MiG-21 Retirement: भारतीय वायुसेनेच्या लढाऊ विमानांच्या ताफ्यात सहा दशकांहून अधिक काळ महत्त्वाची भूमिका बजावणारे प्रसिद्ध रशियन बनावटीचे मिग-21 विमान अखेर सेवेतून निवृत्त होत आहे. 'पँथर्स' या टोपणनावाने ओळखले जाणारे हे विमान 26 सप्टेंबर रोजी म्हणजेच शुक्रवारी चंदीगढ येथे आयोजित एका विशेष समारंभात भारतीय वायुसेनेचा (Indian Air Force) निरोप घेणार आहे. विशेष म्हणजे, 60 वर्षांपूर्वी 1963 मध्ये याच ठिकाणी या विमानाचा वायुसेनेमध्ये समावेश करण्यात आला होता.
दरम्यान, या ऐतिहासिक क्षणासाठी मिग-21 ला निरोप देण्यापूर्वी दोन दिवसांपूर्वी 'वॉटर कॅनन सॅल्यूट' देण्यात आला. निवृत्तीच्या पूर्वसंध्येला एअर चीफ मार्शल ए. पी. सिंह हे या विमानाची अंतिम उड्डाण करणार आहेत. मिग-21 स्क्वाड्रनचे नेतृत्व करणारे आणि 1981 मध्ये भारतीय वायुसेनेचे प्रमुख झालेले दिलबाग सिंह यांनी 1963 मध्ये याच ठिकाणी पहिल्या मिग-21 स्क्वाड्रनचे नेतृत्व केले होते. या औपचारिक निरोपासाठी बुधवारी (25 सप्टेंबर) चंदीगढ वायुसेना तळावर 'फुल ड्रेस रिहर्सल' घेण्यात आली.
1965 आणि 1971 च्या पाकिस्तानसोबत (Pakistan) झालेल्या युद्धात मिग-21 लढाऊ विमानांनी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली होती. तसेच, 1999 च्या कारगिल युद्धात आणि 2019 च्या बालाकोट हवाई हल्ल्यांमध्येही या विमानांनी आपले सामर्थ्य सिद्ध केले. या विमानांनी पाकिस्तानसारख्या शत्रू देशांचे धाबे दणाणून सोडले होते. भारतीय वायुसेनेतील ग्रुप कॅप्टन इंद्रनील नंदी यांच्या मते, “भारतीय इतिहासासोबतच वायुसेनेमध्येही या विमानाचे विशेष स्थान आहे. 1963 पासून या विमानाने 60 वर्षांपेक्षा अधिक काळ भारताची सेवा केली आहे आणि सर्व मोठ्या लष्करी मोहिमांमध्ये सहभाग घेतला आहे.”
भारतीय वायुसेनेने 'एक्स' वर एका पोस्टमध्ये म्हटले की, “सहा दशकांची सेवा, शौर्याच्या अगणित कथा, एक असा योद्धा ज्याने राष्ट्राच्या गौरवाला नव्या उंचीवर नेले.”
मिग-21च्या निवृत्ती सोहळ्याला अनेक महत्त्वपूर्ण व्यक्ती उपस्थित राहणार आहेत. यामध्ये संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, प्रमुख संरक्षण अध्यक्ष जनरल अनिल चौहान, लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी, एअर चीफ मार्शल ए. पी. सिंह आणि नौदल प्रमुख ऍडमिरल दिनेश के त्रिपाठी यांचा समावेश आहे. याशिवाय, वायुसेनेचे सहा माजी प्रमुख ए. वाई. टिपनिस, एस. कृष्णास्वामी, एस. पी. त्यागी, पी. व्ही. नाईक, बी. एस. धनोआ आणि आर. के. एस. भदौरिया हेदेखील या समारंभाला उपस्थित राहतील. संरक्षण मंत्रालय, संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO) आणि हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) चे अधिकारीही या सोहळ्यात सहभागी होतील.
मिग-21 विमानाने एक महिन्यापूर्वी राजस्थानमधील नाल वायुसेना तळावरुन आपले शेवटचे उड्डाण केले. या विमानांच्या निवृत्तीमुळे भारतीय हवाई सामर्थ्याच्या इतिहासातील एका गौरवशाली अध्यायाचा अंत होत आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.