पाकिस्तानच्या अशांत उत्तर-पश्चिम भागात कारमध्ये रिमोट-नियंत्रित स्फोटात माजी खासदार आणि इतर तीन जण ठार झाले. याबाबत माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, अफगाणिस्तानच्या सीमेला लागून असलेल्या मामोंड बाजौर या आदिवासी बहुल जिल्ह्याच्या दामाडोला भागात हा स्फोट झाला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्फोटाच्या वेळी पाकिस्तानी संसदेचे वरिष्ठ सभागृह असलेल्या सिनेटचे माजी सदस्य हिदायतुल्ला पोटनिवडणुकीत त्यांचा पुतण्या नजीबुल्ला खान यांच्या प्रचारासंदर्भात तिथे उपस्थित होते. पीके 22 प्रांतीय विधानसभा मतदारसंघात 12 जुलै रोजी पोटनिवडणूक होणार आहे.
खैबर पख्तूनख्वा (Khyber Pakhtunkhwa) प्रांताचे मुख्यमंत्री अली अमीन गंडापूर आणि मुख्य सचिव नदीम अस्लम चौधरी यांनी या स्फोटाचा निषेध केला आहे. राष्ट्रपती आसिफ अली झरदारी यांनीही या हल्ल्याचा निषेध केला आणि माजी सिनेटर आणि इतरांच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला. हिदायतुल्ला हे 2012 ते 2018 आणि पुन्हा 2018 ते 2024 पर्यंत सिनेटचे स्वतंत्र सदस्य होते.
याशिवाय ते वरिष्ठ सभागृहाच्या वाहतूकविषयक स्थायी समितीचे अध्यक्ष आणि राष्ट्रीय दहशतवाद विरोधी प्राधिकरणाचे (NACTA) सदस्य होते. हिदायतुल्ला यांचे वडील हाजी बिस्मिल्ला खान हे देखील MNA होते तर त्यांचा मोठा भाऊ शौकतुल्ला खान खैबर पख्तुनख्वाचे माजी राज्यपाल होते.
यावर्षी जानेवारीमध्ये त्यांनी सिनेट सचिवालयात एक प्रस्ताव मांडला होता, ज्यामध्ये असे म्हटले होते की, संसदेच्या वरिष्ठ सभागृहाने उमेदवारांना लक्ष्य करुन होणाऱ्या हल्ल्यांची दखल घेतली आहे.
सुरक्षेच्या आव्हानांमुळे सार्वत्रिक निवडणुका 3 महिन्यांनी पुढे ढकलण्याची विनंती या ठरावात पाकिस्तान निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयाला (Supreme Court) करण्यात आली आहे. मात्र, पाकिस्तानात पुढच्याच महिन्यात 8 फेब्रुवारीला निवडणुका झाल्या.
पोटनिवडणुकीत आपल्या भाच्याचा प्रचार करताना हिदायतुल्ला यांनाही जीव गमवावा लागला हा योगायोग आहे. आतापर्यंत कोणत्याही संघटनेने हल्ल्याची जबाबदारी घेतलेली नाही.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.