भारतीय क्रिकेट संघाने मँचेस्टर कसोटी अनिर्णित राखली असली, तरी या सामन्यातून एक असा विक्रम घडला आहे जो संघाच्या इतिहासात ‘लज्जास्पद’ म्हणून ओळखला जाईल. कसोटी क्रिकेटच्या जवळपास ९० वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच असे घडले आहे की, एखाद्या मैदानावर भारताने १० सामने खेळूनही एकही विजय मिळवलेला नाही.
इंग्लंडमधील मँचेस्टर हे मैदान भारतीय संघासाठी ‘अपशकुनी’ ठरत आहे. १९३६ साली येथे प्रथमच कसोटी सामना खेळणाऱ्या भारताने आजवर येथे एकूण १० कसोटी सामने खेळले आहेत. यापैकी ४ सामने भारताने गमावले, तर ६ सामने अनिर्णित राहिले.
मात्र विजयाचा आकडा आजही शून्यावर आहे. भारतीय संघाच्या कसोटी इतिहासात अशा प्रकारची कामगिरी दुसऱ्या कोणत्याही मैदानावर पाहायला मिळत नाही.
भारताने फक्त मँचेस्टरच नव्हे, तर बार्बाडोसच्या मैदानावरही अद्याप विजय मिळवलेला नाही. भारताने तेथे ९ कसोटी सामने खेळले असून, त्यापैकी ७ सामने गमावले आहेत, तर २ सामने अनिर्णित राहिले आहेत. त्यामुळे मँचेस्टर की बार्बाडोस भारत पहिला कसोटी विजय कुठे नोंदवतो, याकडे क्रिकेटप्रेमींचं लक्ष लागून राहिलं आहे.
सध्या सुरू असलेल्या इंग्लंड दौऱ्यात भारताला मालिका अनिर्णित ठेवण्याची संधी मिळाली आहे. चौथा कसोटी सामना अनिर्णित राहिल्यामुळे सध्या इंग्लंड २-१ ने आघाडीवर आहे. पाचवा आणि अंतिम सामना ३१ जुलैपासून सुरू होणार आहे.
जर भारत हा सामना जिंकतो, तर मालिका २-२ अशी अनिर्णित होईल. मात्र सामना अनिर्णित राहिला किंवा इंग्लंडने विजय मिळवला, तर ही मालिका इंग्लंडच्या नावे जाईल.
या मालिकेतून युवा फलंदाज शुभमन गिलने नेतृत्वाची धुरा स्वीकारली आहे. मात्र त्याच्या नेतृत्वाखाली भारताने मँचेस्टरसारख्या ऐतिहासिक मैदानावर विजय मिळवण्याची संधी गमावली. त्यामुळे त्याच्या रणनीतीवर व निवडींवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.