Himanta Biswa Sarma: आसामचे मुख्यमंत्री हिमांता बिस्वा सरमा हे नेहमी काही ना काही कारणाने चर्चेत राहत असतात. नुकतेच अभिनेता शाहरूख खानच्या पठाण चित्रपटाच्या रीलीजच्या पार्श्वभुमीवर एक स्टेटमेंट करून सरमा चर्चेत आले होते. त्यानंतर आता पुन्हा सरमा चर्चेत आले आहेत. त्यांनी महिलांना लग्न करण्याचा आणि मुले जन्माला घालण्याचा सल्ला दिला आहे.
शनिवारी गुवाहाटी येथे एका सरकारी कार्यक्रमात सरमा यांनी बालविवाह आणि महिलांशी संबंधित समस्यांवर लोकांना संबोधित केले. आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी महिलांना योग्य वयात आई होण्याचा सल्ला दिला आहे.
मुख्यमंत्री सरमा म्हणाले की, आई होण्याचे योग्य वय 22 ते 30 वर्षे आहे. त्यामुळे महिलांनी जास्त वेळ थांबू नये. जर तिने 30 नंतर मुलाला जन्म दिला तर अनेक वैद्यकीय गुंतागुंती निर्माण होत आहेत. महिलांनी 30 च्या आधी लग्न केले पाहिजे. मुले 22 ते 30 च्या दरम्यान जन्माला आली पाहिजे नाहीतर कठीण आहे.
सरमा म्हणाले की, ज्या महिलांनी अद्याप लग्न केले नाही त्यांनी लवकर लग्न करावे. देवाने आपले शरीर अशा प्रकारे बनवले आहे की प्रत्येक गोष्ट एका विशिष्ट वयोमर्यादेत व्हायला हवी. योग्य वयात लग्न न होणे आणि योग्य वयात मुले न होणे हे देखील माता व बालमृत्यू वाढण्याचे कारण आहे. म्हणूनच मी सर्व महिलांना 30 वर्षापूर्वी लग्न करण्याचा सल्ला देईन.
दरम्यान, आसाम मंत्रिमंडळाने 14 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलींशी लग्न करणाऱ्या पुरुषांविरुद्ध POCSO कायद्यांतर्गत खटले नोंदवण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच, 14 ते 18 वयोगटातील मुलींशी विवाह करणाऱ्यांवर बालविवाह प्रतिबंध कायदा 2006 अंतर्गतही कारवाई करण्यात येणार आहे.
राज्यातील माता आणि बालमृत्यूच्या उच्च दराला आळा घालण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे सरमा यांचे म्हणणे आहे, कारण बालविवाह हे देखील यामागचे एक प्रमुख कारण आहे.
शाहरूखने सरमा यांना केला होता मध्यरात्री फोन
दरम्यान, पठाण चित्रपटाला काही लोकांकडून झालेल्या विरोधाबाबत बोलताना सरमा यांनी कोण शाहरूख, असा प्रश्न केला होता, आणि नंतर अभिनेता शाहरूख खानने मध्यरात्री दोन वाजता त्यांना फोन केल्यावर त्यांनी ट्विटमध्ये श्री शाहरूख खान असा उल्लेख केला होता.
चित्रपट प्रदर्शनावेळी कोणताही वाद होणार नाही, याची काळजी घेऊ, अशी ग्वाही त्यांनी शाहरूखला दिली होती.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.