देशात सध्या कोलकाता येथील महिला डॉक्टरील लैंगिक अत्याचार आणि हत्या प्रकरण चांगलंच गाजत आहे. आरजी कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये 9 ऑगस्ट रोजी 31 वर्षीय निवासी डॉक्टरचा मृतदेह सापडला होता. सुरुवातीला हॉस्पिटलकडून ही आत्महत्या असल्याचा दावा करण्यात आला. हा दावा तत्कालीन प्राचार्य संदीप घोष यांच्या कार्यालयातून झाल्याचा आरोप त्यांच्या सहकाऱ्यांनी केला होता. हॉस्पिटलच्या सेमिनार हॉलमध्ये पीडित महिला डॉक्टरचा मृतदेह आढळून आला होता. पीडितेचा मृत्यू हा बलात्कार आणि खुनाचे स्पष्ट प्रकरण असताना हॉस्पिटल प्रशासनाने आपली दिशाभूल का केली, असा सवाल त्यांच्याकडून उपस्थित करण्यात आला. घोष यांच्या कार्यालयात सुरुवातीला पीडितेच्या मृत्यूला आत्महत्या म्हणून वर्गीकृत करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे हॉस्पिटलमधील सूत्रांनी स्पष्ट केले होते. मात्र व्यापक विरोध आणि प्रकरण दडपल्याच्या आरोपानंतर घोष यांना त्यांच्या पदावरुन हटवण्यात आले.
दरम्यान, या घटनेच्या विरोधात उसळलेल्या जनक्षोभामुळे ममता बॅनर्जी यांच्या सरकारला बॅकफूटवर आणले. सगळीकडून त्यांना टिकेचा सामना करावा लागत आहे. मंगळवारी सर्वोच्च न्यायालयानेही ममता सरकारला फटकारले. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणात पश्चिम बंगाल सरकारच्या कथित हलगर्जीपणा आणि निष्काळजी वृत्तीबद्दल फटकारले. राज्य सरकारने सुरक्षा सुनिश्चित करावी, असे न्यायालयाने म्हटले. दुसरीकडे, ममता बॅनर्जी यांनी या राग आणि नाराजीला राजकीय षडयंत्र असल्याचे म्हटले.
दुसरीकडे, पीडित डॉक्टरच्या सहकाऱ्यांनी हे प्रकरण ज्या पद्धतीने हाताळले गेले, विशेषत: तिच्या पालकांना दिलेल्या दिशाभूल करणारी माहितीवर संताप व्यक्त केला. तिच्या एका सहकारी पदव्युत्तर प्रशिक्षणार्थीने सवाल केला की, तिच्या शरीरावर लैंगिक अत्याचार आणि खुनाच्या स्पष्ट खुणा का आहेत. पालकांची दिशाभूल का करण्यात आली? सहाय्यक अधीक्षक बिस्वास यांनी कारवाई केली नसल्याचा आरोप अन्य एका सहकाऱ्यानेही केला. याला आत्महत्येचे षडयंत्र रचण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
पीडितेच्या पालकांच्या म्हणण्यानुसार, त्यांना 9 ऑगस्टला सकाळी दोन फोन आले होते. पहिला कॉल सकाळी 10:53 वाजता हॉस्पिटलचे सहाय्यक अधीक्षक द्वैपायन बिस्वास यांनी केला होता. त्यांनी सांगितले की, त्यांच्या मुलीची प्रकृती खालावली आहे. यानंतर काही वेळातच त्यांना दुसऱ्या कॉलमध्ये त्यांच्या मुलीने आत्महत्या केल्याचे सांगण्यात आले. ही बातमी ऐकून कुटुंबीय आणि सहकाऱ्यांना मोठा धक्का बसला. कारण तिच्या शरीरावर कथित अत्याचार आणि खुनाच्या स्पष्ट खुणा दिसत होत्या.
सुरुवातीच्या तपासापासून ते आरजी कर हॉस्पिटलमध्ये झालेल्या जघन्य गुन्ह्याबाबतचे सत्य लपवण्याच्या प्रयत्नांपर्यंत कोलकाता पोलिसांच्या उणिवा दिसून आल्या. पीडितेवरील बलात्कार आणि हत्येला आत्महत्या म्हणत दडपण्याचा प्रयत्न करण्यात आला. आपल्या मुलीने आत्महत्या केल्याचे हॉस्पिटल प्रशासनाकडून फोनवरुन कळवण्यात आल्याचा आरोप पीडितेच्या पालकांनी केला. तर हॉस्पिटलच्या सेमिनार रुममध्ये महिला डॉक्टरचा अर्धनग्न मृतदेह आढळून आल्याने या भीषण घटनेमागे मोठे षडयंत्र घडल्याचे समोर आले. हॉस्पिटल प्रशासनाकडून या घटनेला आत्महत्या असल्याचे सांगून खोटे बोलण्याचा प्रयत्न केला गेला.
पीडितेच्या आई-वडिलांना माहिती मिळताच त्यांनी तात्काळ हॉस्पिटल गाठले. त्यांना तीन तास मुलीचा मृतदेह पाहू दिला नाही. पीडितेच्या आईने खुलासा केला की, जेव्हा ते आपल्या मुलीचा मृतदेह पाहण्यासाठी गेले तेव्हा तिच्या शरीरावर खोल जखमांच्या खुणा होत्या. ही आत्महत्या असू शकत नाही, असे त्यांनी हॉस्पिटल प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना सांगितले. तर आपल्या मुलीच्या मृतदेहावर घाईघाईत अंत्यसंस्कार करण्यात आल्याचा आरोपही पीडितेच्या वडिलांनी केला. ते म्हणाले की, स्मशानभूमीत आधीच तीन मृतदेह होते पण माझ्या मुलीच्या मृतदेहावर आधी अंत्यसंस्कार करण्यात आले. पालकांनी कोलकाता पोलिसांवर घाईघाईने तपास हाताळल्याचा आरोपही केला.
बलात्कार आणि हत्येनंतर पीडितेच्या न्यायासाठी कोलकाता शहरात निदर्शने सुरु झाली. 14 ऑगस्टच्या रात्री शांततेत सुरु असलेले आंदोलन अचानक चिघळले. शेकडो लोक हॉस्पिटलमध्ये पोहोचले आणि त्यांनी दगडफेक आणि गोंधळ घालण्यास सुरुवात केली. हॉस्पिटलबाहेर सुमारे 40 मिनिटे हा गोंधळ पाहायला मिळाला. दुसरीकडे, कोलकाता पोलिस या प्रकरणात हलगर्जीपणा करत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांकडून करण्यात आला. मात्र या सगळ्या गदारोळात 14 पोलीस जखमी झाले. भाजपकडून आरोप करण्यात आला की, ही तोडफोड "टीएमसीच्या गुंडांनी" केली, ज्यांना गुन्हेगारीच्या ठिकाणाहून पुरावे नष्ट करायचे होते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.