उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडा येथून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. येथील एका खासगी रुग्णालयात प्रसूतीसाठी आलेल्या महिलेच्या पोटात डॉक्टरांनी शस्त्रक्रियेदरम्यान चक्क अर्धा मीटर लांब कापडाचा तुकडा सोडला. या गंभीर निष्काळजीपणामुळे संबंधित महिलेला तब्बल दीड वर्ष असह्य वेदना सहन कराव्या लागल्या. अखेर न्यायालयाच्या हस्तक्षेपानंतर मुख्य वैद्यकीय अधिकारी (CMO) आणि बॅक्सन रुग्णालयातील डॉक्टरांसह एकूण ६ जणांविरुद्ध गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.
नोलेज पार्क पोलीस ठाण्याच्या हद्दीतील डेल्टा-१ येथे राहणारे अंशुल वर्मा यांनी आपल्या पत्नीला १४ नोव्हेंबर २०२३ रोजी तुघलपूर येथील बॅक्सन रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल केले होते. डॉ. अंजना अग्रवाल आणि त्यांच्या पथकाने महिलेची शस्त्रक्रिया (सिझेरियन) केली.
प्रसूतीनंतर दोन दिवसांनी महिलेला डिस्चार्ज देण्यात आला. मात्र, घरी आल्यानंतर काही दिवसांतच तिच्या पोटात प्रचंड वेदना सुरू झाल्या. सुरुवातीला शस्त्रक्रियेमुळे हा त्रास होत असावा असे कुटुंबाला वाटले, पण काळानुसार या वेदना वाढतच गेल्या.
पीडित महिलेने वेदना कमी करण्यासाठी दीड वर्षात अनेक रुग्णालयांचे उंबरठे झिजवले. २२ मार्च २०२५ रोजी यथार्थ रुग्णालयात तपासणी केली असता केवळ पेनकिलर देऊन तिला घरी पाठवण्यात आले.
त्यानंतर एप्रिल २०२५ मध्ये जिम्स आणि नवीन रुग्णालयात एमआरआय (MRI) आणि अल्ट्रासाऊंड चाचण्या करण्यात आल्या, परंतु तिथेही डॉक्टरांना मूळ कारण शोधण्यात अपयश आले. दरम्यान, महिलेच्या पोटात एक मोठी गाठ तयार झाली होती, ज्यामुळे तिची प्रकृती अधिकच बिघडत चालली होती.
१४ एप्रिल २०२५ रोजी पीडित महिला कैलाश रुग्णालयात दाखल झाली. तेथील डॉक्टरांनी तातडीने शस्त्रक्रियेचा सल्ला दिला. २२ एप्रिल रोजी डॉ. संचिता विश्वास यांनी पुन्हा शस्त्रक्रिया केली असता, त्यांना महिलेच्या पोटातून सुमारे अर्धा मीटर लांब कापडाचा तुकडा सापडला. मागील शस्त्रक्रियेच्या वेळी बॅक्सन रुग्णालयातील डॉक्टरांनी हा तुकडा पोटातच विसरल्याचे स्पष्ट झाले.
याप्रकरणी पीडित कुटुंबाने सुरुवातीला पोलिसांत धाव घेतली होती, मात्र पोलिसांनी कारवाई करण्यास टाळाटाळ केली. अखेर पीडिताने न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाच्या कडक भूमिकेनंतर, गौतम बुद्ध नगर पोलिसांनी बॅक्सन रुग्णालयातील डॉ. अंजना अग्रवाल, डॉ. मनीष गोयल, सीएमओ नरेंद्र कुमार आणि इतर तपास अधिकाऱ्यांसह एकूण ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.