मुंबई हल्ल्याचा मास्टरमांइड तहव्वुर राणा याला अमेरिकेतून भारतात आणण्यात आले. याचदरम्यान आता अनेक गोष्टींचा नव्याने खुलासा होत आहे. राणाच्या बाबतीत अमेरिकेचे एक मोठे वक्तव्य समोर आले आहे. अमेरिकेने म्हटले की, मुंबई हल्ल्याचे मिशन पूर्ण झाल्यानंतर राणा हेडलीला म्हणाला होता की, भारतीय लोक यासाठीच पात्र आहेत. एवढचं नाहीतर पुढे बोलताना राणाने हेडलीशी हल्ल्यात मारल्या गेलेल्या नऊ दहशतवाद्यांचे तोंडभरुन कौतुकही केले होते. या दहशतवाद्यांना 'निशाण-ए-हैदर' देण्याची वकिली सुद्धा राणाने केली होती. पाकिस्तानात युद्धातील शौर्यासाठी हा सर्वोच्च पुरस्कार दिला जातो.
राणाच्या प्रत्यार्पणानंतर डीओजेच्या निवेदनातून खुलासा झाला की, राणाला 2013 मध्ये 14 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली होती. इलिनॉयमधील एका खटल्यातून निर्दोष सुटल्यानंतर त्याच्यावर एलईटीला मदत पुरवण्याचा आणि डेन्मार्कमधील कोपनहेगन येथे एलईटी-प्रायोजित दहशतवादी कट रचण्याचा आरोप होता.
दरम्यान, आरोपी राणा सध्या एनआयएच्या (NIA) ताब्यात आहे. त्याला UAPA अंतर्गत अटक करण्यात आली. एनआयए त्याची 18 दिवस चौकशी करणार आहे. राणाला भारतात आणण्यात अमेरिकन अधिकारी आणि एनआयएने महत्त्वाची भूमिका बजावली.
अमेरिकेने (America) म्हटले की, मुंबई हल्ल्याने संपूर्ण जग हादरले होते. आरोपींना कठोर शिक्षेसह पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी भारताच्या प्रयत्नांना अमेरिकेने दीर्घकाळ पाठिंबा दिला आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाच्या प्रवक्त्या टॅमी ब्रूस यांनी सांगितले की, मुंबई दहशतवादी हल्ल्यातील भूमिकेबाबत 64 वर्षीय राणाला भारताकडे सोपवण्यात आले.
गुरुवारी (10 एप्रिल) राणाला अमेरिकेतून भारतात आणण्यात आले. दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय (IGI) विमानतळावर पोहोचताच राणाला औपचारिकरित्या अटक करण्यात आली. त्यानंतर त्याला पटियाला हाऊस येथील NIA च्या विशेष न्यायालयात हजर करण्यात आले. अधिकाऱ्यांनी सांगितले की, राणाला सीजीओ कॉम्प्लेक्समधील एजन्सीच्या मुख्यालयात अत्यंत सुरक्षित कक्षात ठेवण्यात आले आहे.
दरम्यान, वकील पीयुष सचदेवा राणाचा खटला लढवत आहेत. दिल्ली लीगल सेलने तहव्वुरला त्याचा खटला लढण्यासाठी सचदेवा यांच्या रुपात वकील उपलब्ध करुन दिला. पटियाला न्यायालयाने राणाला 18 दिवसांची कोठडी सुनावली. अधिक चौकशीसाठी राणाच्या 20 दिवसांच्या कोठडीची मागणी एनआयएने केली होती. न्यायालयाच्या निर्णयानंतर सचदेवा म्हणाले की, न्यायालयाने राणाला 18 दिवसांची कोठडी सुनावली आहे. जर एनआयएला जास्त वेळ हवा असेल तर ते तसा न्यायालयात अर्ज करु शकतात. खरेतर, राणाला फाशी देण्याची मागणी होत आहे. त्याला फाशीपासून वाचवण्यासाठी वकील पीयुष सचदेवा त्याचा हा खटला लढवत आहेत.
2008 च्या मुंबई हल्ल्यानंतर तहव्वुर राणाला अमेरिकेत अटक करण्यात आली होती. 2009 मध्ये त्याला तिथे अटक करण्यात आली होती. राणावर हल्ल्यात सहभागी असण्याबाबत खटला चालवण्यात आला. 2011 मध्ये डेन्मार्क प्रकरणात त्याला दोषी ठरवण्यात आले. या प्रकरणात त्याला 14 वर्षांची शिक्षा झाली. दरम्यान, अमेरिकन न्यायालयात मुंबई हल्ल्याच्या आरोपातून तहव्वुरची निर्दोष मुक्तता झाली, त्यानंतर त्याच्या भारतात प्रत्यार्पणाची मागणी वाढली. प्रदीर्घ कायदेशीर प्रक्रियेनंतर त्याला अमेरिकेतून भारतात आणण्यात आले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.