Liam Livingstone And Jacob Bethell: 2025 हे वर्ष पूर्णपणे रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) चे आहे. आयपीएलमध्ये पहिल्यांदाच विजेतेपद पटकावल्यानंतर आता त्यांचे खेळाडू जगभरातील इतर लीगमध्येही आपली छाप सोडत आहेत. आता आम्ही ज्या सामन्याबद्दल बोलत आहोत त्यातील दोन्ही धडाकेबाज खेळाडू आयपीएलमध्ये आरसीबीकडून खेळतात. या दोघांनी मिळून 'द हंड्रेड' लीगमध्ये केवळ 13 चेंडूत 50 धावा कुटून संघाला शानदार विजय मिळवून दिला.
इंग्लंडमधील (England) ‘द हंड्रेड’ या क्रिकेट लीगमध्ये 17 ऑगस्ट रोजी लंडन स्पिरिट आणि बर्मिंगहॅम फिनिक्स यांच्यात सामना झाला. या सामन्यात लंडन स्पिरिटने पहिल्यांदा फलंदाजी करताना 100 चेंडूंत 6 गडी गमावून 126 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरादाखल बर्मिंगहॅम फिनिक्स संघाला 127 धावांचे आव्हान मिळाले. हे लक्ष्य त्यांनी फक्त 65 चेंडूत, म्हणजे 35 चेंडू शिल्लक असतानाच सहज पार केले. या विजयाचे शिल्पकार होते आरसीबीचे दोन खेळाडू - लियम लिविंगस्टन आणि जेकब बेथेल. या दोघांनी अखेरपर्यंत नाबाद राहत संघाला विजय मिळवून दिला. त्यांच्यात 25 चेंडूंमध्ये 63 धावांची भागीदारी झाली, ज्यातील तब्बल 50 धावा केवळ 13 चेंडूंमध्ये आल्या. या 13 चेंडूंमध्ये त्यांनी 6 षटकार आणि 1 चौकार ठोकले, ज्यामुळे गोलंदाजांची अक्षरशः पिसं काढली.
दरम्यान, या सामन्यात आरसीबीच्या (RCB) दोन्ही खेळाडूंनी फलंदाजी करताना 225 च्या समान स्ट्राइक रेटने धावा केल्या, हे विशेष आहे. लियम लिविंगस्टनने 20 चेंडूंमध्ये 1 चौकार आणि 5 षटकारांसह 45 धावांची आक्रमक खेळी केली. तर, 21 वर्षीय जेकब बेथेलने 8 चेंडूंमध्ये 2 षटकारांसह 18 धावा काढल्या. त्यांच्या या कामगिरीमुळे बर्मिंगहॅम फिनिक्सने फक्त 3 गडी गमावून सामना जिंकला.
लिविंगस्टनने या सामन्यातील आपल्या कामगिरीमुळे ‘प्लेअर ऑफ द मॅच’चा किताब पटकावला. त्याचबरोबर, सध्याच्या ‘द हंड्रेड’ हंगामात तो सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला आहे. लियम लिविंगस्टनला आरसीबीने 8.75 कोटी रुपयांना विकत घेतले होते, तर जेकब बेथेलला 2.6 कोटी रुपयांमध्ये संघात सामील करुन घेतले होते. बेथेलने नुकताच इंग्लंडचा सर्वात युवा कर्णधार बनण्याचा 136 वर्षांचा विक्रमही मोडला होता. 2025 मध्ये आयपीएल जिंकल्यानंतरही आरसीबीच्या खेळाडूंची ही कामगिरी त्यांची गुणवत्ता आणि फॉर्म सिद्ध करत आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.