बालकांचा समावेश आहे. याबाबत एक याचिका दाखल झाल्याने हे प्रकरण आता सर्वोच्च न्यायालयात पोहचले आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आज, मंगळवारी या दुर्घटनेतील जखमींची रूग्णालयात भेट घेणार आहेत.
काँग्रेस, 'आप'ची टीका
पंतप्रधान मोदींच्या रूग्णालय भेटीच्या पार्श्वभुमीवर मोरबीतील रूग्णालयाची रंगरंगोटी केली गेली. त्यावरून काँग्रेस आणि आम आदमी पक्षाने पंतप्रधान मोदींसह भाजप सरकारवर निशाणा साधला आहे. मोदींच्या फोटोशुटमध्ये रूग्णालयाच्या वाईट भिंती दिसू नयेत आणि रूग्णालयाची पोल खोल होऊ नये, म्हणून रातोरात रूग्णालयात रंगरंगोटी केली जात आहे, असे आपने म्हटले आहे. तर रूग्णालयाच्या रंगवलेल्या भिंती आणि नव्या फरशांमुळे कदाचित जखमींना बरे वाटेल, असा टोला काँग्रेसने लगावला आहे.
सुप्रीम कोर्टात याचिका
न्यायिक आयोग बनवून या प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी अॅड. विशाल तिवारी यांनी जनहित याचिकेतून सर्वोच्च न्यायालयात केली गेली आहे. राज्य सरकारला न्यायिक आयोग बनविण्याचे निर्देश द्यावेत. तसेच देशातील संरक्षित वास्तु लोकांसाठी सुरक्षित आहे की नाहीत, हे तपासण्याची मागणी केली गेली आहे. यासाठी विशेष विभाग बनवावा, असेही याचिकेत म्हटले आहे.
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांकडून शोक व्यक्त
मोरबी दुर्घटनेवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनीही शोक व्यक्त केला आहे. आमची मने भारतासोबत आहे. जिल आणि मी गुजरातच्या जनतेसोबत या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुबियांच्या दुःखात सहभागी आहोत, असे बायडेन यांनी म्हटले आहे. या कठिण काळात आम्ही भारतीयांच्या पाठिशी आहोत.
बुधवारी राज्यात दुखवटा
या प्रकरणात आत्तापर्यंत 9 जणांना अटक केली गेली आहे. विशेष म्हणजे ही दुर्घटना घडली तेव्हा पंतप्रधान मोदी हे गुजरात दौऱ्यावर होते. त्यांनी अनेक कार्यक्रम नंतर रद्दही केले. आढावा बैठक घेतली. यात दुर्घटनेतील मृतांना श्रद्धांजली वाहिण्यासाठी 2 नोव्हेंबर रोजी राज्यव्यापी दुखवट्याची घोषणा केली आहे. त्या दिवशी राज्यात तिरंगा ध्वज अर्ध्यावर फडवकला जाईल.
पंतप्रधान मोदींनी पंतप्रधान नॅशनल रिलीफ फंडातून मृतांच्या कुटूंबियांना प्रत्येकी दोन लाख तर जखमींना 50 हजार रूपयांची नुकसान भरपाईची घोषणा केली आहे. तर गुजरात सरकारने मृतांना 4 लाख आणि जखमींना 50 हजार रूपये मदत दिली आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.