P Chidambaram On Operation Blue Star: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांनी ‘ऑपरेशन ब्लू स्टार’ संदर्भात एक मोठे आणि महत्त्वपूर्ण वक्तव्य करुन खळबळ उडवून दिली. ऑपरेशन ब्लू स्टार ही एक मोठी चूक होती, ज्याची किंमत तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांना आपला जीव देऊन चुकवावी लागली, असे चिदंबरम यांनी म्हटले. माजी गृह आणि अर्थमंत्री असलेले पी. चिदंबरम यांनी हिमाचल प्रदेशातील कसौली येथे आयोजित खुशवंत सिंग साहित्य महोत्सवात (Khushwant Singh Literature Festival) बोलताना हे मत व्यक्त केले.
शनिवारी (11 ऑक्टोबर) खुशवंत सिंग लिटरेचर फेस्टिव्हलमध्ये पत्रकार हरिंदर बावेजा यांच्या ‘दे विल शूट यू, मॅडम’ (They Will Shoot You, Madam) या ‘ऑपरेशन ब्लू स्टार’ आणि त्यानंतरच्या परिस्थितीवर आधारित पुस्तकाच्या चर्चेत चिदंबरम सहभागी झाले होते. याचवेळी त्यांनी ऑपरेशन ब्लू स्टार चुकीचा निर्णय असल्याचे स्पष्ट केले.
चिदंबरम पुढे म्हणाले की, ऑपरेशन ब्लू स्टारचा निर्णय केवळ तत्कालीन पंतप्रधानांचा (इंदिरा गांधी) नव्हता, तर तो एक सामूहिक निर्णयाचा (Joint Decision) परिणाम होता. ते पुढे म्हणाले, "या निर्णयामध्ये लष्कर, पोलीस, गुप्तचर विभाग आणि नागरी सेवा (Civil Services) या सर्वांची संमती होती. हा निर्णय सर्वांच्या सहमतीने घेतला गेला होता, मात्र यासाठी फक्त इंदिरा गांधींना (Indira Gandhi) दोषी ठरवले जाते, जे पूर्णपणे चुकीचे आहे."
चिदंबरम यांनी ऑपरेशन ब्लू स्टारच्या पद्धतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ते म्हणाले, "मी कोणत्याही लष्करी अधिकाऱ्याचा अनादर करत नाही, परंतु सुवर्ण मंदिर (Golden Temple) परत मिळवण्याचा तो चुकीचा मार्ग होता. काही वर्षांनंतर आम्ही लष्कराला बाहेर ठेवून सुवर्ण मंदिर पुन्हा ताब्यात घेण्याचा योग्य मार्ग दाखवला." या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा जुन्या राजकीय निर्णयांवर आणि त्यांच्या परिणामांवर चर्चा सुरु होण्याची शक्यता आहे.
यावेळी बोलताना पी. चिदंबरम यांनी पंजाबच्या सद्यस्थितीवरही भाष्य केले. ते म्हणाले की, आज पंजाबमध्ये (Punjab) खालिस्तानची मागणी पूर्णपणे संपुष्टात आली आहे. ही मागणी आणि घोषणा आता शांत झाली. याउलट, आज पंजाबची खरी समस्या आर्थिक परिस्थिती आहे. मोठ्या संख्येने अवैध स्थलांतरित पंजाबमधून परदेशात गेले आहेत आणि लोक पंजाब सोडून इतर देशांमध्ये राहत आहेत.
पी. चिदंबरम अनेकदा त्यांच्या स्पष्ट आणि काहीवेळा वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. अनेकदा त्यांच्या वक्तव्यांमुळे भाजप आणि इतर पक्षांकडून टीका होते, तर काहीवेळा त्यांच्या पक्षालाही विरोधकांच्या टीकेचा सामना करावा लागतो.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.