LPG Cylinder Price Hike Dainik Gomantak
देश

LPG Cylinder Price Hike: सर्वसामान्यांना मोठा दणका, गॅस सिलिंडरच्या किमतीत पुन्हा मोठी वाढ; आजपासून नवे दर लागू

1 June 2026 Cylinder Price Hike: सर्वसामान्यांच्या खिशाला पुन्हा एकदा कात्री लागली आहे. तेल कंपन्यांनी व्यावसायिक (कमर्शियल) गॅस सिलिंडरच्या किमतीत मोठी वाढ केली आहे.

Sameer Amunekar

सर्वसामान्यांच्या खिशाला पुन्हा एकदा कात्री लागली आहे. तेल कंपन्यांनी व्यावसायिक (कमर्शियल) गॅस सिलिंडरच्या किमतीत मोठी वाढ केली आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर, विशेषतः मिडल ईस्टमध्ये (मध्य पूर्व) सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे देशात गॅसच्या किमती सातत्याने वाढत आहेत. २८ फेब्रुवारीपासून आतापर्यंत व्यावसायिक सिलिंडरच्या दरात तब्बल १३७३ रुपयांची वाढ झाली असून, यात गेल्या महिन्यातील ९९३ रुपयांच्या मोठ्या दरवाढीचाही समावेश आहे. या ताज्या दरवाढीमुळे आता हॉटेल व्यावसायिक, केटरिंग आणि छोट्या दुकानदारांना सिलिंडर खरेदीसाठी जास्त पैसे मोजावे लागणार आहेत.

प्रमुख शहरांमधील व्यावसायिक सिलिंडरचे नवे दर

नवीन दरवाढीनुसार, राजधानी दिल्लीत १९ किलोचा कमर्शियल सिलिंडर ४२ रुपयांनी महागला असून तो आता ३११३.५० रुपयांना मिळणार आहे. मुंबईत हा दर ३०२४ रुपयांवरून ३०६७.५० रुपयांवर पोहोचला आहे. कोलकात्यात सर्वाधिक ५३ रुपयांची वाढ झाल्याने तेथील किंमत ३२५५.५० रुपये झाली आहे.

याशिवाय बंगळुरूमध्ये ३१९८ रुपये, चेन्नईमध्ये ३२८३ रुपये, लखनऊमध्ये ३२३६ रुपये, जयपूरमध्ये ३१५५ रुपये आणि अहमदाबादमध्ये ३१३५ रुपयांना व्यावसायिक सिलिंडर विकला जाईल. या वाढत्या किमतींमुळे देशभरातील व्यावसायिक गॅस ग्राहकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

घरगुती सिलिंडरच्या दरात कोणताही बदल नाही

एकीकडे व्यावसायिक सिलिंडर महाग होत असताना, घरगुती ग्राहकांसाठी मात्र दिलासादायक बातमी आहे. तेल कंपन्यांनी १४.२ किलोच्या घरगुती स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल केलेला नाही.

त्यामुळे दिल्लीत घरगुती सिलिंडर ९१३ रुपये, जयपूरमध्ये ९१६.५ रुपये आणि अहमदाबादमध्ये ९२० रुपयांनाच उपलब्ध असेल. मात्र, युद्ध सुरू झाल्यापासून घरगुती सिलिंडरच्या किमतीतही एकूण ६० रुपयांची वाढ आधीच झालेली आहे.

लहान आणि मोठ्या सिलिंडरचे दरही बदलले

व्यावसायिक सिलिंडरसोबतच ५ किलोच्या छोट्या नॉन-डोमेस्टिक सिलिंडरच्या दरात ११ रुपयांची वाढ करण्यात आली आहे, ज्यामुळे दिल्लीत त्याची किंमत ८२१.५० रुपये झाली आहे. औद्योगिक क्षेत्रासाठी वापरल्या जाणाऱ्या ४७.५ किलोच्या मोठ्या एलपीजी सिलिंडरची किंमत १०५ रुपयांनी वाढून ७७७९.५० रुपये झाली आहे.

तसेच, सर्वात मोठ्या ४२५ किलोच्या एलपीजी सिलिंडरची किंमत आता ६९,६५१ रुपयांवर पोहोचली आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या एक्स्ट्रा तेज आणि नॉनकट सिलिंडरच्या किमतीतही त्यानुसार वाढ करण्यात आली आहे.

सर्वसामान्यांच्या खिशावर काय होणार परिणाम?

व्यावसायिक सिलिंडरचे दर वाढल्यामुळे त्याचा थेट परिणाम हॉटेल, रेस्टॉरंट आणि रस्त्यावरील खाद्यपदार्थांच्या गाड्यांवर होणार आहे. हॉटेलमधील जेवण महाग होण्याची शक्यता असून तरुणांचे आवडते जंक फूड, चहा आणि कॉफीचे दरही वाढू शकतात.

याशिवाय, लग्नसराईच्या हंगामात केटरिंगचा खर्च वाढल्यामुळे लग्नकार्याचा बजेट देखील वाढणार आहे. परिणामी, ही दरवाढ अप्रत्यक्षपणे सर्वसामान्यांचे आर्थिक गणित बिघडवणारी ठरणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope: जूनचा पहिलाच दिवस 'या' राशींसाठी ठरणार 'गोल्डन डे'; करिअरमध्ये सुवर्णसंधी, बँक बॅलन्स वाढणार

IPL 2026 Final: आरसीबीने रचला इतिहास! गुजरातचा धुव्वा उडवत दुसऱ्यांदा कोरलं 'आयपीएल' ट्रॉफीवर नाव, किंग कोहलीचा 'विराट' शो!

गोव्याकडे येणारी बस अंकोल्यात उलटली; एकाचा मृत्यू, 20 प्रवासी गंभीर जखमी; चालकाचे सुटले नियंत्रण

Stray Cattles: डिचोलीतील चौपदरी बगलमार्गावर मोकाट गुरांचा उपद्रव कायम, अपघातांचा धोका; दोन वर्षांत 15 गुरांचे बळी

Dabolim Airport: दाबोळी विमानतळ अव्वल दहातून बाहेर! 3 महिन्यांत 3.21 लाख प्रवासी कमी; विमान वाहतुकीत मंदीचे संकेत

SCROLL FOR NEXT