Indian Embassy Iran Advisory: इराणमधील अंतर्गत परिस्थिती वेगाने बिघडत असून ठिकठिकाणी निदर्शने आणि हिंसाचार वाढू लागला आहे. या पार्श्वभूमीवर, इराणमधील भारतीय दूतावासाने तिथे वास्तव्यास असलेल्या सर्व भारतीय नागरिकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि तातडीची अॅडव्हायझरी जारी केली. दूतावासाने इराणमधील भारतीयांना उपलब्ध असलेल्या वाहतुकीच्या साधनांचा, विशेषतः विमानांचा वापर करुन लवकरात लवकर देश सोडण्याचा सल्ला दिला आहे.
भारतीय दूतावासाने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले की, "भारत सरकारने 5 जानेवारी 2025 रोजी जारी केलेल्या सूचनेच्या अनुषंगाने आणि इराणमधील बदलती परिस्थिती लक्षात घेता, सध्या तिथे असलेले सर्व भारतीय नागरिकांना असा सल्ला देण्यात येतो की, त्यांनी उपलब्ध व्यावसायिक विमाने किंवा इतर वाहतुकीच्या साधनांनी इराणमधून बाहेर पडावे."
दूतावासाने पुढे असेही स्पष्ट केले की, भारतीय नागरिक आणि 'भारतीय वंशाच्या व्यक्तींनी' अत्यंत सावधगिरी बाळगावी. निदर्शने किंवा आंदोलने सुरु असलेल्या भागांपासून दूर राहावे, स्थानिक माध्यमांमधील घडामोडींवर लक्ष ठेवावे आणि भारतीय दूतावासाच्या सतत संपर्कात राहावे.
इराणमधील (Iran) भारतीयांना विनंती करण्यात आली की, त्यांनी त्यांचे पासपोर्ट, ओळखपत्रे आणि इमिग्रेशनशी संबंधित सर्व महत्त्वाची कागदपत्रे नेहमी आपल्यासोबत ठेवावीत. कोणत्याही तांत्रिक किंवा कागदपत्रांशी संबंधित मदतीसाठी दूतावासाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. इराणमधील इंटरनेट सेवा विस्कळीत होण्याची शक्यता लक्षात घेऊन दूतावासाने विशेष खबरदारी घेण्यास सांगितले आहे.
ज्या भारतीय नागरिकांनी अद्याप भारतीय दूतावासाकडे आपली नोंदणी केलेली नाही, त्यांनी तातडीने अधिकृत संकेतस्थळावर (www.meaers.com) जाऊन आपली माहिती नोंदवावी. जर इराणमधील इंटरनेट बंदीमुळे कोणाला नोंदणी करणे शक्य नसेल, तर भारतातील त्यांच्या कुटुंबियांनी संबंधित लिंकवर जाऊन त्यांच्या वतीने नोंदणी करावी, असे दूतावासाने स्पष्ट केले.
दूतावासाच्या अॅडव्हायझरीनंतर भारताच्या (India) परराष्ट्र मंत्रालयानेही (MEA) एक स्वतंत्र निवेदन प्रसिद्ध केले. "इराणमधील सध्याची परिस्थिती पाहता, भारतीय नागरिकांना पुढील सूचना मिळेपर्यंत इराणचा प्रवास टाळण्याचा सल्ला देण्यात येत आहे," असे मंत्रालयाने म्हटले. ज्यांनी आधीच प्रवासाचे नियोजन केले आहे, त्यांना आपला प्रवास स्थगित करण्याचे आवाहनही करण्यात आले.
संकटकाळात मदतीसाठी भारतीय दूतावासाने खालील हेल्पलाईन क्रमांक आणि ईमेल आयडी जारी केले आहेत.
मोबाईल क्रमांक: +989128109115, +989128109109, +989128109102, +989932179359
ईमेल: cons.tehran@mea.gov.in
इराणमधील अस्थिरतेमुळे तेथील हजारो भारतीय नागरिक आणि विशेषतः विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला असून, भारत सरकार या परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.