भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्धबंदी झाल्यानंतर तणाव काहीसा निवळला आहे. पाकड्यांच्या भ्याड हल्ल्यांना भारताने चोख उत्तर दिले. भारतीय लष्कराने भारतीय सीमेत राहून पाकिस्तानातील दहशतवाद्यांच्या तळांना लक्ष्य केले. भारताच्या या लष्करी कारवाईत हवाई दलाने महत्त्वाची भूमिका निभावली. अत्याधुनिक शस्त्रप्रणालीच्या जोरावर भारत या संघर्षात एक पाऊल पुढे होता. राफेल, S-400 हवाई प्रणालीचा भारताने पाकिस्तानविरोधात वापर केला. भारतीय लष्कराचे मनोबल उंचावण्यासाठी खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी (13 मे) पंजाबमधील आदमपूर एअरबेसवर पोहोचले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी आज पंजाबमधील आदमपूर एअरबेसला भेट दिली. जिथे त्यांनी 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये महत्त्वाची भूमिका निभावलेल्या भारतीय लष्करांची भेट घेतली. यानंतर लष्कराला संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, ''संपूर्ण जगाने भारत माता की जयची शक्ती पाहिली. भारत माता की जय म्हणताच शत्रू थरथर कापायला लागतात. भारत माता की जयचा जयघोष रण मैदान आणि मिशनमध्ये केला जातो.''
पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले की, ''आजपासून अनेक दशकांनंतरही जेव्हा भारताच्या या शौर्याची चर्चा होईल, तेव्हा तुम्ही आणि तुमचे सहकारी या चर्चेच्या केंद्रस्थानी असतील. तुम्ही सर्वजण भावी पिढ्यांसाठी एक नवीन प्रेरणा बनला आहात. आज या वीरांच्या भूमीतून मी हवाई दल, नौदल आणि लष्करातील सर्व शूर सैनिकांना आणि बीएसएफच्या आपल्या वीरांना सलाम करतो. तुमच्या शौर्यामुळे, ऑपरेशन सिंदूर जगभर गाजत आहे. प्रत्येक भारतीय तुमच्यासोबत आहे. आज देशातील प्रत्येक नागरिक आपल्या सैनिकांच्या कुटुंबियांप्रती कृतज्ञ आहे.''
पंतप्रधान पुढे असेही म्हणाले की, ''ऑपरेशन सिंदूर हे सामान्य नव्हते. हे भारताच्या धोरणाचे, हेतूंचे आणि निर्णय घेण्याच्या क्षमतेचा त्रिवेणी संगम ठरले. भारत ही युद्धभूमी आहे. धर्म स्थापनेसाठी शस्त्र उचलणे ही आपली परंपरा राहिली आहे. जेव्हा पहलगाममध्ये आपल्या आयाबहिणींचे कूंकू पुसण्यात आले तेव्हा आम्ही दहशतवाद्यांच्या घरात घुसून मारण्याचा संकल्प केला होता. दहशतवाद्यांचा बिमोड करण्यासाठी भारताने (India) पाकिस्तानात घुसून कारवाई केली.''
तुम्ही समोरुन हल्ला करुन दहशतवाद्यांचा खात्मा केला. तुम्ही दहशतवाद्यांचे 9 तळ उद्ध्वस्त केले. तसेच 100 हून अधिक दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. आता दहशतवाद्यांना समजलं असेल की भारताकडे वाकड्या नजरेने पाहण्याचे काय परिणाम होऊ शकतात, असेही पंतप्रधानांनी शेवटी नमूद केले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.