नवी दिल्ली,
या वर्षातील पहिले सूर्यग्रहण 21 जून 2020 रोजी सकाळी 10:25 पासून भारताच्या उत्तरेकडील भागातून पाहता येईल. या संदर्भात, नैनितालच्या आर्यभट्ट खगोलशास्त्र संशोधन संस्थेने (एआरआयईएस), तसेच विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग (डीएसटी) या सरकारच्या स्वायत्त संस्थेने 19 जून 2020 रोजी दुपारी 03:30 वाजता आर्यभट्ट संशोधन संस्थेचे संचालक प्रा. दिपंकर बॅनर्जी यांचे ‘सूर्यग्रहणांचे विज्ञान’ या विषयावर खास व्याख्यान आयोजित केले आहे. शिवाय झूम, यूट्यूब आणि फेसबुकच्या माध्यमातून सूर्यग्रहणाच्या थेट प्रक्षेपणाची व्यवस्था केली आहे.
हे सूर्यग्रहण आफ्रिका, आशिया व युरोपच्या काही भागांतून पाहता येईल आणि विशेष म्हणजे उत्तर भारतातून हे कंकणाकृती सूर्यग्रहण पाहता येणार आहे. रविवारी सकाळी 10:25 वाजता सुरु होणारे ग्रहण दुपारी 12:08 वाजता पूर्णावस्थेत दिसेल; तर दुपारी 01:54 वाजता ग्रहण सुटेल. 26 डिसेंबर, 2019 रोजी दक्षिण भारतातून कंकणाकृती सूर्यग्रहण दिसले होते आणि देशातील विविध भागांमधून खंडग्रास ग्रहण दिसले होते. भारतात यापुढील कंकणाकृती सूर्यग्रहण पुढील दशकात म्हणजे 21 मे 2031 रोजी तर खग्रास सूर्यग्रहण 20 मार्च 2034 रोजी दिसेल.
जेव्हा चंद्राच्या छायेमुळे (अमावस्येला) सूर्य आंशिक किंवा पूर्णपणे झाकला जातो तेव्हा अनुक्रमे खंडग्रास, कंकणाकृती किंवा खग्रास सूर्यग्रहण होते. सूर्य ग्रहणावेळी चंद्राची सावली पृथ्वीवर पडते आणि गडद भाग तयार होतो ज्याला अंब्र म्हणतात आणि तुलनेने कमी गडद भागाला पेनंब्र म्हणतात. सूर्यग्रहणांपैकी खग्रास सूर्यग्रहण हे क्वचित दिसते. जरी प्रत्येक महिन्यात अमावस्या असली तरी दरवेळी सूर्यग्रहण होत नाही. पृथ्वी आणि सूर्याच्या पृष्ठभागाच्या तुलनेत चंद्राचा कक्षा सुमारे 5˚च्या कोनात झुकलेली आहे; या वस्तुस्थितीमुळे प्रत्येक अमावास्येला ग्रहण दिसत नाही. सूर्य, चंद्र आणि पृथ्वी एका सरळ रेषेत येणे, ही एक दुर्मिळ खगोलीय घटना आहे.
“ग्रहणासारख्या खगोलशास्त्रीय घटना म्हणजे तरुणांना आणि समाजाला विज्ञानाविषयी उत्तेजन आणि शिक्षण देण्याचीआणि पर्यायाने त्यांच्यात विज्ञानविषयक रुची निर्माण करण्याची अपवादात्मक संधी आहे." असे विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचे सचिव, प्राध्यापक आशुतोष शर्मा, यांनी म्हटले आहे.
काय करावे:
1. डोळ्यांना इजा होऊ नये, म्हणून ग्रहण पाहण्याकरिता ग्रहण चष्मा (आयएसओ प्रमाणित) किंवा योग्य फिल्टरसह कॅमेरा वापरा.
2. पिनहोल कॅमेरा किंवा दुर्बिणीचा वापर करून पडद्यावरील प्रतिमा पाहणे, हा कंकणाकृती सूर्य ग्रहण पाहण्याचा सर्वात सुरक्षित मार्ग आहे.
3. ग्रहण चालू असताना खाणे, पिणे, अंघोळ करणे, बाहेर जाणे ठीक आहे. ग्रहण म्हणजे नेत्रसुखद अनुभव असतो.
काय टाळावे:
1. उघड्या डोळ्याने सूर्य थेट पाहू नका.
2. ग्रहण पाहण्यासाठी एक्स-रे फिल्म किंवा सामान्य गॉगल (अतिनील संरक्षणासह) वापरू नका.
3. ग्रहण पाहण्यासाठी रंगीत काच वापरू नका.
4. हे ग्रहण चुकवू नका.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.