Subedar Mahmood Gawan Dainik Gomantak
ब्लॉग

गोव्याचा बहामनी सुभेदार महमूद गवाण

व्यापारामध्ये अरबांचे वर्चस्व होते, आलेखांमध्ये त्याचा ‘नवायत’ असा उल्लेख करण्यात आला आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

सर्वेश बोरकर

अल मसुदी, अल इताकरी, इब्न हौकल या अरब प्रवाशांच्या लिखाणातून, तसेच आलेखांमधील माहितीनुसार तुर्की आक्रमणापूर्वीच कोकण किनारपट्टीवर मलबारपासून ते उत्तरेस संजान गुजरातपर्यंत अरबांनी आपले बस्तान बसविले होते.

गोवा, दाभोळ व चौल बंदरातून परदेशात पैठणी, देवगिरी व दख्खनी कापड निर्यात केले जात असे. परदेशातून सुवर्णाचा मोठा ओघ भारताकडे असल्याचे त्या काळात नमूद आहे.

व्यापारामध्ये अरबांचे वर्चस्व होते, आलेखांमध्ये त्याचा ‘नवायत’ असा उल्लेख करण्यात आला आहे. सिराज, ओमान, बसरा व बगदाद इ. ठिकाणांहून अरब व्यापारासाठी येथे येत असत.

इ. स. १३१२ मध्ये अल्लाउद्दीन खिलजीच्या तुर्की आक्रमणाला कोकण बळी पडले. यादवांचे राज्य नष्ट केल्यानंतर मलिक यकलाखी या सरदाराची दख्खनचा राज्यपाल म्हणून नेमणूक करण्यात आली.

त्याच्या कक्षेत कोकण किनारपट्टीही होती. त्याच्याच कारकिर्दीत मलिक कफूर याने राज्यविस्तारासाठी दक्षिण भारतावर केलेल्या चौथ्या स्वारीत दाभोळ व गोव्यावर धडक मारली आणि मोठी लूट संपादन केली.

बहामनी सत्तेचा अंमल दख्खनमध्ये इ.स. 1347 साली सुरू झाला. बहामनी राज्याचा संस्थापक अल्लाउद्दीन बहामनशाहने दाभोळ काबीज केल्यानंतर दाभोळला बहामनी राज्याचे मुख्य बंदर बनवले. त्यामुळे अंतर्गत भागात सत्ता स्थानिकांचीच असली तरी, बंदर व व्यापार यावर मुस्लिमांचे वर्चस्व होते.

जवळच असणारे गोवा हे विजयानगरच्या साम्राज्यात होते व स्थानिक राजे विजयानगरशी जवळीक साधून होते. पंधराव्या शतकात बहामनी सुलतानांनी दक्षिण कोकणवर पूर्ण वर्चस्व प्राप्त करण्याच्या उद्देशाने तीन मोहिमा काढल्या.

इ. स. १४२९मध्ये मलिक-अल-तूज्जारने दक्षिण कोकणवर स्वारी करून तेथील शासकांना नमवले. परंतु प्रशासकीय व्यवस्था लावण्यात तो अपयशी ठरला. इ. स. १४३८मध्ये दुसरी मोहीम उघडण्यात आली; परंतु त्या मोहिमेत फारसे यश आले नाही.

इ. स. 1453 मध्ये तिसरी मोहीम करताना खलप हसनच्या नेतृत्वाखाली बहामनी सैन्य पूर्ण तयारीनिशी कोकणात उतरले; पण शिर्क्यांनी या सैन्याचा दारुण पराभव केला. ७००० बहामनी सैन्य मारले गेले. खलप हसनचा पराभव बहामनी राजवटीला नामुष्की आणणारा ठरला.

खेळण्याचे राजे व संगमेश्वरचा राजा बहामनी राजवटीचे विरोधक होते. त्यांच्याकडून खुश्कीच्या मार्गाने जाणारे तांडे व जहाजे लुटली जात असत. दक्षिण कोकणात बहामनी सत्ता अगदी नाममात्र होती

बहामनी वजीर ख्वाजा जहान महमूद गवाणने पुन्हा कोकणात बहामनी सत्तेचा जरब बसविण्याच्या उद्देशाने पश्चिम किनारपट्टीवर मोहिमा उघडल्या. परंतु त्याच्या लवकरच लक्षात आले की, या डोंगराळ व उंचसखल भागात घोडदळाचा काही उपयोग नाही.

त्याने लाच, कपटवृत्तीने, तर कधी मुत्सद्देगिरीचा वापर करून या प्रदेशावर आपले वर्चस्व निर्माण केले. यानंतर त्याने आपले लक्ष विजयानगरच्या साम्राज्यात असणाऱ्या गोवा बंदराकडे वळविले व इ.स. १४७२मध्ये गोवा काबीज केले.

या काळात ख्वाजा महमूद गवाणने आपल्या अधिकाऱ्यांना, आपल्या मित्रांना पाठविलेली पत्रे उपलब्ध आहेत. ही पत्रे अत्यंत बोलकी आहेत. मौलाना जामी या पांथिक व्यक्तीला लिहिलेल्या पत्रात तो म्हणतो, ‘आतापर्यंत कुठल्याही मुसलमान राज्यकर्त्याने या भागावर कायमस्वरूपी निश्चित असे प्रभुत्व मिळवलेले नाही.

इथली उंचच उंच शिखरे, गडकिल्ले बांधून सुरक्षित करण्यात आलेली आहेत. खुश्कीच्या किंवा सागरी मार्गाने येणाऱ्या मुसलमानांना यामुळे सतत लुटण्यात येते. हा भाग आपल्या कब्जात आणणे व वर्चस्व बसविणे हेच आपले धोरण असले पाहिजे’. ख्वाजा महमूद गवाणने गोवा व इथल्या सागरी महत्त्वाबद्दल अनेक पत्र लिहिलेली आहेत.

त्यांचे संकलन ‘रियाझ उल इन्शा’ या पत्रसंग्रहात आहे. सन १४७२नंतर दाभोळ व गोवा ही बहामनी राज्याची प्रमुख बंदरे होती. बहामनी राजवटीच्या काळात अनेक अरब, तुर्की, येमेनी, हबशी तरुण नशीब उघडण्यासाठी सागरीमार्गाने भारतात येत असत. ख्वाजा जहान महमूद गवान, युसुफ आदिलशाह व असंख्य विद्वान आणि संत बंदरात उतरले.

महमूद गवाण हा गिलानचा रहिवासी स्वकर्तृत्वावर बहामनी राज्याचा वजीर बनला. त्याच्या कारकिर्दीत बहामनी राज्याची पर्शियन आखाताबरोबर व्यापारवृद्धी झाली. घोड्यांचा व्यापारी हलाफ-अल्-हासो हादेखील वजीर झाला.

विजयानगरच्या राज्यातही गिलानी मोठ्या प्रमाणावर व्यापार करीत असत व सुमारे ३०० ते ५०० टक्के नफा मिळवत असत. वरील सर्व उल्लेखांवरून गोवा हे आंतरराष्ट्रीय व्यापारातील एक महत्त्वाचे बंदर होते हे स्पष्ट होते.

तसेच विविध वस्तूंची आयात-निर्यात होत असली तरी मोठा व्यापार अरबी घोड्यांचा होता. बहामनी, विजयनगर व पुढे आदिलशाही, कुतुबशाही इ. शाह्यांच्या काळात घोड्यांची आयात गोवा बंदरात होत असत व तेथून ते विविध राज्यांत पाठविले जात असत

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vidhu Vinod Chopra At IFFI: 'माझ्या सिनेमाच्या पहिल्या 'शो'ला चार-पाचच प्रेक्षक होते..'; चोप्रांनी सांगिलता 'खामोश'चा दिलखुलास किस्सा

Paroda Murder Case: पारोड्यात महिलेचा अज्ञाताकडून खून! संशयित कामगाराचा शोध सुरू

एकाच दिवशी Cash For Job मधील ठकसेनांना जामीन! तक्रारदारांची मात्र चिंता संपेना

Cash For Job प्रकरणातील तक्रारदारांचे मोबाईल जप्त केल्‍याचा दावा; संशयितांचे कॉल डिटेल्स, लोकेशन्‍स जाहीर करण्याचे मुख्यमंत्र्यांना आव्हान

Anjuna Villagers Protest: हणजुणेत स्थानिक आक्रमक! मेगा इव्हेंट्सविरोधात धरणे आंदोलन; ध्वनी प्रदूषणाविरोधी झळकावले फलक

SCROLL FOR NEXT