गुजरातमधील भाजप सरकारने शुक्रवारी मोठा राजकीय फेरबदल करत २५ सदस्यांच्या नवीन मंत्रिमंडळाची घोषणा केली आहे. राज्याचे गृहमंत्री हर्ष संघवी यांची राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली असून, भारतीय क्रिकेटपटू रवींद्र जडेजा यांच्या पत्नी रिवाबा जडेजा यांनीही प्रथमच मंत्रीपदाची शपथ घेतली आहे.
२०२२ च्या विधानसभा निवडणुकीत हर्ष संघवी यांनी आपच्या उमेदवाराचा एक लाखांहून अधिक मतांनी पराभव करत विजय मिळवला होता. आज त्यांनी राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या उपस्थितीत गांधीनगर येथील राजभवनात मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्या हस्ते उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.
या नवीन मंत्रिमंडळात अनेक परिचित आणि अनुभवी चेहरे पुन्हा दिसले आहेत.
मागील कार्यकाळातील सहा मंत्र्यांचा या फेरबदलात समावेश करण्यात आला आहे. ऋषिकेश पटेल, कनुभाई देसाई, कुंवरजी बावलिया, प्रफुल्ल पानसेरिया, परशोत्तम सोलंकी आणि हर्ष संघवी यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आलाय.
यापैकी चार मंत्र्यांनी (ऋषिकेश पटेल, कनुभाई देसाई, कुंवरजी बावलिया आणि परशोत्तम सोलंकी) पुन्हा शपथ घेतली नाही कारण त्यांची पदे आणि खाती कायम ठेवण्यात आली आहेत.
नव्या मंत्रिमंडळात सामील झालेल्या नवीन चेहऱ्यांमध्ये त्रिकम छांग, स्वरूपजी ठाकोर, प्रवीण माळी, पीसी बरंडा, दर्शना वाघेला, कांतीलाल अमृतिया, अर्जुन मोधवाडिया, प्रद्युम्न वाजा, कौशिक वेकारिया, जितेंद्रभाई वाघानी, रमणभाई सोळंकी, कमलेशभाई पटेल, संजय सिंह महिदा, रमेशभाई कटारा, प्रफुल्ल पटेल, डॉ. जयरामभाई गामित आणि नरेशभाई पटेल यांचा समावेश आहे.
नवीन मंत्रिमंडळाच्या जातीय रचनेत ओबीसी समुदायातील आठ मंत्री, सहा पाटीदार, चार आदिवासी, तीन अनुसूचित जाती, दोन क्षत्रिय आणि ब्राह्मण आणि जैन (लघुमती) समुदायातील प्रत्येकी एक मंत्री समाविष्ट आहे.
गुजरातमधील हा फेरबदल सप्टेंबर २०२१ नंतरचा सर्वात मोठा मंत्रिमंडळ बदल मानला जात आहे. त्या वेळी माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी आणि त्यांच्या संपूर्ण मंत्रिमंडळाने भाजपच्या उच्च नेतृत्वाच्या सूचनेनुसार राजीनामा दिला होता. गुरुवारी मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल वगळता सर्व १६ मंत्र्यांनी आपले राजीनामे सादर केल्यानंतर आजचा शपथविधी सोहळा पार पडला.
गुजरात विधानसभा एकूण १८२ सदस्यांची आहे आणि नियमांनुसार राज्यात जास्तीत जास्त २७ मंत्री नियुक्त करता येतात. भूपेंद्र पटेल यांनी १२ डिसेंबर २०२२ रोजी दुसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती, आणि त्यांनी अलीकडेच आपल्या नेतृत्वातील पाच वर्षे पूर्ण केली आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.