CM Dr. Pramod Sawant on Tourist Attacked in Goa Dainik gomantak
ब्लॉग

Tourist Attacked in Goa:पर्यटक प्राणघातक हल्ला प्रकरण: मुख्‍यमंत्र्यांच्‍या भूमिकेचे स्‍वागत

निकोप वातावरण निर्मितीसाठी सरकारला नाण्‍याच्या दोन्‍ही बाजू तपासाव्‍या लागतील.

गोमन्तक डिजिटल टीम

CM Dr. Pramod Sawant on Tourist Attacked in Goa: पर्यटकांशी गैरवर्तन करणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा इशारा देताना मुख्‍यमंत्र्यांनी, ‘शिस्‍त, साधनशुचिता सांभाळा’, असा सल्‍ला पर्यटकांनाही दिला आहे.

डॉ. सावंत यांची भूमिका स्‍वागतार्ह आहे; परंतु किनारी भागातील वाढती गुंडगिरी, पर्यटन क्षेत्रातील बजबजपुरीला कुचकामी सरकारी धोरणच कारणीभूत आहे.

हणजूण येथे घडलेले प्राणघातक हल्‍ल्‍याचे प्रकरण माध्‍यमांपर्यंत पोहोचणार नाही, याची पुरेपूर काळजी पोलिसांनी घेतली होती. पीडित कुटुंबाकडून सोशल मीडियावर हल्ल्याविषयीचा व्हिडिओ जारी झाला म्‍हणूनच दुष्‍कृत्‍याला वाचा फुटली; अन्यथा ते दडपल्‍यात जमा होते. राज्‍याची मदार प्रामुख्‍याने पर्यटन क्षेत्रावर आहे.

निकोप वातावरण निर्मितीसाठी सरकारला नाण्‍याच्या दोन्‍ही बाजू तपासाव्‍या लागतील. उर्मट आणि बेमुर्वत पर्यटकांना चौदावे रत्‍न दाखवून आल्या पावलीच माघारी धाडलेले चांगले; परंतु पर्यटकांना नाहक त्रास देणाऱ्या प्रवृत्तींचा बिमोड करणार कसा?

त्‍यासाठी इशाऱ्यांची भाषा पुरेशी नाही, कारवाईतूनच जरब बसवावी लागेल. भ्रष्‍टाचाराने बरबटलेल्‍या यंत्रणेला हे झेपेल का?

हणजूण प्रकरणात पर्यटकांनीही हाती दगड उचलला होता याकडे मुख्‍यमंत्र्यांनी अंगुलिनिर्देश केलाय. पण, समोरून हल्‍ला होत असेल तर प्रतिकाराचा प्रयत्‍न होणार नाही का? परंतु जुने गोवे येथे सुरक्षा रक्षकावर ओढवलेल्या परिस्‍थितीचे कदापि समर्थन करता येणार नाही.

किनारी भागात व्‍यावसायिकांकडून खंडणी घेतली जाते, असा आरोप मायकल लोबो यांनी केला आहे.

त्‍यांनी नावासकट पोलिसांत तक्रार देणे इष्‍ट ठरेल. लोबो नेहमीच अर्धवट पाऊल उचलून कुणा ना कुणा घटकाला दबावतंत्राद्वारे शह देऊ पाहतात. व्‍यवस्‍था सुधारावी हा त्‍यामागे मुळीच हेतू नसतो. मुख्‍यमंत्र्यांनी त्‍यांना नावे जाहीर करण्‍याविषयी केलेले आवाहन चपराक ठरावी. आता प्रश्‍‍न लोबो यांच्‍या सचोटीचा आहे.

शालान्‍त परीक्षा जवळ आल्‍या आहेत, किनारी भागात रात्रीच्‍या वेळी कर्णकर्कश संगीत लावू नका, असे पर्यटन व्‍यावसायिकांना सुनावत मुख्‍यमंत्र्यांनी विद्यार्थ्यांप्रति कळवळा व्‍यक्‍त केला हे बरेच झाले.

उच्‍च न्‍यायालयाने सरकारचे वाभाडे काढूनही कर्णकर्कश संगीताचा उच्‍छाद थांबला नव्‍हता. आता मुख्‍यमंत्र्यांच्‍या शब्‍दाला यंत्रणा किती जुमानते ते पुढील काळात दिसेलच.

कोरोना महामारीनंतर जागतिक पातळीवर सर्वच आघाड्यांवर आयाम बदलत आहेत. पर्यटन क्षेत्रावरही त्‍याचे बरे-वाईट परिणाम होत आहेत. गोव्‍यात परदेशी पर्यटक घटले आहेत, देशी पर्यटकांनी हे क्षेत्र तारले आहे.

अतिथी देवो भव: संकल्‍पना सत्‍यात उतरली नाही तर बदनामी अटळ आहे. लक्षात घ्‍यायला हवे की, पर्यटनाशिवाय पर्याय नाही इतक्या घायकुतीला सरकार आणि प्रशासन आले असले तरी जनता आलेली नाही.

पर्यटनाच्या नावाने अनेक बेकायदा व्‍यवसाय वाढत आहेत. त्‍यासाठी टोळधाडी गोव्यात येतात आणि मनमानी करतात. हे जनता अजूनपर्यंत तरी शांतपणे सहन करत आहे. कधीतरी या शांततेचा स्फोट होऊ शकतो. टाळी एका हाताने वाजत नाही.

ड्रग्‍ज, वेश्‍‍या व्‍यवसाय, डान्‍सबार, बेकायदा पार्ट्या बिनबोभाट चालत असतील तर त्‍यांच्‍या मागे धावणारे पर्यटकही दाखल होणारच. कोणताही गुन्हा पचवता येतो. नोटा समोर फेकल्‍या की प्रशासन वरमते आणि कायद्याचे रक्षक नांगी टाकतात, ही आपली प्रतिमा झाली आहे.

अभिनेत्री तथा भाजप नेत्या सोनाली फोगाट यांच्या हत्येमुळे गोव्यातील ड्रग्‍जची काळी बाजू समोर आली. वास्‍को येथे अमेरिकन पर्यटकांशी टॅक्‍सीवाल्‍यांनी केलेले गैरवर्तन आणि जगभर झालेली नाचक्‍की; सोझा लोबो रेस्टॉरंट तोडफोड; डान्‍सबारविरोधात कळंगुटवासीयांनी काढलेला मोर्चा अशी अनेक उदाहरणे बेकायदा कृत्‍यांची कबुली देतात.

आठ महिन्‍यांपूर्वी चंदगडच्या पर्यटकांना बांधून त्‍यांना नग्‍न करून लुबाडणुकीच्‍या घडलेल्‍या प्रकारामुळेही खळबळ माजली होती. काही वर्षांपूर्वी मेरशीत तर बस भरून आलेल्‍या पर्यटकांवर सुऱ्याने हल्‍ला करण्‍यात आला होता. गोवा हे सध्‍या एक सडक्या, भ्रष्ट आणि अनागोंदीयुक्त व्यवस्थेचेच प्रतिनिधित्व करतेय.

यातून निसर्गासक्त, संस्कृतीप्रेमी पर्यटक येथे येण्याची शक्यता दुरावू लागली आहे. हात ओले होतात म्‍हणून हनन किती काळ पाहत राहणार? त्‍याचा विचार 40 पैकी किती आमदारांच्या मनाला शिवलाय? त्‍यांच्‍यात अस्वस्थता असेल तर त्‍याचे प्रतिबिंब किमान विधानसभेतील चर्चेतून दिसायला हवे.

थायलँड, फिलिपाइन्सशी स्पर्धा करणे अपेक्षित नसेल तर कोणत्याही बेकायदा कृत्याला ते कायदेशीर असल्याचा मुलामा दिला जातो, हे आता थांबायला हवे. सुधारणेची भाषा करताना आपण किती पाण्‍यात आहोत, याचेही सरकारी यंत्रणेने चिंतन करावे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's News Live: बेपत्ता राजवीर सापडला; काणका पर्रा येथे लागला शोध

Saint Xavier Exposition: मुंबईतील अमेरिकेच्या वाणिज्य दूताने घेतले संत फ्रान्सिस झेवियर यांच्या शवाचे दर्शन; गोव्याचे केले विशेष कौतुक

Cash For Job: संशयितांच्या मालमत्तेची चौकशी करा! पोलिसांची शिफारस; कोट्यवधींची अफ़रातफर उलगडणार?

Randeep Hooda At IFFI: बिरसा मुंडांच्या जीवनावर सिनेनिर्मिती व्हावी! अंदमान सेल्युलर तुरुंगात गेल्यानंतर मात्र.. ; रणदीप हुडाने मांडले स्पष्ट मत

Goa Politics: अदानी प्रकरणावरुन काँग्रेस-भाजप मध्ये कलगीतुरा! पाटकरांचे आरोप; वेर्णेकरांचे प्रत्युत्तर

SCROLL FOR NEXT