Indian Army: भविष्यातील युद्धांसाठी भारतीय सेना सज्ज! 'फ्युचर रेडी' फोर्स म्हणून जगात ठरणार वरचढ, लष्करप्रमुखांनी शत्रूंना दिली तंबी VIDEO
Army General Upendra Dwivedi Jaipur: "भारतीय लष्कर आता केवळ संरक्षणात्मक भूमिकेत नसून ते भविष्यातील युद्धांसाठी सज्ज असणारे एक आधुनिक आणि 'फ्युचर रेडी' फोर्स म्हणून वेगाने पुढे जात आहे," असे प्रतिपादन लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी गुरुवारी (15 जानेवारी) जयपूर येथे केले. सेना दिनानिमित्त आयोजित दिमाखदार संचलनानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी लष्कराचे आधुनिकरण, स्वदेशी तंत्रज्ञान आणि सीमेवरील वाढत्या आव्हानांवर लष्कराची भूमिका स्पष्ट केली.
तंत्रज्ञान आणि प्रशिक्षणाचा अचूक मेळ
जनरल उपेंद्र द्विवेदी म्हणाले की, भारतीय सैनिकांचे (Indian Army) प्रशिक्षण हे जागतिक दर्जाचे आहेच, पण आता त्याला आधुनिक उपकरणांची जोड दिली जात आहे. "आमच्याकडे चोख प्रशिक्षण घेतलेले सैनिक आहेत आणि अनेक कठीण भौगोलिक क्षेत्रांत एकाच वेळी काम करण्याची क्षमता आमच्याकडे आहे. आम्ही तंत्रज्ञानाचा वापर केवळ युद्धासाठी नाही, तर आमच्या सैनिकांना अधिक सक्षम आणि सुरक्षित बनवण्यासाठी करत आहोत," असे त्यांनी नमूद केले.
लष्कराच्या विचारसरणीत 'मोठा' बदल
लष्करप्रमुखांनी गेल्या काही वर्षांत भारतीय सैन्याच्या रणनीतीत झालेल्या बदलांवर विशेष भर दिला. ते म्हणाले, "आम्ही आता केवळ सध्याच्या आव्हानांचा विचार करत नाही, तर भविष्यात युद्धे कशी लढली जातील, याचा अंदाज घेऊन तयारी करत आहोत. यासाठी लष्कराच्या संरचनांमध्ये मोठे बदल केले जात आहेत."
यावेळी त्यांनी लष्करातील 'भैरव बटालियन' आणि 'शक्ति बाण रेजिमेंट' यांसारख्या नवीन युनिट्सचा उल्लेख केला. या तुकड्यांचे नाव घेताना ते म्हणाले की, या नवीन युनिट्स हे दर्शवतात की भारतीय लष्कर आता अधिक चपळ, वेगवान आणि कोणत्याही मिशनसाठी तत्पर आहे.
परंपरा आणि आधुनिकतेचा संगम
जयपूरमध्ये पार पडलेल्या परेडबद्दल बोलताना जनरल द्विवेदी यांनी परंपरा आणि बदल यांचा सुंदर संगम पाहायला मिळाल्याचे सांगितले. या परेडमध्ये नेपाळ आर्मी बँडचा सहभाग होता, जो भारत आणि नेपाळमधील असलेल्या लष्करी संबंधांचे प्रतीक आहे. तर दुसरीकडे, 'मेक इन इंडिया' अंतर्गत विकसित करण्यात आलेल्या अत्याधुनिक शस्त्रास्त्रांनी लष्कराच्या वाढत्या शक्तीचे दर्शन घडवले. "येणाऱ्या काळात आमची तयारी अधिक तीव्र होईल आणि लष्कर काळाप्रमाणे स्वतःमध्ये आवश्यक ते सर्व बदल करत राहील," असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
'आत्मनिर्भरता' हीच रणनीतिक गरज
लष्करप्रमुखांनी 'स्वदेशी' उपकरणांच्या वापराबाबत अत्यंत महत्त्वाची भूमिका मांडली. ते म्हणाले की, "आज देशात तयार झालेली शस्त्रे आणि उपकरणे वापरणे हे केवळ आमचे ध्येय नाही, तर ती आता आमची 'रणनीतिक गरज' बनली आहे. भविष्यातील युद्धात आपण दुसऱ्या देशांच्या शस्त्रास्त्रांवर अवलंबून राहू शकत नाही. त्यामुळे भारतात डिझाइन केलेली आणि विकसित केलेली उपकरणेच लष्कराचा मुख्य आधार असतील."
वीरभूमी राजस्थानचा सन्मान
लष्कर दिनाची परेड जयपूरमध्येच का आयोजित करण्यात आली, या प्रश्नावर उत्तर देताना जनरल द्विवेदी यांनी राजस्थानच्या मातीचा गौरव केला. "राजस्थान ही वीरांची भूमी आहे, इथल्या योद्ध्यांनी इतिहास घडवला आहे. या मातीचा सन्मान करण्यासाठी आणि लष्कराचे शौर्य सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी जयपूरची निवड करण्यात आली," असे त्यांनी सांगितले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

