Karnataka Election BJP Candidate List: कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने मंगळवारी 189 उमेदवारांची यादी जाहीर केली. तत्पूर्वी, गृहमंत्री अमित शाह मंगळवारी एका महत्त्वाच्या बैठकीसाठी पक्षाध्यक्ष जेपी नड्डा यांच्या दिल्लीतील निवासस्थानी पोहोचले.
अरुण सिंग, धर्मेंद्र प्रधान, मनसुख मांडविया, बीएल संतोष हेही नड्डा यांच्या निवासस्थानी उपस्थित होते.
बैठकीनंतर केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान म्हणाले की, आज आम्ही आगामी कर्नाटक निवडणुका 2023 साठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर करत आहोत.
दरम्यान, नव्या लोकांना संधी दिली जात असल्याचे भाजपने म्हटले आहे. 52 नवीन उमेदवार आहेत. यातील 32 उमेदवार ओबीसी, 30 एससी आणि 16 एसटीचे आहेत. भाजपचे (BJP) राष्ट्रीय सरचिटणीस अरुण सिंह यांनी सांगितले की, 9 डॉक्टर, 31 अॅकेडेमिक, 5 वकील, 1 IAS, 1 IPS, 3 निवृत्त अधिकारी आणि 8 महिलांना तिकीट देण्यात आले आहे.
अरुण सिंह म्हणाले की, सीएम बसवराज बोम्मई शिगगावमधून लढणार आहेत. याआधीही इथूनच विजयी झाले होते. कागवाडमधून बाळासाहेब पाटील निवडणूक लढवणार आहेत.
गोविंद करजोल मुदुलमधून, श्रीरामुलू बेल्लारीमधून, मुर्गेश निरानी बिलगीमधून रिंगणात असतील. सीटी रवी यांना चिकमंगळूरमधून तिकीट देण्यात आले आहे.
माजी मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा (BS Yeddyurappa) यांचे पुत्र विजयेंद्र शिकारीपूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहे.
त्याचवेळी, भाजप नेतृत्वाने कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि पक्षाचे नेते जगदीश शेट्टर यांना निवडणूक न लढवण्यास सांगितले आहे, परंतु त्यांनी हा निर्णय अस्वीकार्य असल्याचे म्हटले आहे.
सर्वेक्षणात माझी लोकप्रियता चांगली असल्याचे त्यांनी सांगितले. मी एकही निवडणूक हरलेली नाही, त्यामुळे मला लढण्याची संधी द्यावी, अशी विनंती मी पक्षप्रमुखांकडे केली असल्याचेही ते म्हणाले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.