उत्तराखंडमधील चामोली जिल्ह्यातील हिमस्खलनानंतर ऋषिगंगा जलविद्युत प्रकल्पाला मोठ्या प्रमाणावर नुकसान पोहचल्याची माहिती मिळाली आहे. तसेच या घटनेमुळे धौलीगंगावरील जलविद्युत प्रकल्पाचा बांध तुटला असून, यामुळे गंगा व तिच्या उपनद्यांना पुराचा धोका निर्माण झाला आहे. शिवाय या दुर्घटनेमुळे चामोली ते हरिद्वारपर्यंत रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यानंतर ही घटना घडली त्यावेळेस मोठ्या प्रमाणात कामगार दोन्ही प्रकल्पांवर काम करत होते. आणि सध्याच्या घडीला दोन जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती मिळाली आहे. तर, सुमारे दीडशे लोक बेपत्ता झाले असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
चामोली जिल्ह्यातील हिमस्खलनानंतर झालेल्या दुर्घटनेची पाहणी करण्यासाठी उत्तराखंड राज्याचे मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंग रावत यांनी जोशीमठला भेट दिली आहे. व सातत्याने ते या घटनेवर लक्ष ठेवून आहेत. तर, त्याचवेळी दुर्घटनेनंतर पाणी कर्णप्रयाग येथे पोहोचले आहे. आज सकाळी साडे दहाच्या सुमारास चामोली जिल्ह्यातील ऋषिगंगा नदीने फुटल्यामुळे आपले रौद्र रूप धारण केले. यामुळे पाण्याच्या जोरदार प्रवाहाने पावणे अकराच्या सुमारास ऋषिगंगा जलविद्युत प्रकल्पाच्या दुसऱ्या भागाचा बांध फोडून पुढे जाण्यास सुरवात केली. त्यानंतर पाण्याच्या वेगामुळे ऋषिगंगा जलविद्युत प्रकल्पाच्या पहिल्या आणि देवडी प्रकल्पाला नुकसान पोहचवले. त्यानंतर धौलीगंगा आणि ऋषिगंगा नदीच्या संगमानंतर अलकनंदा नदीचे पाणी तपोवन येथे पोहोचले. व त्यामुळे तपोवन-विष्णुगड जलविद्युत प्रकल्पाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. व पूरपरिस्थिती निर्माण होऊन, प्रवाह जोशीमठ ओलांडून विष्णुगड-पिपळकोटी प्रकल्पापर्यंत पाणी पोहचले. इतकेच नाही तर, सव्वा बाराच्या सुमारास पाण्याच्या प्रवाहाने चामोली पार करून, नंदप्रयाग गाठले. आणि एक वाजता चामोलीतील कर्णप्रयाग ओलांडल्यानंतर पाण्याच्या प्रवाहात काही प्रमाणात घट झाली. आणि दीडच्या वेळेला रुद्रप्रयाग जनपदच्या पुढे जाऊन पाणी श्रीनगरच्या जवळ पोचल्याची माहिती मिळाली आहे.
या दुर्घटनेनंतर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियावरील ट्विटरच्या माध्यमातून राज्यात घडलेल्या आपत्कालीन परिस्थितीवर नजर ठेवून असल्याचे म्हटले आहे. तसेच, देश उत्तराखंड सोबत उभा असून, राष्ट्र सर्वांच्या सुरक्षिततेसाठी प्रार्थना करत असल्याचे नरेंद्र मोदी यांनी आपल्या या ट्विट मध्ये म्हटले आहे. याशिवाय, वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून एनडीआरएफची तैनाती, बचाव कार्य आणि मदतकार्याची माहिती घेत असल्याचे पंतप्रधानांनी म्हटले ट्विट मध्ये नमूद केले आहे.
त्यानंतर गृह मंत्री अमित शहा यांनी देखील या घटनेवर ट्विट करताना, उत्तराखंड राज्याचे मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंग रावत यांच्याशी चर्चा केली असल्याचे सांगितले. तसेच आयटीबीपी आणि एनडीआरएफचे डीजी यांच्याशी बोलून, जनतेला सुरक्षित करण्यासाठी युद्धपातळीवर काम चालू झाल्याचे गृह मंत्री अमित शहा यांनी ट्विट मध्ये लिहिले आहे. व या घटनेनंतर देवभूमीला सर्वतोपरी मदत केली जाईल, असे त्यांनी आपल्या ट्विट मध्ये अधोरेखित केले आहे.
दरम्यान, चामोली धरणाचा बांध फुटल्यानंतर टीएचडीसीच्या टिहरी धरणाचे टर्बाइन्स बंद करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. यापूर्वी टिहरी धरणातून 200 क्युमेक्स पाणी भागीरथी नदीत सोडले जात होते. मात्र आता एडीसी प्रशासनाने भागीरथीमध्ये पाणी सोडणे बंद केले असून, टीएचडीसी प्रशासनाने याबाबतची माहिती नॅशनल ग्रीडला देखील दिली असल्याचे समजते. व यामुळे आगामी काही काळ टिहरी धरणातुन करण्यात येणारी वीज निर्मिती थांबविण्यात येणार आहे.
तर, या दुर्घटनेमुळे नदीत पाण्याची पातळी वाढण्याची शक्यता लक्षात घेता टिहरी प्रशासनाने देवप्रयागच्या कीर्तीनगर येथे नदीकाठच्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. देवप्रयाग संगम येथेही बंदोबस्त करण्यात आला असून, नदीकाठच्या सर्व वस्त्यांमध्ये राहणाऱ्यांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यानंतर, मुख्य सचिव ओम प्रकाश यांनी घटनास्थळी एनडीआरएफच्या तुकड्या रवाना झाल्याचे सांगितले आहे. तसेच, पाण्याचा प्रवाह आता कमी झाला असून, त्यामुळे सखल भागात राहणाऱ्यांनी घाबरून जाण्याची गरज नसल्याचे त्यांनी पुढे म्हटले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.