Ramayan  Dainik Gomantak
ब्लॉग

कोकणी रामायण

राम लहान असताना त्याचे अपहरण झाल्याची कथा वाल्मिकी रामायणात नाही

गोमन्तक डिजिटल टीम

तेनसिंग रोद्गीगिश

आज मी तुमच्याबरोबर कोकणी रामायणातील एक मनोरंजक उतारा सामायिक करत आहे जो पोर्तुगालच्या आर्क्विवो डिस्ट्रिटल डी ब्रागा येथील हस्तलिखित क्र. ७७१ आणि ७७२मध्ये सापडला आहे. एकूण तीन हस्तलिखितांपैकी दोन हस्तलिखिते आता ब्रागा हस्तलिखिते म्हणून लोकप्रिय झाली आहेत.

गेल्या ६५ वर्षांपासून ज्ञात असूनही त्याचा मोठ्या प्रमाणावर उल्लेख केला जात असला तरी, हस्तलिखित क्र. ७७३ मधील ‘श्री कृष्ण चरित्र कथा’ आणि रॉकी मिरांडाचे हस्तलिखित क्र. ७७२ मधील ‘आदिपर्व’ वरील अ. का. प्रियोलकर यांच्या कार्याशिवाय या ग्रंथांचा फारसा अभ्यास झालेला नाही.

(संदर्भ : मिरांडा, २०११ : ओल्ड कोकणी भारत, खंड १ : प्रस्तावना) ते समजण्यासारखे आहे; हस्तलिखितांची पृष्ठांवर त्यांचे क्रमांक नाहीत, अनेक पाने गहाळ झाली आहेत, त्यामुळे मागचे पुढचे संदर्भ लागत नाहीत, कधी कधी एका हस्तलिखिताची पाने दुसऱ्याच हस्तलिखितात सापडतात आणि हस्ताक्षर लागत नाही व वाचणे शक्य होत नाही, त्यामुळे याचा संगतवार अभ्यास करणे खूप कठीण आहे.

येथे दिलेली माहिती आणि हा उतारा लॉर्डिनो रॉड्रिग्ज यांनी ऐंशीच्या दशकाच्या उत्तरार्धात केलेल्या सूक्ष्म कार्यावर आधारित आहे. (रॉड्रिग्स, १९८८ : रामायणांतले कोंकणी पर्व, कोकण टाईम्स, दिवाल्ली अंक, १९८८) हा मजकूर पारंपरिकपणे काही लेखकांना किंवा इतरांना श्रेय दिले असले तरी, त्याचा कोणताही ठोस पुरावा उपलब्ध नाही.

हस्तलिखित क्र. ७७१ आणि ७७२ मध्ये रामायण ग्रंथांचे तीन संच आहेत: ७७१मध्ये भरत आणि मुलकासुर यांच्यातील लढाईचे वर्णन करणारे १ पर्व आहे व ७७२ मध्ये १४ पर्वे आहेत आणि स्वतंत्रपणे ६ अध्यायांमध्ये रामाच्या दैवी उत्पत्तीची कथा आहे. खाली दिलेला मूळ कोकणीमध्ये असलेला उतारा शेवटच्या संचाच्या पाचव्या अध्यायातील आहे.

अध्याय पाचवा

हंसाचे रूप घेऊन एक दैत्य, वीस दिवसांच्या बाल रामाला चोरून नेतो. राम वीस दिवसांचा असताना दक्षिण दिशेतून एक दैत्य हंसाचे रूप घेऊन, तळ्यापाशी बसलेल्या रामाच्या मातेजवळ आला. दशरथ हंस इथे काय करत असेल, या विचारात असलेला दशरथ आपल्या पत्नीस पाहू लागला.

दशरथ आल्याचे लक्षात येताच रामाला पाळण्यात ठेवून ती दशरथाकडे गेली. हंसाने ते पाहिले आणि एक महाभयानक रूप घेतले व त्या बालकाला हातात घेऊन आकाशमार्गे उडाला. ते उभयवर्गांनी पाहिले; थोर आकांत वर्तला. तो दैत्य रामाला घेऊन गेला, आता आम्ही काय करावे? तो दैत्य त्याला घेऊन कुठे जाईल कोण जाणे?

या विचाराने दोघेही चिंताक्रांत झाली. इतक्यात तिथे वसिष्ठ आले. अगा दशरथा तू कोणत्या अशा चिंतेत पडला आहेस, ते मला कथन कर, असे म्हणाले. आपल्या गुरूचे वचन ऐकून दशरथरायाने त्याला सर्व हकीकत कथन केली आणि म्हणाला, जेव्हा मला पुत्र नव्हता, तेव्हा आपणच यज्ञ करून मला पुत्रप्राप्ती करून दिलीत.

त्याचप्रमाणे माझा पुत्र परत आणण्यासाठी काही तरी उपाय सांगावा. तेव्हा वसिष्ठ म्हणाले तू चिंता करू नकोस. मी जाऊन रामाला घेऊन येतो. असे म्हणून वसिष्ठ त्या दैत्याचे मागे धावले. आपल्या मागून वसिष्ठ येत आहेत, हे पाहून तो दैत्य खोल येथे लपला.

वसिष्ठ त्याच्या मागोमाग चिकोळणामार्गे येऊन पोहोचला. वसिष्ठांनी त्या दैत्याला युद्धाचे आव्हान दिले. दैत्याने धनुष्यबाण घेऊन युद्ध आरंभले. वसिष्ठांवर शरवर्षाव केला. ते पाहून वसिष्ठ नरसिंहासारखे कोपले.

त्यांनी आपल्याजवळील धनुष्यावर प्रत्यंचा चढवली व दैत्यावर बाण सोडले. भयंकर युद्ध झाले. वसिष्ठांचा एक बाण दैत्याच्या हृदयावर जाऊन बसला. त्यामुळे, तो दैत्य जो उडाला तो कुल्लस्तली (कुठ्ठाळी) येथे उसळून पडला.

वसिष्ठ रामाला घेऊन निघाले व माझोर्डे ग्रामी पोहोचले. तिथे त्यांना एक माझोर्डेकर भेटला. त्याने वसिष्ठांना नमस्कार केला आणि म्हणाला, ‘अहो तुम्ही या मुलाला घेऊन कुठे गेला होता?’ त्यावेळी वसिष्ठ म्हणाले, ‘मला इसर्शी खोल येथे एक कार्य होते. तिथे गेलो असता एका मुलाचे रडणे ऐकू आले. त्याचे रडणे ऐकून त्याला घेऊन आलो’.

हे त्यांचे बोलणे सुरू असताना रावणाचा पुत्र इंद्रजित तेथे पोहोचला. ते पाहून तो माझोर्डेकर उतोर्ड्याच्या दिशेने असलेल्या एका पाळंदीत जाऊन लपला. इंद्रजित वसिष्ठांना म्हणाला, ‘आता मी तुला व तुझ्या हातातल्या मुलाला खातो. आज मला उपास घडला.

तुमचे मांस खाऊन माझा उपास सोडतो’. हे ऐकून वसिष्ठ म्हणाले, ‘आमचे दोघांचे मांस तुझ्या घासाएवढेही होणार नाही. पण तुला पोटभर खायचे असल्यास मी देऊ शकतो. माझ्या मागे ये’. वसिष्ठ इंद्रजिताला घेऊन मुग्रुभूमी (मुरगाव?) येथील एका विहिरीजवळ आले व त्याला म्हणाले.

‘तो विहिरीत राहतो’. इंद्रजित विहिरीजवळ आला व विहिरीतील पाण्यात आपलेच रूप पाहून खूप खूश झाला. पाण्यातल्या व्यक्तीला मारण्यासाठी त्याने हात उगारला, तशी त्या व्यक्तीनेही इंद्रजिताच्या दिशेने हात केला. हे पाहून इंद्रजित कोप पावला व त्याने त्याला मारण्यासाठी विहिरीत उडी घातली. ते पाहून वसिष्ठांनी त्याच्या हृदयावर वज्र सोडले. ते लागून इंद्रजिताने प्राण सोडले. (इथे ही कथा संपते)

राम लहान असताना त्याचे अपहरण झाल्याची कथा वाल्मिकी रामायणात नाही. इंद्रजिताने स्वत:चे रूप पाहून विहिरीत उडी घेण्याची कथा पंचतंत्रातल्या सिंह व कोल्ह्याची आहे. रामायण गोव्यात घडले नाही, मग इथल्या स्थानांशी त्याला का जोडले असावे?

रामायणात नसलेली व पंचतंत्रात असलेली कथा एकत्र करून नेमके काय सांगायचे असेल? ही कथा मौखिक परंपरेतील असावी व स्थानिक ब्राह्मणांच्या कथनातून पॅद्रेेसने रोमन लिप्यंतरण केले असावे. साकवाळ,कुठ्ठाळी, केळशी या परिसरात ब्राह्मणांच्या काही प्रमुख वस्त्या आहेत.

हे खरेच कोकणी ब्राह्मणांचे केंद्रस्थान होते, जिथे बहुधा त्यांच्यातील सर्वांत विद्वान लोक राहत होते - बहुतांश लोकांना शणै म्हणून संबोधले जाते. उल्लेखित इतर ठिकाणे मात्र क्षत्रिय गावे आहेत. रामायणाची ही रूपांतरित आवृत्ती या भागात किंवा बहुधा झुआरी नदीच्या पलीकडील प्रदेशात म्हणजेच आताच्या फोंडा तालुक्यात प्रचलित असल्याचे दिसते.

मजकुरात आढळणारी दोन ठिकाणांची नावे अपरिचित आहेत. कुल्लस्तली आणि मुग्रुभूमी. कुल्लस्तली हे कुठ्ठाळी आहे का? जर होय, तर ते कुशस्थळी (कुशा + स्थान) म्हणून दिली जाणारी कुठ्ठाळीची व्यत्पत्ती चुकीची ठरते. हे कुळ + स्थली = कुल्लस्तली असू शकते का? तेव्हा कुल्ल म्हणजे काय?

निव्वळ संस्कृत व्युत्पत्तीच्या बंधनाच्या पलीकडे जाऊन, मूळ भाषेत किंवा अधिक अचूकपणे, मूळ भाषेच्या वडुकर उपस्तरात याचा अर्थ पूर्णपणे वेगळा असू शकतो का? मुरगावची व्युत्पत्ती मुग्रुभूमी या शब्दातून झाली असावी का? जर होय तर या शब्दाची व्युत्पत्ती काय आहे? भूमी समजणे सोपे आहे; पण मुग्रु कुठून आले?

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

India Bike Week 2024: चित्तथरारक स्टंट, म्युझिक आणि बरंच काही...; गोव्यातील बाईक इव्हेंटच्या Date, Venue जाणून घ्या

Tribute to the Legends मिरामार किनारी सुदर्शन पटनाईक यांनी साकारले सिने जगतातील दिग्गजांचे Sand Art, पाहा फोटो

SCROLL FOR NEXT