HMPV Outbreak
कोरोनासारख्या महामारीनंतर आता चीनमध्ये ह्युमन मेटापन्यूमो विषाणूने ( HMVP) कहर केला आहे. या विषाणूमुळे चीनमध्ये कोरोनासारखी स्थिती निर्माण झाली आहे. या विषाणूचे भारतातही रुग्ण सापडण्यास सुरूवात झालीय.
भारतात सापडलेल्या रूग्णांमध्ये कर्नाटक 2, गुजरात 1, पश्चिम बंगाल 1 आणि तामिळनाडू 2 अशी रुग्णांची संख्या आहे. महाराष्ट्रातील नागपूरमध्ये 2 संशयित रुग्ण आढळल्याची माहिती समोर आलीय. त्यामुळे एचएमपीव्ही (HMVP) हा विषाणू नेमका आहे तरी काय? या विषाणूपासून वाचण्यासाठी काय काळजी घ्यावी? चिनमध्ये सध्या परिस्थिती काय? याबाबत जाणून घेऊया सर्व माहिती.
"शास्त्रज्ञांनी 2001 मध्ये या विषाणूची ओळख पटवली होती. परंतु संशोधकांचे म्हणणे आहे की, हा विषाणू कमीतकमी 60 वर्षांपासून मानवांमध्ये फिरत आहे," असं वँडरबिल्ट युनिव्हर्सिटी मेडिकल सेंटरमधील बालरोग संसर्गजन्य रोगाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. लेह हॉवर्ड यांनी न्यूयॉर्क टाईम्सला दिलेल्या माहितीत सांगितले.
"हा नवीन विषाणू नाही, हा जुना विषाणू आहे. थंडीच्या दिवसात काळात एचएमपीव्ही विषाणूच्या संसर्गाची प्रकरणं समोर येतात. हा फ्लूसारखा विषाणू आहे", अशी माहिती दिल्लीच्या सर गंगाराम रुग्णालयातील बाल रुग्ण विभागाचे डॉक्टर सुरेश गुप्ता यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेशी बोलताना दिली.
सामान्य सर्दीला दिली जाणारी औषधंच या विषाणूच्या उपचारासाठी दिली जातात. तसंच आजारी व्यक्तीला आरामाचा सल्ला दिला जातो. बहुतांश प्रकरणांमध्ये या विषाणूची लागण झालेल्या व्यक्तींवर घरीच उपचार करणे शक्य आहे. त्यांना त्यांना रुग्णालयात दाखल करण्याची आवश्यकता नसते, असं डॉक्टर सुरेश गुप्ता यांचे मत आहे.
एचएमपीव्ही विषाणू कसा पसरतो? How HMPV Spreads?
एचएमपीव्ही हा वायुजन्य विषाणू असून हा विषाणू हवेतून पसरतो. या विषाणूचा प्रसार हा बाधित व्यक्तीच्या संपर्कात आल्यामुळे श्वसन प्रणालीद्वारे होऊ शकतो. एचएमपीव्ही विषाणू सामान्यतः खोकताना आणि शिंकण्याद्वारे पसरतो.
या विषाणूची लागण झालेल्या व्यक्तीशी हस्तांदोलन केल्यामुळे, त्याने हातळलेल्या दूषित वस्तूला स्पर्श केल्याने एचएमपीव्हीची लागण होऊ शकते. संसर्ग झाल्यानंतर काही दिवसातच त्याची लक्षणे दिसू लागतात. थंड वातावरणात तो अधिक सक्रिय होतो.
एचएमपीव्हीची लागण झालेले रूग्ण भारतात आढळल्यामुळे लोकांमध्ये भिती निर्माण झाली आहे. कोरोना काळात जशी परिस्थिती उद्भवली होती, तशी परिस्थिती परिस्थिती पुन्हा उद्भवणार का? असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. एचएमपीव्ही विषाणूवर अद्दाप कोणतीही लस आलेली नाही. या विषाणुच्या लससाठी संशोधन चालू आहे.
आरोग्य मंत्रालयाने मंगळवारी सांगितले की, आरोग्य सचिव पुण्य सलिला श्रीवास्तव यांनी भारतातील सध्याच्या स्थितीचा आढावा घेण्यासाठी राज्ये/केंद्रशासित प्रदेशांशी व्हर्च्युअल पध्दतीने बैठक घेतली. विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी विविध उपाययोजनांवर या बैठकीत चर्चा करण्यात आली.
कोरोना आणि एचएमपीव्ही विषाणूमध्ये फरक काय? Difference Between HMPV And Corona / Covid-19)
एचएमपीव्ही विषाणू आणि कोरोना विषाणूमध्ये फरक आहे. मात्र, या विषाणूंमध्ये अनेक गोष्टी समान आहेत. हे दोन्ही विषाणू प्रामुख्याने श्वसनसंस्थेवर परिणाम करतात. दूषित पृष्ठभागाच्या संपर्काद्वारे हे विषाणू पसरतात. दोन्ही विषाणूंची लक्षणे जवळपास सारखीच आहेत.
यामध्ये ताप, खोकला, घसादुखी, घरघर आणि श्वास घेण्यात अडचण यांचा समावेश आहे.लहान मुलं, वृद्ध व्यक्ती आणि कमकुवत प्रतिकारशक्ती असलेल्या लोकांना दोन्ही विषाणूंचा धोका सर्वाधिक असतो. हात स्वच्छ ठेवणे, मास्क घालणे आणि दोन व्यक्तींमध्ये अंतर ठेवणे हे दोन्ही विषाणू टाळण्यासाठी महत्त्वाचे उपाय आहेत.
चीनमध्ये हाहाकार Outbreak In China
पाच वर्षांपूर्वी चीनमधून कोरोनाची साथ पसरली होती. कोरोनाने जगात थैमान घातलं होतं.. त्यानंतर आता चीनमध्ये एचएमपीव्ही विषाणूचा वेगानं प्रसार होत आहे. त्यामुळे लोकांना कोरोनासारखी साथ पुन्हा पसरणार का, अशी भीती वाटू लागली आहे.
चीनमधील लोक या विषाणूला झपाट्याने बळी पडत आहेत. सोशल मिडियावर पसरत असलेल्या व्हिडिओंमध्ये चीनमधील हॉस्पिटलमध्ये गर्दी दिसत आहे. त्यामुळे चीन पूर्ण अलर्ट मोडवर आहे. मात्र, या विषाणूबाबत अधिक माहिती समोर आली नाही.
HMPV बाबत मला काळजी करण्याची गरज आहे का?
चीनमध्ये एचएमपीव्हीची विषाणूची लागण झालेल्या रूग्णांची वाढती लोकसंख्या पाहता जागतिक आरोग्य संघटनेने (World Health Organization) चीनला विषाणूच्या उद्रेकाबाबत अधिक माहिती सामायिक करण्यासाठी आग्रह करत आहे.
कोरोना विषाणू प्राण्यांपासून मानवांमध्ये पसरला होता. एचएमपीव्ही विषाणूचा चांगला अभ्यास करण्यात आला आहे, त्यानूसार या विषाणूचा सामना केला जाऊ शकतो.
"चीनने एचएमपीव्ही विषाणूच्या प्रादुर्भावाविषयीची माहिती वेळेवर देणे आवश्यक आहे. तसेच, एचएमपीव्ही विषाणूची लागण झाल्याची पुष्टी करणाऱ्या जीनोमिक डेटाचीही माहिती देणे आवश्यक आहे," असं संसर्गजन्य रोगांचे तज्ञ डॉ. संजय सेनानायके म्हणालेत.
खबरदारीसाठी नागरिकांनी काय करावे? (Precaution)
खोकला किंवा शिंका येत असतील तर तोंड किंवा नाक रुमालने झाकून ठेवा.
साबण आणि सॅनिटायझरने वारंवार आपले हात धुवा.
ताप, खोकला आणि शिंका येत असल्यास सार्वजनिक ठिकाणी जाण्यास टाळावे.
भरपूर पाणी प्या आणि पौष्टिक अन्नपदार्थ खावे.
काय करू नये (Do's And Dont's)
हस्तांदोलन करणं, रुमालाचा पुनर्वापर टाळावे.
आजारी लोकांच्या संपर्कात राहू नका.
डोळे, नाक आणि तोंडाला स्पर्श करणे टाळा
सार्वजनिक ठिकाणी थुंकू नका.