ईदनिमित्त राजस्थानच्या जोधपूरमध्ये गोंधळ झाला होता. दरम्यान या गोंधळप्रकरणी आतापर्यंत 211 जणांना अटक करण्यात आली आहे. गुरुवारी सलग तिसऱ्या दिवशीही शहरात संचारबंदी सुरूच होती. सोमवारी रात्री वादानंतर शहरात खळबळ उडाली होती. मंगळवारी दुपारपासून शहरातील सुमारे 10 पोलीस ठाण्याच्या हद्दीत संचारबंदी लागू आहे. कर्फ्यू 6 मेच्या मध्यरात्रीपर्यंत वाढवण्यात आला आहे. जोधपूरमध्ये मोबाईल इंटरनेट सेवाही ठप्प आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आता शहरातील परिस्थिती नियंत्रणात आली असून शांतता आहे.तसेच राज्याचे पोलीस महासंचालक एम.एल. लाथेर यांनी सांगितले की, जोधपूर शहरातील परिस्थिती नियंत्रणात आहे आणि पोलीस शांतता राखण्यासाठी सर्व शक्य पावले उचलत आहेत.
आतापर्यंत एकूण 19 एफआयआर नोंदवण्यात आली
पोलीस महासंचालक एम .एल .लाथेर म्हणाले की, दंगलीच्या घटनांसंदर्भात पोलिसांनी आतापर्यंत एकूण 211 जणांना अटक केली आहे. दरम्यान यापैकी 191 जणांना कलम 151 अन्वये तर 20 जणांना इतर प्रकरणांत अटक करण्यात आली आहे. उपद्रव प्रकरणी आतापर्यंत एकूण 19 एफआयआर दाखल करण्यात आल्या आहेत. तसेच शहरातील शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस सर्वतोपरी पावले उचलत आहेत.
शांतता समितीच्या बैठका आयोजित करून सद्भावनेचे प्रयत्न सुरू आहेत असं देखील लाथेर म्हणाले. यासोबतच त्यांनी सामान्य जनतेला शांतता राखण्याचे, अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आणि अफवांची माहिती तात्काळ स्थानिक पोलिस अधिकाऱ्यांना देण्याचे आवाहन केले आहे.
अशातच जोधपूर हिंसाचाराला सुरुवात
ईदच्या दिवशी जातीय हिंसाचारामुळे जोधपूरमधील वातावरण बिघडले होते. जालोरी गेट चौकातील बालमुकंद बिसा सर्कल येथे भगवा ध्वज उतरवून त्या जागी इस्लामिक चिन्हे असलेले झेंडे फडकावल्यानंतर दोन समुदायांमध्ये हाणामारी झाली. या घटनेनंतर मध्यरात्री दोन्ही समाजात जोरदार दगडफेक झाली. त्याचबरोबर या हिंसाचारात अनेक जण जखमी झाले आहेत.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.