नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा करिष्मा दिल्लीतही पाहायला मिळत आहे. अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाला मोठा धक्का बसला असून, २७ वर्षानंतर भाजपला दिल्लीची सत्ता मिळाली आहे. विधानसभा निवडणुकीत भाजपला ७० पैकी ४८ जागांवर आघाडी मिळाली असून, आपला २२ जागा मिळाल्याचे आत्तापर्यंत आलेल्या कलानुसार दिसत आहे.
भाजपला ७० पैकी ४८ जागा मिळाल्या आहेत. तर, आम आदमी पक्षाला २२ जागांवर आघाडी मिळाली आहे. काँग्रेसला या निवडणुकीत भोपळाही फोडता आला नाही. तब्बल २७ वर्षानंतर भाजपला दिल्लीत सत्ता मिळाली आहे. महाराष्ट्रानंतर आता दिल्लीत देखील भाजपचा करिष्मा पाहायला मिळत आहे. आपवर गेल्या १० वर्षात झालेल्या विविध भ्रष्टाचाराचे आरोप आणि पाणी, रस्ते आणि प्रदूषण या सारख्या मुद्दांचा फटका बसल्याचे तज्ञ सांगत आहेत.
१) भाजपचं 27 वर्षांनी दिल्लीत कमबॅक
तब्बल २७ वर्षानंतर दिल्लीत भाजप सरकार सत्ता स्थापन करणार आहे. १९९३ मध्ये भाजपने दिल्लीत सत्ता मिळवली होती. मदनलाल खुराणा, साहीब सिंग वर्मा आणि सुषमा स्वराज्य अशा तीन मुख्यमंत्र्यांनी यावेळी सरकारचे नेतृत्व केले. कांद्याच्या किंमती वाढल्याचा फटका १९९८ च्या निवडणुकीत भाजपला बसला आणि कांग्रेसचे सरकार स्थापन झाले. त्यानंतर २७ वर्षांनी भाजप दिल्लीत सरकार स्थापन करेल.
2. आपच्या पराभवाचे कारण काय?
आम आदमी पक्षाच्या पराभवाला अनेक कारणं जबाबदार असल्याचे सांगितले जात आहे. यात दिल्ली मद्य धोरणातील घोटाळा हे मुख्य कारण मानले जात आहे. मद्य धोरण घोटाळ्यात अरविंद केजरीवाल आणि मनीष सिसोदीया यांना अटक झाली. केजरीवालांना अखेर मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देखील द्यावा लागला. याशिवाय राज्यातील रस्त्यांचा मुद्दा, पिण्याचे पाणी, कचरा समस्या आणि नर्मदा नदीचे प्रदूषण हे मुद्दे आपच्या पराभवासाठी कारणीभूत ठरली, असे राजकीय विश्लेषक सांगतायेत.
3. अरविंद केजरीवाल, सिसोदीया दिग्गजांचा पराभव
दिल्ली मद्य धोरणातील घोटाळ्यात अडकलेल्या तत्कालिन मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि उपमुख्यमंत्री मनीष सिसोदीया यांना निवडणुकीत पराभव पत्करावा लागला आहे. नवी दिल्ली मतदारसंघातून आपचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल १२०० मतांनी पराभूत झाले आहेत. परवेश वर्मा यांचा येथे विजय झालाय. तर, मारवा येथून निवडणूक लढलेल्या मनिष सिसोदिया यांना देखील पराभव पत्करावा लागला आहे. दरम्यान, मुख्यमंत्री आतिशी यांना कलकाजीचा गड राखण्यात यश आले आहे.
4. भाजपच्या विजयाचे कारण काय?
दिल्लीत भाजपच्या विजयाचे मुख्य कारण पक्षाने मायक्रो लेव्हलवर केलेल्या नियोजनाला दिले जात आहे. भाजपने मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी घरोघरी जाऊन प्रचारावर भर दिला. मतदारांना आकर्षित करण्यासाठी देशभरातून नेत्यांची फौज तैनात केली. कॉर्नर बैठका घेऊन आप सरकारचे घोटाळे आणि भाजप अवलंबणार असलेल्या योजना याबाबत सकारात्मक प्रचार करण्यात पक्षाला यश आले. शिवाय प्रदूषणाचा मुद्दा प्रभावीपणे मांडण्यात आला.
5. भाजपचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण?
भाजपला दिल्लीत बहुमत मिळाले असून, आता सत्ता स्थापनेच्या चर्चांना वेग आला आहे. दिल्लीत भाजपचा मुख्यमंत्री कोण होणार यावरुन विविध नावे समोर आली आहेत. यात माजी मुख्यमंत्री साहीब सिंग वर्मा यांचा मुलगा परवेश वर्मा यांचे नाव चर्चेत आहे. परवेश यांनी अरविंद केजरीवाल यांचा पराभव केला आहे. याशिवाय सुष्मा स्वराज्य यांची कन्या बन्सुरी स्वराज यांचे नाव देखील समोर आले आहे. माजी मंत्री स्मृती इराणी आणि भाजपचे राष्ट्रीय सचिव दुष्यंत गौतम यांचे नाव देखील मुख्यमंत्री पदाच्या शर्यातीत आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.