पाकिस्तान आपल्या नापाक कारवाया थांबवण्याचं नाव घेत नाहीये. आता पाकिस्तानी दहशतवादी आणि बंगळुरुतील रामेश्वर कॅफे स्फोटाचा मास्टरमाईंड फरहतुल्ला घोरी याने भारतातील सर्व रेल्वे गाड्या क्रॅश करण्याची धमकी दिली आहे. घोरीने दहशतवादी संघटनेशी संबंधित सदस्यांना दिल्ली आणि मुंबईसह मोठ्या शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर रेल्वे गाड्या रुळावरुन क्रश करण्यासाठी कोणतेही पाऊल उचलण्याचे आवाहन केले आहे. या धमकीनंतर गुप्तचर यंत्रणेचीही चिंता वाढली आहे. अशा स्थितीत घोरीच्या या धमकीनंतर आता भारतीय रेल्वेवरील तोडफोडीच्या घटनांशी काही संबंध आहे का, याचा शोध घेतला जात आहे.
दरम्यान, भारताच्या मोस्ट वॉन्टेडच्या यादीत फरहतुल्ला घोरीचे नाव आहे. घोरीने प्रामुख्याने आपल्या दहशतवादी सदस्यांना भारतात अराजकता आणि दहशत पसरवण्याच्या सूचना दिल्या आहेत. रेल्वे लाईन, पेट्रोल पाईपलाईन आणि लॉजिस्टिकवर हल्ला करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. भारतातील पेट्रोल पाइपलाइन आणि रसद पुरवठ्याला लक्ष्य करा आणि नष्ट करा, असे घोरीने स्पष्टपणे म्हटले आहे. भारताची वाहतूक व्यवस्था उद्ध्वस्त करा म्हणजे ते नष्ट होतील, असेही त्याने पुढे म्हटले आहे.
आपल्या धमकीमध्ये घोरीने रेल्वे गाड्या रुळावरुन क्रश करण्याच्या धमकीवर जोर दिलाय. सुरक्षा यंत्रणा या प्रकरणाचा तपास करत आहेत. नुकतेच 23 आणि 24 ऑगस्ट रोजी वंदे भारत ट्रेन रुळावरुन घसरवण्याचा प्रयत्न झाला होता. रुळांवर कोणीतरी सिमेंटचे ब्लॉक टाकले होते. अशा परिस्थितीत दहशतवादी धमकीनंतर हे पाऊल उचलले गेले का, याचा तपास केला जात आहे.
घोरीने आपल्या दहशतवादी सदस्यांना भारतातील हिंदू नेते आणि पोलीस कर्मचाऱ्यांनाही लक्ष्य करण्याचे आवाहन केले आहे. त्याने आत्मघातकी हल्ले करण्याचेही आवाहन केले आहे. यापूर्वीही, घोरीचे नाव अनेक दहशतवादी कारवायामध्ये आले आहे. 2002 मध्ये गांधीनगरमधील अक्षरधाम मंदिरावरील हल्ल्यासह भारतीय एजन्सी त्याला अनेक हाय-प्रोफाइल हल्ल्यांशी जोडते. तर आता घोरीच्या धमकीला भारत पाकिस्तानची इंटर-सर्व्हिसेस इंटेलिजन्स अर्थात ISI ची रणनीती मानत आहे.
गेल्या वर्षी दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने घोरीद्वारे चालवल्या जाणाऱ्या इस्लामिक स्टेटशी संबंधित मॉड्यूलचा पर्दाफाश केला होता. सध्या त्याच्या या धमकीनंतर गुप्तचर यंत्रणा आणि पोलीस सतर्क झाले आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.