कारवार: देशाच्या सागरी सुरक्षेला आणि स्वदेशी युद्धनौका बांधणीला प्राधान्य दिले जात आहे. भारत संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भरतेच्या दिशेने वाटचाल करत असून, नौदलाचे आधुनिकीकरण देशाच्या सामर्थ्याला साजेसे आहे, असे प्रतिपादन उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनी केले.
कारवार येथील आयएनएस कदंब नौदल तळावर भारताची पहिली बहुउद्देशीय युद्धनौका ‘आयएनएस समर्थक’ नौदलात दाखल करण्याच्या सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी नौदलप्रमुख ॲडमिरल कृष्ण स्वामीनाथन, व्हाइस ॲडमिरल संजय वात्सायन, व्हाइस ॲडमिरल संजय साधू, फ्लॅग ऑफिसर (कर्नाटक) रिअर ॲडमिरल विक्रम मेनन, युद्धनौकेचे कमांडिंग ऑफिसर कमांडर सुशील कुमार सिंग यांच्यासह नौदल आणि संरक्षण मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
राधाकृष्णन म्हणाले की, ‘आयएनएस समर्थक’च्या समावेशामुळे हिंद महासागरातील भारतीय नौदलाची गस्त आणि सुरक्षा क्षमता अधिक बळकट होणार आहे. भारताच्या सागरी सीमांच्या संरक्षणासाठी ही युद्धनौका महत्त्वपूर्ण योगदान देईल.
सागरी सुरक्षा महत्त्वाची
भारतीय नौदलाचे कार्य केवळ सागरी सीमा सुरक्षित ठेवण्यापुरते मर्यादित नाही. देशाचा सागरी व्यापार आणि ऊर्जा पुरवठा मोठ्या प्रमाणात या मार्गांवर अवलंबून आहे. हिंद महासागर हा भारताला जगाशी जोडणारा महत्त्वाचा मार्ग असून, देशाची आर्थिक वृद्धी, सुरक्षा आणि समृद्धीसाठी त्याचे अनन्यसाधारण महत्त्व आहे, असे राधाकृष्णन यांनी नमूद केले.
‘समर्थक’ची वैशिष्ट्ये
‘मेक इन इंडिया’ उपक्रमांतर्गत लार्सन अँड टुब्रो लिमिटेडने या युद्धनौकेची रचना आणि बांधणी केली आहे. ही युद्धनौका १०७ मीटर लांब, १८ मीटर रुंद असून तिची क्षमता सुमारे ५,००० जीआरटी आहे. गस्त, पाळत आणि शोध मोहिमांबरोबरच स्वदेशी शस्त्रे, सेन्सर्स आणि स्वायत्त प्रणालींच्या सागरी चाचण्यांसाठीही तिचा वापर होणार आहे.
आत्मनिर्भरतेच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल
युद्धनौका धातूपासून बनत असली, तरी तिला सक्षम आणि सामर्थ्यवान बनविण्यात नौदलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची भूमिका महत्त्वाची असते, असे नौदलप्रमुख ॲडमिरल कृष्ण स्वामीनाथन यांनी सांगितले. ‘समर्थक’ ही युद्धनौका लष्करी मोहिमांसोबतच आपत्ती व्यवस्थापनातही महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल. तिच्या निर्मितीत ७५ टक्क्यांहून अधिक स्वदेशी घटकांचा वापर करण्यात आल्याने आत्मनिर्भरतेच्या दृष्टीने हे महत्त्वाचे पाऊल आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.