नवी दिल्ली: ‘नीट’ पेपरफुटीची जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, या मागणीसाठी कॉक्रोच जनता पक्षाने शनिवारी दिल्लीच्या जंतरमंतरवर आंदोलन केले. पक्षाचे संस्थापक अभिजित दीपके अमेरिकेतून आल्यानंतर या आंदोलनाला सुरुवात झाली. सकाळी साडेदहा ते दुपारी साडेतीनपर्यंत चाललेल्या या आंदोलनामध्ये तरुणाई मोठ्या संख्येने उतरली होती. आता प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी शनिवारी (ता. १३ जून) पुन्हा जंतरमंतरवर आंदोलन करण्यात येणार आहे.
दीपके शनिवारी सकाळी साडेसात वाजता अमेरिकेच्या बोस्टन येथून दिल्ली येथे पोहोचले. या वेळी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आत्मचरित्र आणि राज्यघटनेची प्रत घेऊन ते विमानतळाबाहेर पडले. जंतरमंतरवर आंदोलन करण्याची परवानगी घेण्यासाठी त्यांनी संसद मार्ग पोलिस ठाणे गाठले.
त्यांचा अर्ज अनपेक्षितपणे मंजूर करीत संसद मार्ग पोलीस ठाण्याच्या अतिरिक्त उपायुक्तांनी अटी आणि शर्तींवर सकाळी १० ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत आंदोलन करण्याची परवानगी दिली. त्यामुळे आंदोलकांना संसद मार्ग पोलिस ठाण्याऐवजी थेट जंतरमंतर गाठण्याचे आवाहन दीपके यांनी केले.
त्यानंतर दिल्ली आणि आसपासचे शहर तसेच विविध राज्यांतून आलेल्या आंदोलकांमुळे जंतरमंतर गर्दीने फुलून गेले.
धर्मेंद्र प्रधान यांनी पाच दिवसात राजीनामा द्यावा, अन्यथा १३ जून रोजी पुन्हा जंतरमंतरवर आंदोलन करण्याचा इशारा कॉक्रोच जनता पक्षाने दिला आहे. दीपकेसह प्रसिद्ध शिक्षण आणि पर्यावरणतज्ज्ञ सोनम वांगचुक, पक्षाचे प्रवक्ते सौरभ दास, आशुतोष रांका आणि विजेता दहिया यांनी आंदोलकांना पाच तास संबोधित केले. आजच्या प्रतिसादासाठी दीपके यांनी सर्वांचे आभार मानले. आजचे आंदोलन संपवून घरी परतत असल्याची पोस्ट ‘एक्स’वर केली.
दीपके म्हणाले, ‘‘सरकारने आम्हाला अनेक वर्षे हिंदू-मुस्लिम राजकारणात फसवून ठेवले. त्याने कोणाला नोकऱ्या मिळत नाहीत. दिल्लीत विमान पोहोचत असताना आपण स्वातंत्र्याचा शेवटचा क्षण जगत असल्याचे वाटत होते.
आजचे आंदोलन केवळ ट्रेलर होते. धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला नाही, तर कॉक्रोच जनता पक्ष देशातील विविध शहरांमध्ये आंदोलन करेल. तरुणांचा आवाज केवळ इंटरनेटपुरता मर्यादित नसल्याचे आज हजारोंच्या प्रत्यक्ष उपस्थितीने सिद्ध केले आहे. व्यवस्था कुजली की कॉक्रोच बाहेर निघतात. ही व्यवस्थेची चूक आहे. - अभिजित दीपके
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.