August Kranti Day: आज 9 ऑगस्ट... भारताच्या स्वातंत्र्य संग्रामातील एक अत्यंत महत्त्वाचा आणि निर्णायक दिवस. 1942 मध्ये याच दिवशी महात्मा गांधी यांनी 'करो या मरो'चा (Do or Die) ऐतिहासिक नारा देत 'भारत छोडो' (Quit India) आंदोलनाची सुरुवात केली होती. या आंदोलनाने ब्रिटिश सत्तेची पाळेमुळे हादरवून टाकली, म्हणूनच दरवर्षी 9 ऑगस्ट हा दिवस 'ऑगस्ट क्रांती दिवस' म्हणून साजरा केला जातो.
दरम्यान, 1942 मध्ये भारतात (India) ब्रिटिशांविरुद्धचा असंतोष शिगेला पोहोचला होता. जुलै महिन्यात काँग्रेसने एक प्रस्ताव मंजूर करुन ब्रिटिशांना तात्काळ भारत सोडण्यास सांगितले होते. तसे न झाल्यास देशव्यापी आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. 7 ऑगस्ट 1942 रोजी मुंबईमध्ये काँग्रेसची एक महत्त्वाची बैठक झाली. दुसऱ्या दिवशी, 8 ऑगस्ट रोजी मुंबईतील गोवालिया टँक मैदानावर (आताचे ऑगस्ट क्रांती मैदान) एक भव्य सभा आयोजित करण्यात आली. या सभेत अनेक स्वातंत्र्यसेनानींनी भाषणे दिली. मौलाना अबुल कलाम आझाद, पंडित जवाहरलाल नेहरु आणि सरदार वल्लभभाई पटेल यांनी उपस्थितांना संबोधित केले.
सभेच्या शेवटी महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांनी मंचावर येऊन ते ऐतिहासिक शब्द उच्चारले की, "करो या मरो!". संपूर्ण देशाला आवाहन करत त्यांनी 'भारत छोडो'ची गर्जना केली. स्वातंत्र्य आंदोलनाच्या 'ग्रँड ओल्ड लेडी' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अरुणा आसफ अली यांनी याच दिवशी भारतीय ध्वज फडकवला. 'भारत छोडो' हे नाव महान क्रांतिकारक युसूफ मेहरअली यांनी दिले होते, ज्याला गांधीजींनी आत्मविश्वासाने लोकांपर्यंत पोहोचवले. 'सायमन गो बॅक' हा नाराही त्यांनीच दिला होता.
गांधीजींच्या घोषणेनंतर ब्रिटिश सरकारने 9 ऑगस्टच्या पहाटेच कठोर कारवाई सुरु केली. महात्मा गांधी, नेहरु, पटेल आणि काँग्रेसच्या इतर प्रमुख नेत्यांना अटक करण्यात आली. वर्षाच्या अखेरीस 60 हजारांहून अधिक लोकांना तुरुंगात टाकण्यात आले. देशभरात ठिकठिकाणी निदर्शने झाली, हिंसाचार भडकला आणि शेकडो लोक शहीद झाले. या आंदोलनात फक्त नेतेच नव्हे, तर सर्वसामान्य जनता, महिला, विद्यार्थी, शेतकरी आणि कामगारही मोठ्या संख्येने सहभागी झाले. आसाममधील कुशल कोंवर आणि कनकलता बरुआ यांसारख्या तरुणांनी देशासाठी हौतात्म्य पत्करले. जयप्रकाश नारायण आणि राम मनोहर लोहियांसारखे नेते भूमिगत राहून आंदोलनाचे नेतृत्व करत होते.
'भारत छोडो' आंदोलनामागचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे क्रिप्स मिशनचे अपयश होते. ब्रिटिशांना भारताला फक्त मर्यादित स्वशासन द्यायचे होते, जे काँग्रेसला मान्य नव्हते. तसेच, भारतीयांना दुसऱ्या महायुद्धात सक्तीने पाठवले जात होते, त्यामुळे लोकांमध्ये संतापाची लाट उसळली होती. या आंदोलनाने ब्रिटिशांना हे स्पष्टपणे दाखवून दिले की, आता भारतात त्यांची सत्ता फार काळ टिकू शकत नाही. यामुळे स्वातंत्र्याची ज्योत अधिक तीव्र झाली आणि अखेर 1947 मध्ये देशाला स्वातंत्र्य मिळाले. महिला, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील लोकांच्या अभूतपूर्व सहभागामुळे हे आंदोलन एका खऱ्या जनआंदोलनात रुपांतरित झाले.
आज, 'ऑगस्ट क्रांती दिवस' आपल्याला त्या सर्व स्वातंत्र्यसेनानींच्या बलिदानाची आठवण करुन देतो. गांधीजींचा 'करो या मरो'चा नारा आपल्याला आजही हे शिकवतो की जेव्हा देशाची गोष्ट येते, तेव्हा समर्पण, धैर्य आणि एकता हेच विजयाची गुरुकिल्ली आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.