लहानपणी गाड्या, वाहनं, स्कूटरी, बस ही प्रकरणे तशी कमीच. 1970 चा काळ. मी आजोळी प्रियोळला पहिलीत शिकत होतो. वीज नव्हतीच. लग्न वगैरे असेल तेव्हा वाड्यावर बस यायची. कार्डावरच छापलेलं असायचं. अमूक मंदिराकडून अमूक वाजता बस निघेल. नवरीच्या नांवामागे चि.सौ.कां. असायचं. हे कां म्हणजे काय हे मला समजायला वेळ गेला. शके अमूक यातील शके उमगण्यासही काळ गेला. असो. बस आल्याबरोबर मुलांचा हलकल्लोळ उडायचा. धावत जाऊन बच्चे मंडळी आधी खिडकी पकडून बसायची.
म्हार्दोळ बाजारात सोसायटीच्या निळ्या लाल बसेस पणजी फोंडा मडगांव अशा ये जा करायच्या. लग्नाला जायच्या बसेस स्वच्छ असायच्या. कारण त्याच दिवशी त्या धुऊन आणलेल्या असायच्या. आणि त्या फक्त अशाच स्पेशल भाड्याकरता असल्यानं गलिच्छ नसायच्या. या ‘फेशल’ बसमध्ये प्रवास करणं हा सर्वांनाच अवर्णनीय आनंद असायचा. गावातील वरात मंडळी लहान प्रमाणात असली तर पिक-अपने जात. कल्पना करूनच हसू येतं. रोमांच येतात. सावई-वेरेचे माझे मित्र एकदा म्हार्दोळला यायला पिक-अपची वाट पाहत थांबले. एक तास झाला,... मुहूर्त तर चुकलाच होता. शेवटी एकदाची पिक-अप आली.
लग्नाला जाणारे तणतणत होते. फक्त संताप. राग, ओरडा. पिक-अप वाल्याने त्याची समस्या सांगितली. त्याला दुपारी अकस्मात आणखीन एक भाडं मिळालं. कसलं माहिती आहे? शेणाची पुरवण एका कुळागरात करायचं. ते उरकल्यावर ती पिक-अप परत परत धुऊन धुऊन स्वच्छ करायलाच वेळ लागला. त्या काळात स्प्रे यंत्रंही नव्हती. हालच ते. माझे मित्र पिक-अपमध्ये कसे बसले याची कल्पना करवत नाही. महालसा संस्थानाजवळ लग्न झाल्यावर आम्ही बाहेर येते होतो. इतक्यात, आंबलेली वैतागलेली तोंडं करून माझे मित्र मला भेटले. मला त्यांची कथा, व्यथा ऐकून उगाचच हसायला यायला लागलं. काही तरी निमित्त सांगून आम्ही सांतेरी मंदिराकडे कूच केली. दूध ‘कोर्डींग’ आहे का, अशी चौकशी करत ते मित्र पुढं जात होतं, ते पाहिलं. ‘दूध कोल्ड ड्रिंक’ असं व्यवस्थित कोण म्हणतच नसे. त्या काळी ‘बुफे’ हा प्रकार नव्हता. ‘बुके’ हे प्रकरण नव्हतं. सगळं कसं साधं. ‘नो प्रेझेंट्स प्लीज’ हेही नव्हतं, हो. ते एकच व्यवस्थित असायचं. अहेर. कोंकणीत त्याला केळवण म्हणायचे. गांवचे केळेकर आणि हा केळवण शब्द यांचा संबंध केळ्यांकडे असेल का असं विचारलं तर माई घरी डाफरायची. जास्त प्रश्न विचारतोस तू, असं म्हणायत्या काळी तीन नग मोठ्या प्रमाणात अहेर म्हणून पॅक करून देत. मिल्क कूकर, लेमन सेट आणि धातूचा पाण्याचा जग ज्याला ‘कावळो’ म्हणत. कारण त्याला पाणी ओतायच्या ठिकाणी कावळ्यासारखी चोच असायची.
एकेका नवरोबाला गिफ्ट म्हणून असंख्य लेमन सेट, मिल्क कूकर आणि कावळे यायचे. लेमन सेट खूपच असायचे. त्यात सहा ग्लास असत. ते इतर तिनांपेक्षा माफक दरात मिळत. ढीगभर गिफ्ट्सची विल्हेवाट, वासलात कशी लावायची, हा तसा यक्षप्रश्न नव्हता. कारण लेमन सेटवरील लेबल काढून दुसरा कागद गुंडाळून आणखीन कोणाच्या लग्नाला अहेर दिला जायचा. तो गिफ्ट घेणारा परत आणखीन कुणाला द्यायचा. चक्राकार आवर्तनं अखंडपणे चालू राहायची. बाजारांत लिंबूच येत नसत. आले तरी महागडे. सरबत वगैरे पंचतारांकीत थाट कुणाला परवडण्यासारखे नव्हते. पाणी प्यायला छान डिझाईन असलेले लेमन सेटातले काचेचे ग्लास वापरण्यास कोण धजावत नसत. पडले तरी बलवत्तर- फुटणार नाहीत, मोडणार नाहीत असे म्हणणारे स्टीलचे प्याले होतेच. लेमन सेट हा शब्द आजच्या पिढीच्या कोषात नाही. पण आम्हांला आठवणीनेच हसू येतं.
मिल्क कूकर, कावळे हे धातूचे असल्याने त्यावर देणारा दाता आपले नांव कोरून द्यायचा. ते दुसऱ्यांना द्यायची पंचाईतच. तरीही लबाड, बनचुके त्यावरही उपाय काढत. टर्र टर्र करून आवाज करणाऱ्या भांडेवाल्याच्या यंत्राद्वारे हा कोरलेला मजकूर खोडत. दुसऱ्या बाजूने आपलं नांव कोरून देत. अहेराचा चौथा एकमेव प्रकार म्हणजे पैसे. लखोटा. महत्त्वाचा. त्या काळी पैशांची ददात होती. आता पैसा जास्तच गंगेसारखा वाहू लागलाय. खरं खोटं माहीत नाही, पण प्रसंग मासलेवाईक आहे. एका मित्रानं हल्लीच सांगितलेला. साठी झालेल्या सज्जनाच्या पत्नीने त्याला आग्रह केला – ‘अहो, चांगला सोहळा करूया ना... हॉलमध्ये प्रोग्राम, बुफे वगैरे.’ ‘अगं पण बुफेला निदान पन्नास हजार रूपये खर्च येईल.’ नवऱ्याने सांगितल्यावर चाणाक्ष सहचारिणी बोलली- ‘प्रेझेंट येतील ना. भरून येईल.’ पत्नीहट्ट पुरवावा लागला. गडगंज कार्यक्रम झाला साठीचा. एक दोन लखोटे सोडले तर बाकी सगळी बॉक्स!! रात्री दोघांनी सगळी उघडली. होते ते मिल्क कूकर, लेमन सेट, कावळे. या सदगृहस्थाने त्या त्या लोकांच्या गळ्यात बांधलेले, युक्तिपूर्वक दिलेले... बूमरॅंग होऊन आलेले.
मित्रहो, ते दिवस खरोखरच अभिमंत्रित होते. टिश्यू पेपर, मिनरल वॉटर, केटरर्स, नवरतन खुर्मा.... ही प्रकरणं येऊन तो साधेपणा गायब झाला. त्या काळातील पिक-अप दूर गेली मागे, सुंदर गोड स्मृती मनात ठेवून...ची.
-मुकेश थळी
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.