आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केल्यानंतर काही महिन्यांतच दिनेश कार्तिक पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. माजी भारतीय विकेटकीपर-फलंदाजाला हाँगकाँग सिक्सेस २०२५ स्पर्धेसाठी भारतीय संघाचा कर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
दिनेश कार्तिकने २०२४ च्या आयपीएलनंतर क्रिकेटच्या सर्व स्वरूपांमधून निवृत्तीची घोषणा केली होती. मात्र काही काळानंतर त्याने निर्णय बदलत दक्षिण आफ्रिकेतील SA20 लीगमध्ये सहभाग घेतला. २०२५ च्या हंगामात तो पार्ल रॉयल्स संघाचा भाग होता आणि या लीगमध्ये खेळणारा तो पहिला भारतीय ठरला. २०२६ मधील पुढील SA20 हंगामात तो दिसणार नाही.
दरम्यान, क्रिकेट हाँगकाँग, चीनने २३ सप्टेंबर रोजी दिनेश कार्तिकच्या कर्णधारपदाची अधिकृत घोषणा केली. नियुक्तीनंतर आपला उत्साह व्यक्त करताना कार्तिक म्हणाला, "हाँगकाँग सिक्सेससारख्या ऐतिहासिक आणि जागतिक स्तरावर मान्यताप्राप्त स्पर्धेत टीम इंडियाचे नेतृत्व करणे माझ्यासाठी खूप मोठा सन्मान आहे. आम्ही निर्भय आणि मनोरंजक क्रिकेट खेळू. प्रेक्षकांना आनंद मिळवून देणे हेच आमचे ध्येय आहे."
क्रिकेट हाँगकाँग, चीनचे अध्यक्ष बुर्जी श्रॉफ यांनीही कार्तिकवर विश्वास व्यक्त करताना म्हटले की, "त्याचा अनुभव आणि नेतृत्वामुळे या स्पर्धेत भारतीय संघाला नवा आत्मविश्वास मिळेल. त्याची उपस्थिती जागतिक क्रिकेट चाहत्यांना हाँगकाँग सिक्सेसकडे आकर्षित करेल."
दिनेश कार्तिक यापूर्वी भारतीय संघाचे नेतृत्व करणाऱ्या रॉबिन उथप्पाची जागा घेणार आहे. हाँगकाँग सिक्सेस २०२४ मध्ये भारतीय संघाची कामगिरी निराशाजनक ठरली होती. गट टप्प्यातच संघ पाकिस्तान आणि युएईकडून पराभूत होऊन बाहेर पडला होता. त्यामुळे यंदा कार्तिकच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे.
भारत-पाकिस्तान सामना होणार का याकडेही चाहत्यांचे लक्ष आहे. गेल्या काही महिन्यांपासून दोन्ही देशांमधील तणावामुळे अनेक स्पर्धांमध्ये भारताने पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास नकार दिला आहे. नुकत्याच झालेल्या वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लीजेंड्स २०२५मध्ये भारताने पाकिस्तानविरुद्ध खेळ टाळला होता. आशिया कप २०२५मध्येही अशीच परिस्थिती पाहायला मिळाली. त्यामुळे हाँगकाँग सिक्सेसमध्ये या दोन प्रतिस्पर्धी संघांमध्ये सामना रंगेल की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
हाँगकाँग सिक्सेस २०२५चे अधिकृत वेळापत्रक अद्याप जाहीर झालेले नसले तरी स्पर्धा ऑक्टोबरच्या अखेरीस किंवा नोव्हेंबरच्या सुरुवातीला होण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी १ ते ३ नोव्हेंबरदरम्यान झालेल्या आवृत्तीत श्रीलंकेने अंतिम फेरीत पाकिस्तानचा ३ गडी राखून पराभव करत विजेतेपद पटकावले होते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.