Lashkar e Taiba Commander Encounter: भारतीय सैन्याने पहलगाममधील भीषण दहशतवादी हल्ल्यात जीव गमावलेल्या 26 निष्पाप लोकांच्या मृत्यूचा बदला पूर्णपणे घेतला. जम्मू-कश्मीरच्या बडगाम जिल्ह्यातील युसमर्ग परिसरातील कोराग जंगलात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत लष्कर-ए-तैयबाचा टॉप कमांडर आणि पहलगाम हल्ल्याचा मुख्य सूत्रधार हाशिम मूसा याला भारतीय सैन्याने कंठस्नान घातले.
30 सप्टेंबर रोजी एका गुप्त माहितीच्या आधारे भारतीय सेना, जम्मू-कश्मीर पोलीस आणि सीआरपीएफने संयुक्तपणे 'ऑपरेशन कोराग' राबवले, ज्यामध्ये गेल्या 527 दिवसांपासून फरार असलेल्या या कुख्यात दहशतवाद्याचा खात्मा करण्यात आला. हाशिम मूसा हा गेल्या पाच वर्षांपासून पीर पंजाल परिसरात सक्रिय होता आणि त्याच्या नेतृत्वाखाली राजौरी, गुलमर्ग आणि पहलगाम भागात अनेक रक्तरंजित हल्ले घडवण्यात आले होते.
सुरक्षा यंत्रणांच्या माहितीनुसार, हाशिम मूसा हा सुलेमान शाह, फौजी मूसा आणि मोहम्मद आसिफ या नावांनीही ओळखला जायचा. तो 2021च्या अखेरीस जम्मूच्या जंगलातून भारतात घुसखोरी करुन आल्यापासून राजौरी-पुंछ हायवेवर सैनिकांवर झालेल्या अनेक मोठ्या हल्ल्यांचा मुख्य मास्टरमाइंड होता. ऑक्टोबर 2021 मध्ये भट्टा दुरियनमधील गोळीबार असो, एप्रिल 2023 मधील लष्कराच्या वाहनावर झालेला हल्ला असो किंवा मे 2023 मधील 9 पॅरा युनिटच्या 5 जवानांचे शहिद होणे असो, या सर्व प्रकरणांमध्ये मूसाचा थेट सहभाग होता.
पुढे सुरक्षा दलांच्या वाढत्या दबावामुळे तो पीर पंजालच्या उत्तर भागात आणि नंतर कुलगामच्या जंगलात सक्रिय झाला. त्याच्या साथीदारांनी सोनमर्गमधील टनल प्रोजेक्ट कॅम्पवर आणि गुलमर्गच्या बुटापथरी हाय-सिक्युरिटी क्षेत्रात केलेल्या हल्ल्यांनंतर दहशतवादी (Terrorists) सक्रिय झाले होते. या सर्व दहशतवाद्यांच्या जाळ्यात सर्वात संतापजनक आणि क्रूर घटना 22 एप्रिल 2025 रोजी घडली, जेव्हा पहलगामच्या बैसरन व्हॅलीमध्ये लष्करच्या पाच दहशतवाद्यांनी मिळून 26 लोकांची निर्घृण हत्या केली, ज्याने देशाला हादरवून सोडले. या महापापाचा बदला घेण्यासाठी भारतीय सैन्याने वेगाने पावले उचलली.
ऑगस्ट 2025 मध्ये सुलेमान आणि त्याचे साथीदार मारले गेले, तर 5 सप्टेंबर रोजी झालेल्या चकमकीत मूसाचा जवळचा साथीदार यासिर देखील ढेर झाला. अखेर, सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात युसमर्ग भागात हाशिम मूसाची पक्की खबर मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी त्याला घेरले आणि एका थरारक चकमकीत त्याचा खात्मा केला. गेल्या एका महिन्यात सुरक्षा दलांनी पहलगाम हल्ल्याला जबाबदार असलेल्या सर्व दहशतवाद्यांना एकामागून एक संपवून देशाच्या वीर शहीदांच्या रक्ताचा बदला पूर्ण केला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.