हैदराबादमध्ये काल संध्याकाळी पत्नीसह दुचाकीवरुन घरी जाणाऱ्या तरुणाची लोखंडी रॉडने बेदम मारहाण करण्यात आली. ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 25 वर्षीय कार सेल्समनला त्याच्या मुस्लिम (Muslim) पत्नीच्या भावाने आणि नातेवाईकांनी बेदम मारहाण केली. बी नागराजू आणि सय्यद अश्रीन सुलताना यांचा तीन महिन्यांपूर्वी घरच्यांच्या इच्छेविरुद्ध विवाह झाला होता. (Killed a Hindu youth for marrying a Muslim girl)
दरम्यान, बुधवारी रात्री 8.45 च्या सुमारास हे दाम्पत्य दुचाकीवरुन घरातून निघाले होते. त्याचवेळी दोन अज्ञात व्यक्तींनी नागराजू यांच्या डोक्यात लोखंडी रॉड मारला. घटनास्थळावरील फुटेजमधून हे सपशेल दिसून येत आहे. घटनास्थळी गर्दी वेगाने जमत होती, परंतु कोणीही त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला नाही. अनेकांनी ही घटना आपल्या मोबाईलमधील (Mobile) कॅमेऱ्यात कैद केली.
तसेच, व्हिडिओमध्ये नागराजू निपचित पडलेले दिसून येत आहेत. त्यांचे डोके रक्ताने माखले होते. तर दुसरीकडे, त्यांची पत्नी मदतीसाठी ओरडत होती. एका व्हिडिओमध्ये सुलताना हल्लेखोर नागराजवरील दुसरा हल्ला रोखण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. यानंतर तिथे उपस्थित लोकांनी हल्लेखोरांवर हल्ला केला, त्यानंतर ते तिथून पळून गेले. सुलतानाने नंतर हल्लेखोर आपला भाऊ असल्याचे ओळखले. काही सेकंदात सगळं संपलं. गजबजलेल्या रस्त्यावर नागराजूचा मृत्यू झाला, परंतु त्यांना कोणीही वाचवू शकले नाही.
दुसरीकडे, आज मीडियाशी बोलताना सुलताना म्हणाली, 'हल्लेखोरांनी माझ्या पतीला रस्त्याच्या मधोमध मारले. पाच जणांनी हल्ला केला. माझा भाऊ आणि इतर काहीजण सहभागी होते. परंतु आम्हाला मदत करायला कोणीच आले नाही. घटनास्थळी उपस्थित असणाऱ्या लोकांकडे मी मदतीसाठी याचना करत होते, मात्र कोणीही आले नाही. माझ्या डोळ्यासमोर त्यांनी माझ्या पतीला मारुन टाकले. लोक काही करु शकत नसतील तर ते का आले? त्यांनी फक्त पाहिले. त्यांच्या डोळ्यासमोर सगळं काही घडलं. त्यांना वाचवता यावे म्हणून मी त्यांच्यावर पडले. लोखंडी रॉडने वार करुन त्यांचे डोके फोडले.'
याशिवाय, हल्लेखोर घटनास्थळावरुन पळून गेले, परंतु सुरक्षा कॅमेरे आणि प्रत्यक्षदर्शींनी रेकॉर्ड केलेल्या मोबाईल फोनच्या व्हिडिओमध्ये ते पकडले गेले. कॅमेऱ्यात दिसलेल्या मारेकऱ्यांना पकडण्यासाठी पोलिसांनी विशेष पथके तयार केली आहेत. नागराजू आणि सुलताना यांचा विवाह 31 जानेवारी रोजी आर्य समाजात झाला. ते 10 वी पासून एकमेकांना ओळखत होते, परंतु त्यांचे कुटुंब त्यांच्या लग्नाच्या विरोधात होते.
सुलतानाने पुढे सांगितले की, 'यापूर्वी मी नागराजूपासून दूर राहण्याचा प्रयत्न केला होता. मी नागराजशी बोलले होते की, लग्न केलं तर फक्त तुमच्याशीच करेन नाही तर करणार नाही. माझं जीवन किंवा मृत्यू फक्त तुमच्या हातामध्ये आहे.'
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.