भारताने मोबाईल निर्मितीमध्ये एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे, देशात वापरल्या जाणाऱ्या जवळपास 99 टक्के उपकरणांचे उत्पादन देशांतर्गत केले जाते. केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री जितिन प्रसाद यांनी संसदेत बोलताना ही माहिती दिली. गेल्या दशकभरात देशांतर्गत इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रात भरीव वाढ झाली आहे.
दरम्यान, भारतातील इलेक्ट्रॉनिक्सचे उत्पादन मूल्य 2014-15 च्या 1,90,366 कोटी रुपयांवरुन FY2023-24 मध्ये 9,52,000 कोटी रुपयांपर्यंत वाढले आहे. ही 17 टक्क्यांपेक्षा जास्त वार्षिक वाढ दर (CAGR) दर्शवते. एकेकाळी स्मार्टफोनचा प्रमुख आयातदार असणारा भारत आता मोठा निर्यातदार बनला आहे.
FY2014-15 मध्ये, देशात विकले गेलेले सुमारे 74 टक्के मोबाईल फोन आयात केले गेले होते. मात्र आता भारत 99.2 टक्के मोबाईल उत्पादन देशांतर्गत बनवतो. हा बदल इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनातील भारताच्या वाढत्या क्षमता आणि मोबाईल निर्यात करणारा देश म्हणून उदयास येण्यावर प्रकाश टाकतो.
प्रसाद यांनी पुढे नमूद केले की, इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्राने प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरीत्या सुमारे 25 लाख नोकऱ्या निर्माण केल्या आहेत. या वाढीचे श्रेय उद्योगाला चालना देण्याच्या उद्देशाने विविध सरकारी उपक्रमांना दिले जाते.
सरकारने 76,000 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह (Investment) सेमीकॉन इंडिया कार्यक्रम सुरु केला आहे. या उपक्रमाचा उद्देश देशातील सेमीकंडक्टर आणि डिस्प्ले मॅन्युफॅक्चरिंग इकोसिस्टम विकसित करणे आहे. याव्यतिरिक्त, मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी हार्डवेअर उत्पादनास समर्थन देण्यासाठी इतर योजना आहेत.
प्रॉडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्ह (PLI) योजना आणि इलेक्ट्रॉनिक उत्पादने आणि सेमीकंडक्टर्स (SPECS) च्या निर्मितीला प्रोत्साहन देण्याची योजना या प्रयत्नांपैकी आहेत. जागतिक इलेक्ट्रॉनिक्स बाजारपेठेत भारताची स्पर्धात्मकता वाढवणे हे या उपक्रमांचे उद्दिष्ट आहे, असेही पुढे प्रसाद यांनी सांगितले.
दुसरीकडे, भारताच्या (India) इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनाला इतर राष्ट्रांच्या तुलनेत आव्हानांचा सामना करावा लागतो. जसे की, उच्च भांडवली खर्चाची आवश्यकता, दीर्घ कालावधी आणि उत्पादन प्रमाणावरील स्पर्धात्मकतेवर परिणाम करणारे घटक. याशिवाय, जागतिक प्लेयरसोबत गुणवत्ता आणि सर्वसामान्यांना परवडणारी किंमत ही देखील आव्हान आहेत. इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन क्षेत्रातील भारताच्या प्रगतीवर चर्चा करताना प्रसाद यांनी या मुद्द्यांवर प्रकाश टाकला. या आव्हानांना सामोरे जाणे हे विकास टिकवून ठेवण्यासाठी आणि जागतिक बाजारपेठेत भारताचे स्थान अधिक मजबूत करण्यासाठी महत्त्वाचे आहे.
दरम्यान, एक मजबूत सेमीकंडक्टर इकोसिस्टम विकसित करण्यावर सरकारचे लक्ष भारताच्या इलेक्ट्रॉनिक्स उद्योगाला आणखी मजबूत करेल अशी अपेक्षा आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.